माता महाकाली यात्रा महोत्सव :
जिल्हाधिका-यांच्या हस्ते नियंत्रण कक्षाचे उद्घाटन
चंद्रपूर, दि. 4 एप्रिल : चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेली माता महाकाली यात्रा महोत्सव 3 एप्रिलपासून सुरू झाली आहे. यात्रा कालावधीत इतर राज्यातून व बाहेरच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी राहण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून भाविकांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी महाकाली यात्रेबाबत सोईसुविधांचा प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच पार्किंग व्यवस्था व यात्रेकरूंची कोणतीही गैरसोई होणार नाही, याची दक्षात घेण्यात यावी. सीसीटीव्ही मॉनिटर करण्यासाठी टीम नेमावी, प्रथमोचार साहित्य पुरेशा प्रमाणात ठेवावे व पथक 24 तास कार्यरत ठेवावे, असेही निर्देश दिले.
यात्रेनिमित्त चंद्रपूर शहरात बाहेरून येणा-या बसेसची व्यवस्था तसेच प्रशासनाने नियोजित केलेल्या जागेवरच पार्किंग व्यवस्था असली पाहिजे. भाविकांसाठी आवश्यक मुलभूत सोयीसुविधा जसे पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट, दैनंदिन स्वच्छता व इतर अनुषंगीक बाबी मनपाने उपलब्ध करून द्याव्यात. नियमित स्वच्छतेसाठी मनपाने अधिकारी – कर्मचा-यांच्या ड्युटी लावाव्यात. नदीवर आंघोळ करतांना कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने शोध व बचाव पथक तैनात ठेवावे. यात्रा कालावधीत हवामानाची माहिती अवगत करावी तसेच जिल्हा नियंत्रण कक्षासोबत (07172-250077) समन्वय ठेवावा.
महावितरणने यात्रा परिसरात अखंडीत वीज पुरवठा सुरू राहील, याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने रुग्णवाहिकेसह 24 बाय 7 आरोग्य पथक तैनात ठेवावे, अशा सुचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिका-यांनी परिसराची पाहणीसुध्दा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, मनपा आयुक्त विपील पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.
००००००