Search This Blog

Saturday, 26 June 2021

86 कोरोनामुक्त, 16 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु

86 कोरोनामुक्त, 16 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु

चंद्रपूर,दि. 26 जून :  गत 24 तासात जिल्ह्यात 86 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 16 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्हयात मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या  16 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका 2, बल्लारपूर 1, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभिड 0, सिंदेवाही 1, मूल 0, सावली 0,  पोंभूर्णा 0,  गोंडपिपरी 0,  राजूरा 3, चिमूर 1, वरोरा 2, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 2 रुग्णांचा समावेश आहे.  आज मृत झालेल्यांमध्ये बल्लारपूर तालुक्यातील 1 महिला तर गोंडपिपरी तालुक्यातील 1 पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 634 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 677 झाली आहे. सध्या 431 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 50 हजार 883 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 63 हजार 262 नमुने निगेटीव्ह आले आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत 1526 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

Friday, 25 June 2021

अपर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा


अपर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा

Ø 12 प्रकरणे निकाली

चंद्रपूर,दि. 25 जून : शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला 23 जानेवारी 2006 च्या शासन निर्णयाद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणीची बैठक अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्येच्या 28 प्रकरणांवर चर्चा झाली. यापैकी 12 प्रकरणे पात्र करून मदतीकरीता निकाली काढण्यात आली तर 12 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली. चार प्रकरणे फेरतपासणीकरीता तालुकास्तरीय समितीला पाठविण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, तहसीलदार यशवंत धाईत, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अजय वाहाणे, कृषी कार्यालयाचे गजानन हटवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अनिल वानखेडे, डॉ. मेश्राम आदी उपस्थित होते.

00000

शुक्रवारी एकही मृत्यु नाही, 52 कोरोनामुक्त


शुक्रवारी एकही मृत्यु नाही, 52 कोरोनामुक्त तर 13 पॉझिटिव्ह

चंद्रपूर,दि. 25 जून : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 52 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर 13 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात शुक्रवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

बाधित आलेल्या 13 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 4, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभिड 0, सिंदेवाही 0, मूल 2, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 1, राजूरा 2, चिमूर 0,  वरोरा 1, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 2 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 618  वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 591 झाली आहे. सध्या 503 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 47 हजार 706 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 60 हजार 382 नमुने निगेटीव्ह आले आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत 1524 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

समाजकल्याण आयुक्तांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर संगणक अभ्यासिकेचे लोकार्पण


 

समाजकल्याण आयुक्तांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर संगणक अभ्यासिकेचे लोकार्पण   

चंद्रपूर दि.25 जून : समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संगणक अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, नागपूर समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष सचिन कलंत्री, उपायुक्त तथा सदस्य विजय वाकुलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाची पाहणी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सफाई कर्मचाऱ्यांकडून कार्यालय परिसरात नियमितपणे साफसफाई करून घ्यावी व परिसरात स्वच्छता राखावी. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून लाभार्यांना त्वरीत लाभ देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अशाही सुचना त्यांनी केल्या. जिल्हयात कोविड विषाणूच्या पार्श्वभुमीवर करण्यात आलेल्या उपाययोजंनाची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कार्यालय परिसरात वृक्षारोपण  करण्यात आले व मुलांच्या वसतिगृहाची पाहणी केली.

            सामाजिक न्याय विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या विविध योजनांची चित्रफीत सादर करण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

कोरोनामुक्त गाव करण्यासाठी ‘मिशन मोडवर’ नियोजन करा - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने


 

कोरोनामुक्त गाव करण्यासाठी ‘मिशन मोडवर’ नियोजन करा

                           - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

Ø लसीकरणासाठी प्रत्येक गावापर्यंत पोहचण्याचे निर्देश

चंद्रपूर,दि. 25 जून : ‘कोरोनामुक्त गाव’ ही संकल्पना राज्य शासनाने सुरु केली आहे. याची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने वरिष्ठ स्तरावरून नियमित आढावा घेण्यात येतो. कोरोनाविरुध्दच्या लढाईत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे गावापर्यंत पोहचून कोरोनमुक्त गाव करण्यासाठी ‘मिशन मोडवर’ नियोजन करा, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोव्हीड-19 बाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, पोलिस उपअधिक्षक शेखर देशमुख, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम आदी उपस्थित होते.

तिस-या लाटेचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर गावांचे 100 टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र असे असले तरी गाफील राहून चालणार नाही. कोरोनाविरुध्दच्या लढाईत लसीकरण हा महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे गावापर्यंत पोहचा. गावनिहाय लसीकरणासाठी पात्र लोकसंख्या किती, लसींचे किती डोज आवश्यक आहे, उपलब्ध साठ्याचे वितरण आदी बाबींचे नियोजन करा. जेथे लसीकरणासाठी कमी प्रतिसाद आहे, तेथे जास्त लक्ष केंद्रीत करून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि गावस्तरावरील कर्मचा-यांच्या माध्यमातून जनजागृती करा. लसीकरणासाठी वेगवेगळ्या गटांची (व्यापारी, उद्योजक, मजूरवर्ग, विद्यार्थी, सुपर स्प्रेडर आदी) निर्मिती केली तर ते जास्त सोयीचे होते, असे त्यांनी सांगितले.

लसीच्या उपलब्धतेबाबत नागरिकांना माहिती द्या. लसीकरण सत्र सुरू आहे किंवा आज लसीकरण होणार नाही, याची पूर्वकल्पना नागरिकांना अवश्य द्या. नगर परिषद क्षेत्रातसुध्दा मुख्याधिकारी आणि त्यांच्या अधिनस्त कर्मचा-यांनी तहसीलदारांच्या समन्वयातून टीमचे गठन करावे. तसेच वॉर्डावॉर्डात जावून लसीकरण आणि म्युकरमायकोसीसबाबत जनजागृती करावी. कोविडमुळे पालक गमाविलेल्या बालकांना शासनाकडून मदत देण्यात येणार आहे. अशा बालकांचे संरक्षण करणे आणि त्यांचे हक्क मिळवून देणे, यासाठी गांभिर्याने प्रयत्न करा. लसीकरणासंदर्भात सर्व उपविभागीय अधिका-यांनी तालुकास्तरावर आठवड्यातून किमान दोन वेळा कृती दलाची बैठक आयोजित करावी. यापुढे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्यांना केवळ कोविड केअर सेंटर किंवा शासकीय विलगीकरण केंद्रातच ठेवण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. तसेच कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रॅकिंगची व्यवस्था आणखी मजबूत करा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.   

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी डेल्टा प्लस विषाणूबाबत माहिती दिली. तसेच याबाबत जागरूक राहून प्रतिबंधात्मक उपाययोजना गांभिर्याने करण्याबाबत अवगत केले.

बैठकीला मनपा वैद्यकीय अधिकारी  डॉ. नयना उत्तरवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, न.प.मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिक्षक आदी उपस्थित होते.

00000