Search This Blog

Wednesday, 16 April 2025

फिल्डवरील विकास कामांची जिल्हाधिका-यांकडून पाहणी




 

फिल्डवरील विकास कामांची जिल्हाधिका-यांकडून पाहणी

Ø प्रशासकीय इमारत, पाणंद रस्ता, विहीर बांधकाम, पीएचसीला भेट

चंद्रपूर, दि. 16 एप्रिल : राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत क्षेत्रीय भेटीदरम्यान जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी मंगळवारी गोंडपिपरी तालुक्यातील विविध विकास कामांना भेटी देऊन आढावा घेतला.

सदर भेटीदरम्यान जिल्हाधिका-यांनी मौजा करंजी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उज्वल  महिला प्रभागसंघ यांची भेट घेतली व मार्गदर्शन केले. तसेच येथील दाल मिल व राईस मिल भेट देऊन कामकाज विषयक आढावा घेतला. गोंडपिपरी तालुका मुख्यालयी नव्याने बांधकाम होत असलेल्या  मुख्य़ प्रशासकीय इमारतीची त्यांनी पाहणी केली. यानंतर मौजा वढोली येथे पांदण रस्ता पाहणीमनरेगा विहीर कामांची पाहणीकोसा ( रेशीम ) उद्योगास भेट, तसेच स्थानिक शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. नागरिकांच्या या अडचणीबाबत त्यांनी संबंधित यंत्रणेला सुचना दिल्या.

त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी मौजा सकमुर येथील बचत गटाच्या मत्स्य़ बीज व्य़वसाय भेट देऊन मार्गदर्शन केले. मौजा पोडसा येथे वर्धा नदीवरील (महाराष्ट्र – तेलंगाणा) पुलाची पाहणी केली. तसेच मौजा तोहोगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन तेथील वैद्यकीय अधिका-यांसोबत रुग्णालयालीत यंत्रसामुग्रीऔषधांची उपलब्धता व इतर सुविधा इत्यादीसंबधी आढावा घेतला.  मौजा पाचगांव येथील बांबु व्यवस्थापन केंद्रास भेट देऊन तेथील कामकाज विषयक आढावा घेतला.

जिल्हाधिका-यांसोबत यावेळी गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तहसीलदार शुभम बहाकरगटविकास अधिकारी श्री. चांगफणेमुख्याधिकारी विवेक चौधरीनायब तहसीलदार चंद्रशेखर वेटेमंडळ अधिकारी प्रशांतसिंग बैस यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

००००००

उष्माघातापासून वाचण्यासाठी कामगार व मालकांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात

 

उष्माघातापासून वाचण्यासाठी कामगार व मालकांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात

Ø कामगार विभागाचे आवाहन

चंद्रपूरदि. 16 एप्रिल :  शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात उष्माघात कृती आराखडा राबविण्यात येत आहे. वातावरणातील उष्णतेमुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतो. त्यात काही लोकांचा बळी जातो. उन्हाळ्यात वाढत्या तापमानाची झळ ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात जास्त जाणवते व याच कालावधीत इमारत बांधकाम व त्याच्याशी निगडीत कामे केली जातात. उष्णतेच्या दुष्परिणामापासून वाचण्याकरीता कामगार व मालक वर्गाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कामगार विभागाने केले आहे.

काय करावे : बांधकामाच्या ठिकाणी पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था करावी. कामगाराने दुपारी 12 ते 4.30 वाजेपर्यंत भरउन्हात काम करू नये /करण्यास सांगु नयेत्या दृष्टीने कामगारांच्या कामाच्या वेळेचे नियोजन करावे. पहाटेच्या वेळेस जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.  तहान लागलेली नसतांना जास्तीत जास्त पाणी प्यावे. तसेच अन्य वेळी गोडताकपन्हेकोकम सरबत प्यावे. जेवणामध्ये ताजे अन्नतांदळाची भाकरीभाताची पेजपालेभाज्या खाव्यात. उन्हामध्ये डोक्यावर टोपीगॉगल व ओल्या कपड्यानी डोके मान व चेहरा झाकला जाईल याची खबरदारी घ्यावी. 

प्रथमोपचार पेटीमध्ये ओआरएस पाऊचजुलाब प्रतिरोधक औषधे मुबलक प्रमाणात राहिल, याची खबरदारी घ्यावी. गरोदर कामगार व आजारी कामगारांकडून कामे करून घेऊ नये. दुपारी 12 ते 4.30 या कालावधीत बांधकामाच्या आतील भागातील कामे करण्यात यावी.

काय करू नये : कामगारांना दुपारी 12 ते 4.30 या कालावधीत शारिरीक श्रमाची कामे करण्यास सांगु नये.

चहाकॉफीमद्य व कार्बोनेटेड थंड पेय घेऊ नये. शिळे अन्न व जंक फुड, तेलकट व तिखट पदार्थ तसेच आम्लवर्धक पदार्थ घेऊ नये.

००००००


Tuesday, 15 April 2025

वन अकादमीचा इंग्लड येथील विद्यापिठाशी सामंजस्य करार

 



वन अकादमीचा इंग्लड येथील विद्यापिठाशी सामंजस्य करार

चंद्रपूर, दि. 15 एप्रिल : शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढवून शैक्षणिक देवाण-घेवाण आणि आंतरराष्ट्रीय समज दृढ करण्यासाठी चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन अकादमी, (वन अकादमी) आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड (UWE) ब्रिस्टल यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या अनुषंगाने युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड, ब्रिस्टल येथील इकोसिस्टम सर्व्हिसेसचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मार्क एव्हरार्ड यांनी 13 ते 15 एप्रिल दरम्यान चंद्रपूर वन अकादमीला भेट दिली. त्यांच्या या भेटीवेळी "Wildlife & Wetland Protection Foundation" चे शिवाजी चव्हाण सोबत होते. या भेटीचे समन्वयक म्हणून अकादमीतील प्राध्यापक एस. के. गवळी यांनी जबाबदारी पार पाडली. भेटीदरम्यान डॉ. मार्क एव्हरार्ड यांनी वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी आणि अकादमीच्या प्राध्यापकांशी सविस्तर चर्चा केली. खालील क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याचे मुद्दे निश्चित करण्यात आले.

1. ऑनलाईन व्याख्यानांचे आदानप्रदान : युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड, ब्रिस्टल येथील प्राध्यापकांकडून चंद्रपूर वन अकादमीतील प्रशिक्षणार्थ्यांना ऑनलाईन व्याख्याने दिली जातील. तसेच चंद्रपूर वन अकादमीचे प्राध्यापक ब्रिस्टल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व्याख्याने घेतील.

2. संयुक्त अल्पकालीन अभ्यासक्रम : दोन्ही संस्थांच्या सहभागाने संयुक्तपणे अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम चंद्रपूर वन अकादमीमध्ये आयोजित करण्यात येतील.

3. आंतरराष्ट्रीय परिषदा आणि कार्यशाळा : चंद्रपूर वन अकादमीमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड, ब्रिस्टलच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय परिषदा, कार्यशाळा व परिसंवाद आयोजित केले जातील.

4. संशोधन सहकार्य : महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या संदर्भात महत्त्वाच्या संशोधन क्षेत्रांची ओळख पटवून, त्यामध्ये ब्रिस्टलच्या संशोधकांचे तांत्रिक व शैक्षणिक सहकार्य घेण्यात येईल.

5. अभ्यासक्रम मान्यता : चंद्रपूर वन अकादमीमध्ये घेतल्या जाणाऱ्या निवडक अभ्यासक्रमांना ब्रिस्टलकडून मान्यता मिळविण्याची शक्यता तपासण्यात येईल.

डॉ. मार्क एव्हरार्ड यांनी चंद्रपूर वन अकादमीतील प्रशिक्षण अभ्यासक्रमांची गुणवत्ता, अद्ययावत प्रशिक्षण सुविधा आणि वातावरण यांची प्रशंसा केली आणि दोन्ही संस्थांमधील भविष्यातील सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. या करारामुळे चंद्रपूर वन अकादमीतील शैक्षणिक आणि संशोधनात्मक कार्यक्षमता वाढीस लागेल आणि प्रशिक्षणार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्ञान व अनुभव प्राप्त होण्यास मदत होईल, असे वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी कळविले आहे.

०००००

खनीज निधीचा उपयोग जिल्ह्यातील खाण बाधित क्षेत्राच्या विकासाकरीताच

 

      खनीज निधीचा उपयोग जिल्ह्यातील खाण बाधित क्षेत्राच्या विकासाकरीताच

Ø जिल्हा खनीकर्म विभागाचे स्पष्टीकरण

चंद्रपूर, दि. 15 एप्रिल : जिल्हा खनीज प्रतिष्ठान अंतर्गत निधीचे संकलन, हाती घेण्यात येणारे प्रकल्प व निधीच्या विनियोजनाबाबत भारत सरकारचे खाण मंत्रालय व राज्य शासनाच्या खनिकर्म मंत्रालयाव्दारे वेळोवेळी मार्गदर्शक सुचना निर्गमीत करण्यात येतात. या अनुषंगाने जिल्ह्यात खाण बाधित क्षेत्रातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाधित गावाची यादी तयार करण्यात आली असून त्यानुसार प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येते. जिल्ह्यात खनीज विकास निधीचा उपयोग हा खाण बाधित क्षेत्राच्या विकासाकरीताच केला जातो, असे स्पष्टीकरण जिल्हा खनीकर्म विभागाने दिले आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार उच्च प्राथम्य बाबीकरीता उपलब्ध निधीच्या 70 टक्के व अन्य प्राथम्य बाबीकरीता उर्वरीत 30 टक्के रक्कम खर्च करण्यात येते. जिल्हा खनिज प्रतिष्ठान, चंद्रपुर अंतर्गत टाटा कन्सर केअर रुग्णालय, जिल्हातील सर्व अंगणवाडी केंद्राना आयएसओ नामाकंन, 5 नवीन ग्रामिण रुग्णालय, ग्रामिण पाणी पुरवठा योजनांना सोलर पॅनल, 35 स्मार्ट आरोग्य केंद्र, जिल्हामध्ये 12 आदर्श शाळा,  10 हजार लोकवस्ती पेक्षा जास्त असलेला गावात ई- लायब्ररी,  मातोश्री / बळीराजा पांदण रस्ते अंतर्गत 5 हजार किमीचे पाणंद रस्ते तयार करून देशातील सर्वात्कृष्ट 5 प्रकल्पामध्ये जिल्ह्यातील पाणंद रस्ते प्रकल्पाला 4 स्थान प्राप्त झाले आहे.

याशिवाय स्थानिक महिलांना स्वयंरोजगार अंतर्गत डीबीटी तत्वावर ई-व्हेईकल व शॉपिंग मॉल तयार करण्याकरीता निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. उक्त सर्व प्रकल्पाचा महालेखाकार, नागपुर कार्यालयाकडून आडीट करण्यात आले आहे. सन 2016 - 17 ते 2022-23 पर्यतचा अहवाल विधीमंडळात सादर करून त्यास मान्यता प्राप्त करण्यात आली आहे. माहे मार्च 2025 अखेर जिल्हा खनीज प्रतिष्ठानकडे पुढील विकासात्मक कामे घेण्याकरीता 225 कोटी एवढा निधी शिल्लक आहे, असेही खनीकर्म विभागाच्या स्पष्टीकरणात नमुद आहे.

इरई नदीचे पुनरुज्जीवन तसेच खोलीकरण करण्यासंदर्भात पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक व शाश्वत उपाययोजना राबविण्याकरीता जिल्हा प्रशासन, सर्व ओद्योगिक आस्थापना, जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा व सामान्य नागरिक यांचा समावेश करून ही लोकचळवळ व्हावी, या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन करीत आहे. सदर कामामध्ये सर्व शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन घेण्यामागे निधीची कमतरता नसून उक्त बाबीमुळे सदर प्रकल्पाबाबत लोकसहभागाची भावना निर्माण करून सर्वांच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्ण करण्याचा उद्दात्त हेतु आहे. या बाबतीत कुठलाही खुलासा व अधिक माहिती हवी असल्यास सामान्य नागरिकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आपल्या शंकेचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

००००००

वनविकास महामंडळाकडून सामान्य रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणे भेट

 


वनविकास महामंडळाकडून सामान्य रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणे भेट

चंद्रपूर, दि. 15 एप्रिल : महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत कर्मवीर मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणे देण्यात आली.

महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या सी.एस.आर. निधी अंतर्गत 13  लक्ष रुपये किमतीचे स्ट्रेचर, वाटर कुलर  व ईसीजी मशीन कर्मवीर मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला नुकतेच प्राप्त झाले. यावेळी महाराष्ट्र वनविकास महामंडळ विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, अधिसेविका श्रीमती टेंभुर्णे, जे.सी.आय. इलाईटचे ज्ञानेश कंचर्लावार मंचावर उपस्थित होते. 

यावेळी गणेश मोटकर यांनी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून रुग्णालयाला वस्तूच्या रूपात मदत केल्याने आनंद होत असून भविष्यात रुग्णालयाला रुग्णसेवेकरिता आणखी वस्तूंचे दान करण्याचे आश्वासन दिले. अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी आपल्या मनोगतनातून रुग्णहित समोर ठेवून सी.एस.आर. च्या माध्यमातून रुग्णालयाला वस्तू व वाटर कुलर देणगी रूपात दिल्याबद्दल वनविकास महामंडळाचे आभार मानले. आरोग्य सेवा देताना वैद्यकीय उपकरणे खूपच महत्त्वाचे असून भविष्यात अशीच मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समन्वय अधिकारी भास्कर झळके यांनी सी.एस.आर. निधीतून वस्तू मिळवण्यासाठी केलेला पाठपुरावा व रुग्णालयात छोट्या छोट्या वस्तूंचे असलेले महत्त्व विशद केले. देणगी स्वरूपातील स्ट्रेचर, वाटर कुलर व ईसीजी मशीन प्राप्त करण्याची संपूर्ण प्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जीवने, डॉ. कुलेश चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एफ. डी. सी. एम. येथील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून करण्यात आली. यासाठी समाजसेवा अधीक्षक हेमंत भोयर, राकेश शेंडे यांचे देणगी वस्तू प्राप्त करून देण्यात मोलाचे सहकार्य लाभले. शहरातील दानशूर संस्था व दानशूर व्यक्तिंनी रुग्ण हित समोर ठेवून सामाजिक उत्तरदायित्वासाठी पुढे यावे, असे आवाहन याप्रसंगी समाजसेवा विभागाकडून करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन समाजसेवा अधिक्षक हेमंत भोयर यांनी तर आभार उमेश आडे यांनी मानले. यावेळी राकेश शेंडे, भूषण बारापात्रे, तानाजी शिंदे, हेमा नगरकर, प्राजक्ता पेठे, योगिता माळी, मिलिंद मुन तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी अधीपरिचारिका, परिसेविका उपस्थित होते.

०००००००

मृत व्यक्तिबाबत ओळख पटविण्याचे आवाहन

 

मृत व्यक्तिबाबत ओळख पटविण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 15 एप्रिल : 14 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान रेल्वे स्टेशन बल्हारशाह येथील ड्यूटीवर असलेल्या कर्मचा-याने कळविले की, रेल्वे स्टेशन माजरी येथील प्लॅटफॉर्म वर एक अज्ञात पुरुष वय अंदाजे 50 वर्ष हा मृत अवस्थेत आढळून आला आहे. या नमुद अनोळखी पुरुषाचे नाव, गाव, पत्ता व नातेवाईक यांचा शोध घेण्याकरीता व ओळख पटविण्याकरीता पोलिसांनी आवाहन केले आहे.

अनओळखी मृताचे वर्णन :  उंची - 5x6 फुट, रंग- सावळा, बाधा-सडपातळ, केस काळे पांढरे,  चेहरा-लांब,  नाक सरळ, डोळे - अर्धवट उघडे,  दाढी मिश,  पिवळया  रंगाचा बंगाली कुर्ता, पांढरे रंगाच्या पायाजामा , गळयात माळ,पांढरा रंगाचा गम्छा.

                 नमुद अनोळखी मयत इसमाचे वरील प्रमाणे वर्णन असुन सदर मयतास कोणी ओळखत असेल व त्याचे नाव, गाव, नातेवाईकाना ओळख असेल तर  पो स्टे. वर्धा  मो. 7499967957 व तपासी अमलदार मो.नं 9822856786 या नंबर वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील 20 आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा

 


राज्यातील 20 आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा

Ø  सूक्ष्म आणि लघु उद्योजकांचे मेळावे आयोजित करून रोजगार निर्मिती

Ø दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक शिक्षण आणि रोजगार संधी

Ø मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती तीन सामंजस्य करार

मुंबई / चंद्रपूर, दि. 15 एप्रिल :  राज्यातील 20 आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणे, सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी उद्योजक मेळावे आयोजित करून रोजगार निर्मिती करणे आणि  राज्यातील आयटीआय मध्ये शिक्षण घेणा-या दिव्यांग  विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षण आणि रोजगार संधी वाढवण्यात येणार आहेत. आज कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि ग्रामीण विकास कार्यक्रम ट्रस्ट बेंगलुरू, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन, पुणे येथील देआसरा फाउंडेशन, अंधेरी येथील प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थामध्ये  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, कौशल्य विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, आयुक्त नितीन पाटील, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, सहसंचालक सतीश सुर्यवंशी, श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्तविजय हाके, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशनच्या सीएसआर प्रमुख रिचा गौतम, दामिनी चौधरी प्रोजेक्ट मुंबईचे संचालक जलज दानी, दे आसरा या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पंडित  उपस्थित होते.   

युवकांना नवीन तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रशिक्षण देण्यासाठी  श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट तसेच  स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन  आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यात हा त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच्या माध्यमातून स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन या संस्थेतर्फे येणाऱ्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यातील 20 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून इलेक्ट्रिशियन या व्यवसायाच्या कार्यशाळाची दर्जा वाढ करण्यात येणार आहे. व याचबरोबर सोलार टेक्निशियन लॅब व इंडस्ट्रियल ऑटोमेशन लॅब उभारून देण्यात येणार आहे. 

स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन तर्फे राज्यातील वीजतंत्री व्यवसायाच्या सर्व शिल्प प्रदेशांना बेंगलुरू येथे आधुनिक तंत्रज्ञान व सॉफ्ट स्किल्सचे 15 दिवसांचे प्रशिक्षण मोफत देण्यात येईल. या सामंजस्य करारामुळे पुढील चार वर्षात टप्प्याटप्प्याने 9750 प्रशिक्षणार्थ्यांना  इलेक्ट्रिशियन व अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व इंडस्ट्रियल ऑटोमेशन या विषयातील प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे. राज्यातील विविध विभागांतील 20 शासकीय आयटीआय केंद्रांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक इत्यादी विभागांचा समावेश आहे. या प्रकल्पाअंतर्गत 2025-26 पासून पुढील चार वर्षांत प्रशिक्षण दिले जाईल. पहिल्या वर्षात 10 केंद्रांमध्ये 1500 युवकांना, दुसऱ्या वर्षात 15 केंद्रांमध्ये 2250, तिसऱ्या वर्षात 20 केंद्रांमध्ये 3000 युवकांना आणि चौथ्या वर्षात देखील 3000 युवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सामंजस्य करारामुळे पुढील चार वर्षात टप्प्याटप्प्याने 9750 प्रशिक्षणार्थ्यांना इलेक्ट्रिशियन व अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व इंडस्ट्रियल ऑटोमेशन या विषयातील प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि देआसरा फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

              कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, अंतर्गत  महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि  पुणे येथील देआसरा फाउंडेशन या संस्थेसोबत उद्योजकता विकासाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार  सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना प्रशिक्षण, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि व्यावसायिक विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून पाठबळ देणे हा आहे. विविध जिल्ह्यांमध्ये उद्योजक मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतून  5000 लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असून, यामध्ये इच्छुक उद्योजक, व्यवसाय सुरू केलेले इनोव्हेटर्स व प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्स सहभागी होतील.      

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्यात सामंजस्य करार

             महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने आयटीआय मधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षण आणि रोजगार संधी वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार  करण्यात आला आहे. या करारानुसार एक संयुक्त कार्य समिती  स्थापन करण्यात येणार आहे, ज्यामध्ये 5 सदस्य असतील. ही समिती दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खास कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम तयार करेल, भारतीय सांकेतिक भाषा (ISL) मध्ये अभ्यासक्रम विकसित करेल, शिक्षकांचे प्रशिक्षण घेईल आणि उद्योग भागीदारांच्या सहकार्याने ऑन द जॉब ट्रेनिंग कार्यक्रम आयोजित करेल.

०००००००

Monday, 14 April 2025

जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन



 जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

चंद्रपूरदि. 14 एप्रिल : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी चंद्रपूर शहरातील  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून  अभिवादन केले.  आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतांना  जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणालेसंविधानाचे मूल्यअधिकार प्रत्येकाने जाणून घेऊन आपापली जबाबदारी पार पाडावी. प्रत्येकाने देशाच्या प्रगतीसाठी काम करावे.

याप्रसंगी तहसीलदार विजय पवार यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.

0000000

Sunday, 13 April 2025

उन्हाळी शिबिरातून आदिवासी विद्यार्थी घेणार उद्योजकाचे धडे




 

उन्हाळी शिबिरातून आदिवासी विद्यार्थी घेणार उद्योजकाचे धडे

चंद्रपूरदि. 13 एप्रिल : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयच्या वतीने शासकीय माध्यमिक आश्रम शाळापाटण येथे उन्हाळी शिबिराचे उद्घाटन प्रकल्प आधिकारी विकास राचेलवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. कार्यक्रमाला विशेष अतिथी  पोलिस उपनिरीक्षक श्री. कोकोडेउद्योजक प्रफुल खोब्रागडेसहायक प्रकल्प अधिकारी डी. जी. एम. पोळआर. एस. बोंगिरवारकनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एम. डी. गिरडकरमुख्याध्यापकप्रशिक्षक/मार्गदर्शकशिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडावीर बाबुराव शेडमाकेछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे विधीवत उद्घाटन करण्यात आले. यावेळी खोब्रागडे यांनी उन्हाळी शिबिरातून उद्योजक तयार करण्याच्या या उपक्रमाचे तसेच विद्यार्थ्यांना उद्योजक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध केल्याबद्दल प्रकल्प कार्यालयाचे कौतुक केले. तर अशा उपक्रमातून आदिवासी विद्यार्थी हा समाजात मानाचे स्थान प्राप्त करू शकेलअसे मत श्री. कोकोडे यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषण करतांना प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणालेआदिवासी समाज हा प्रगतशील समाज म्हणून उदयास येणे गरजेचे आहे. त्याकरीता अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांकरीता राबविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे या शिबिरात १. योगा प्रशिक्षण २. आर्चरी प्रशिक्षण ३. गोंडी व वारली पेटींग प्रशिक्षण ४. तायक्वांडो प्रशिक्षण ५. व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण ६. इंग्लीश स्पिर्कीग कोर्स ७. बांबु आर्ट ८. शिलाई मशीन प्रशिक्षण ९. अगरबत्ती तयार करणेअसे विविध उपक्रमांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती दिली. आदिवासी विद्यार्थी हा स्वतःच्या पायावर उभा राहून आपली प्रगती करण्यासाठी त्याला खरोखर मार्गदर्शनाची गरज आहे आणि त्यासाठी अशा प्रकारचे उन्हाळी शिबीर हे एक उत्तम मार्गदर्शक ठरेल असे श्री. राचेलवार यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा. प्रकल्प अधिकारी आर. एस. बोंगिरवार यांनी केले. संचालन श्री. पूणेकर यांनी तर आभार शिक्षिका दुर्गे यांनी मानले. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील सर्व अधिकारी तसेच प्रकल्पातील मुख्याध्यापक/ अधिक्षक तथा शासकीय आश्रम शाळा येथील कर्मचारी आदी उपस्थित होते.

0000000