Search This Blog

Sunday, 5 September 2021

जिल्ह्यात "स्मार्ट शाळा" तयार करण्यासाठी 9 कोटी रुपये उपलब्ध करून देणार - पालकमंत्री वडेट्टीवार







जिल्ह्यात "स्मार्ट शाळा" तयार करण्यासाठी 9 कोटी रुपये

उपलब्ध करून देणार - पालकमंत्री वडेट्टीवार

Ø  शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट शिक्षकांचा सत्कार

चंद्रपूर दि. 5 सप्टेंबर : शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा सुधरविण्यासाठी सर्वांनी एकजुटिने प्रयत्न करणे आवश्यक आहे. आतापर्यंत 65 ते 70 शाळांना भौतिक सुविधेसाठी पहिल्या टप्प्यात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच जंगल परिसरालगतच्या शाळांना वॉल कंपाउंडसाठी निधी उपलब्ध करून देणार असून स्मार्ट स्कूल तयार करण्यासाठी शिक्षण विभागाने प्रस्ताव सादर केल्यास 9 कोटी रुपये तात्काळ उपलब्ध करून दिले जाईल, असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेतील कन्नमवार सभागृहात आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, वित्त व बांधकाम सभापती राजू गायकवाड, समाज कल्याण समिती सभापती नागराज गेडाम, कृषी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती सुनील उरकुडे, महिला व बालकल्याण समिती सभापती रोशनी अन्वर खान, सर्व जिल्हा परिषद सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, शिक्षणाधिकारी (माध्य)उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (प्राथ)दिपेन्द्र लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले, आपल्या जीवनात शिक्षकाचे महत्व आहे, शिक्षक म्हटले की समाजाकडून अनेक अपेक्षा असतात. शिक्षक हा ग्रामीण भागातील आत्मा आहे. शिक्षक हा अतिसंवेदनशील असतो, जो समाजाप्रती जागरूक असतो तो शिक्षक असतो. जो समर्पित भावनेने कार्य करतो तो शिक्षक असतो, शिक्षक हा समाजशील असतो करुणादायी असतो म्हणून शिक्षकाची व्याप्ती ही फार मोठी असते. शिक्षकांमध्ये समाज घडविण्याची क्षमता आहे, यासाठी गोऱ्या कुंभाराची उपमा देता येईल. कठीण परिश्रम करून मेहनत करून विद्यार्थ्यांना घडवण्याची क्षमता, न बोलणाऱ्याला बोलतं करण्याची क्षमता ही शिक्षकांत आहे. आई वडीला नंतर दुसरे स्थान कोणाची असेल तर ते शिक्षकाचे आहे. एक डॉक्टर घडविण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात तसेच एक शिक्षक घडविण्यासाठी समर्पित भावनेने परिश्रम घ्यावे लागतात असेही ते म्हणाले.

शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना चंद्रपूर जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील शिक्षकांसोबत संवाद साधला. कोरोना संकटात आव्हानात्मक परिस्थितीत शिक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडली. यासाठी सर्व शिक्षकांचे कौतुक केले. शिक्षकांमुळे डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारी सामर्थ्यवान पिढी तयार होते. आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो, असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

शिक्षक हा समाजाचा घटक म्हणून काम करतो, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य तसेच चांगला नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षक करीत असतो, असे जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले म्हणाल्या. त्यासोबतच विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण देणे महत्त्वाचे आहे त्यामुळे बफर क्षेत्रात येणाऱ्या शाळांना डिजिटल व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.

यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 16 शिक्षकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

000000

विकासाच्या बाबतीत ब्रम्हपुरी क्षेत्राचा कायापालट होणार - पालकमंत्री विजय वडेट्टीवार















विकासाच्या बाबतीत ब्रम्हपुरी क्षेत्राचा कायापालट होणार

                  - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø  तालुक्यात विविध विकास कामांचे भुमिपूजन

चंद्रपूर, दि. 5 सप्टेंबर :  गत दोन  वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे विकास कामांना खीळ बसली होती. आता मात्र ‘पुनश्च हरीओम’  म्हणत राज्य सरकारने विकासाला गती दिली आहे. ब्रम्हपुरी क्षेत्रातसुध्दा विकासाचे स्वप्न साकार होत आहे. सिंचनाच्या सुविधेबरोबरच अंतर्गत रस्ते, पूल व इतर विकास कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली असून ती पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात ब्रम्हपूरी क्षेत्राचा कायापालट झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येईल, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

ब्रम्हपूरी शहरात सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नवीन इमारतीचे व शासकीय विश्रामगृहाच्या कामाचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता हेमंत कोठारी, जि.प.सदस्य प्रमोद चिमूरकर, नागभीड पंचायत समिती सभापती प्रफुल खापर्डे स्मिता पारधी, खेमराज तिडके, प्रा. राजेश कांबळे, प्रभाकर सेलोकर, न.प.उपाध्यक्ष अशोक रामटेके, प्रकाश देवतळे, ज्ञानेश्वर कायरकर, मंगला लोणपल्ले, उपअभियंता अरुण कुचनवार आदी उपस्थित होते.

राज्याचा मंत्री व जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून चंद्रपूरच्या सर्वांगीन विकासासाठी आपण कटिबध्द आहोत, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, ब्रम्हपूरी क्षेत्रात 75 हजार हेक्टरवर सिंचनाची सुविधा निर्माण झाल्यामुळे शेतजमीन सुपिक होत आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागाचा विकास करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ग्रामीण भागाचे रस्ते शहरासोबत जोडून दळणवळणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या भागाच्या विविध विकासकामांच्या 100 कोटींच्या निविदा येत्या आठवड्याभरात निघणार आहे. भविष्याचा विचार करता ब्रम्हपूरी एक नामांकित शहर म्हणून उदयास येईल.

येथील पंचायत समितीच्या इमारतीच्या बांधकामाकरीता 16 कोटी मंजूर झाले आहेत. नगर परिषदेची इमारत पूर्णत्वास आली आहे. 100 खाटांचे रुग्णालय, ई-लायब्ररी, सात कोटी रुपये खर्च करून क्रीडा संकूल, उड्डाण पुलासाठी 75 कोटी, शासकीय अधिकारी – कर्मचा-यांच्या निवास स्थानासाठी 20 कोटी मंजूर झाले आहे. तसेच वडसाकडे जाणारा अंतर्गत रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली असून त्यासाठी 90 कोटींचे नियोजन करण्यात येणार आहे. शहराच्या विकासासाठी स्विमिंग पूल, बगिचा, शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी 75 लक्ष रुपये देण्यात आले आहे. तसेच शासकीय तंत्रनिकेतनचे दोन वसतीगृहे सोडून विद्यार्थ्यांसाठी इतर चार नवीन वसतीगृहे बांधण्यात येत आहे. त्यामुळे 650 विद्यार्थ्यांचा निवासाचा प्रश्न निकाली निघाला आहे. तसेच येत्या काही दिवसांत तीन फिरत्या दवाखान्यांचे उद्घाटन करण्यात येणार असून सदर दवाखाने सुसज्ज वाहनांसह गावागावात जावून तपासणी करणार आहे, असे पालकमंत्री यांनी सांगितले.

 

 रुग्णवाहिका व स्वर्गरथाचे लोकार्पण : स्थानिक आमदार विकास निधीअंतर्गत ब्रम्हपूरी नगर परिषदेला देण्यात आलेल्या रुग्णवाहिका व स्वर्गरथाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा रिता उराडे, उपाध्यक्ष अशोक रामटेके, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वासेकर, हितेंद्र राऊत, नितीन व-हाडे आदी उपस्थित होते.

    

भुमिपूजन करण्यात आलेली इतर विकासकामे : ब्रम्हपूरी शासकीय विश्रामगृह परिसरात सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाची नवीन इमारत (2 कोटी रुपये), शासकीय विश्रामगृहाची नवीन इमारत (3 कोटी 38 लक्ष रुपये), जुगनाळा येथे मालडोंगरी, चौगान, जुगनाळा, मुई, गांगलवाडी, वायगाव, गोगाव, सांयगाव रस्ता बांधकाम (6 कोटी रुपये), पारडगाव येथे अंतर्गत्‍ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण  (50 लक्ष रुपये), रणमोचन येथे रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण (80 लक्ष रुपये) आणि रुई येथे वाल्मिकी परिसरातील सामाजिक सभागृहाचे भुमिपूजन.

0000000

Friday, 3 September 2021

शुक्रवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त, 1 पॉझिटिव्ह


शुक्रवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त, 1 पॉझिटिव्ह

Ø  ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 48

चंद्रपूर, दि. 3 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 1 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी एकाही बाधिताचा  मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 1 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 1, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0,वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 659  वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 71 झाली आहे. सध्या 48 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 78 हजार 219 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 87 हजार 765 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1540 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

पालकमंत्री वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

पालकमंत्री वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि. 3 सप्टेंबर : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रम्हपूरी येथे आगमन व राखीव. सकाळी 11.15 वाजता सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह परिसरात शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारत बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12.30 वाजता नगर परिषद कार्यालय ब्रम्हपूरी येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत प्राप्त रुग्णवाहिका व स्वर्गरथाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, दुपारी 1 ते 1.30 राखीव.

दुपारी 2 वाजता मालडोंगरी येथे आगमन व मालडोंगरी – चौगान – जुगनाका – मुई – गांगलवाडी – वायगाव – गोगाव – सायंगाव  रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 2.45 वाजता पारडगाव येथे आगमन व गावातील अंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 3.30 वाजता रणमोचन येथे आगमन व रणमोचन रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 4 वाजता रुई येथे वाल्मीक परिसरातील सभागृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रम्हपूरी येथे आगमन व राखीव, सायंकाळी 5 वाजता अभ्यागतांची भेट व चर्चा त्यानंतर शासकीय विश्रामगृह ब्रम्हपूरी येथे चर्चा.

दि. 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10.45 वाजता ब्रम्हपूरीहून शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव, सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद येथील कन्नमवार सभागृह येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12.30 ते 1 राखीव, सायंकाळी 4 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

000000

पोळ्याच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कलम 36 लागू


पोळ्याच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कलम 36 लागू

Ø 5 ते 8 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत आदेशाची अंमलबजावणी

चंद्रपूर, दि. 3 सप्टेंबर : जिल्ह्यात दि. 6 व 7 सप्टेंबर रोजी पोळा, तान्हा – पोळा साजरा करण्यात येणार असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने 5 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ते 8 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत कलम 36 लागू करण्यात आले आहे. या कायद्यान्वये सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविणेबाबत, सभेचे आयोजन, मिरवणूक काढण्याबाबत, मिरवणुकीचे रस्ते निश्चित करण्याबाबत, लाऊडस्पिकर वापरण्याबाबत निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिका-यांना देण्यात आले आहे.

या अंतर्गत मिरवणूक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांच्या वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकारी, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारीत करणे तसेच धार्मिक पुजास्थानाच्या जवळ लोकांच्या वागणुकीबाबत निर्बंध घालण्याचे अधिकार, सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे, गाणी गाणे, ढोलताशे वाजविणे इत्यादींचे निर्बंध घालण्याचे अधिकार, रस्ते व इतर सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर लाऊडस्पिकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार आदींचा समावेश आहे.

सदर आदेश लागू असतांना वर नमुद बाबींबाबत संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घ्यावी. सर्व बाबतीत पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. सदर आदेश 5 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून 8 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहील, असे जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांनी कळविले आहे.

000000