Search This Blog

Thursday, 3 February 2022

जात वैधता प्रमाणपत्राकरीता उमेदवारांनी त्रुटीची पुर्तता करण्याचे आवाहन


जात वैधता प्रमाणपत्राकरीता उमेदवारांनी

त्रुटीची पुर्तता करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.3 फेब्रुवारी : सन 2021-22 मध्ये वर्ग 12 वी विज्ञान शाखेमध्ये प्रवेशीत व व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले तसेच सेवा व निवडणुक विषयक अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर केलेले आहेत. परंतु अद्यापपावेतो अपुर्ण दस्तऐवजाअभावी प्रकरण त्रुटीमध्ये प्रलंबित आहेत अशा  उमेदवारांनी व अर्जदारांनी 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्रूटीची पुर्तता करावी. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.

अद्यापपर्यंत प्रकरण अपुर्ण असल्याने जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. अशा अर्जदारांनी दि. 31 जानेवारी 2022 पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करण्यात आलेली सर्वच प्रकरणे समितीने तपासली असुन वैध प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत व त्रुटीमध्ये असलेल्या प्रकरणांना ई-मेल संदेश, पत्र व एस.एम.एस.ब्दारे त्रुटी कळविण्यात आली आहे. परंतु प्रकरण सादर केलेल्या दिनांकापासुन 45 दिवसांचा कालावधी लोटलेला असुन अद्यापपर्यंत अर्जदाराकडुन ऑनलाईन त्रुटीची पुर्तता केलेली नाही. अशा अर्जदार व उमेदवारांनी कार्यालयीन सुटटीचे दिवस वगळुन दि. 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रकरणाची सद्यस्थिती प्रत्यक्षात येवुन जाणुन घ्यावी अथवा ऑनलाईन त्रुटीपुर्तता करुन घ्यावी.

            ई-मेल व्दारे पाठविण्यात आलेल्या त्रुटीची पुर्तता करु शकत नसल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा. जेणेकरुन अर्जदारांना व उमेदवारांना त्यांच्या प्रकरणात आलेल्या अडचणी दुर करता येतील व ऑनलाईल दस्तऐवज सादर करता येईल.  दि.25 फेब्रुवारी 2022 पर्यंत आपणाकडुन कुठलाच प्रतिसाद न मिळाल्यास आपणास जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे गृहीत धरुन प्रकरण नियमानुसार निकाली काढण्यात येईल.

तरी, दि. 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाईन आलेल्या त्रुटीची पुर्तता तात्काळ करुन घ्यावी. त्रुटीपुर्ततेअभावी आपला जातीदावा समितीकडुन फेटाळण्यात आल्यास तसेच शैक्षणिक प्रकरणी प्रवेशासाठी, निवडणुक आणि सेवेसाठी अपात्र ठरल्यास याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार व उमेदवारांची राहील. यांस समिती जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी. असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी कळविले आहे.

00000 

7 फेब्रवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 


7 फेब्रवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर दि.3 फेब्रुवारी : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

सोमवार दि. 7 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज सादर करावा. तदनंतरच तक्रार अर्ज स्वीकारण्यात येईल, तसेच निवेदन स्वीकारण्याची वेळ दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत राहील.या लोकशाही दिनात नागरिकांनी मास्क घालणे व सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य राहील.

00000

Wednesday, 2 February 2022

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि. 2 फेब्रुवारी : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि.3 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता नवीन पद्मशाली भवन, कन्या शाळेजवळ, सिंदेवाही येथे पद्मशाली समाजाच्या वतीने आयोजित नवीन पद्मशाली भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 12 वाजता सिंदेवाही येथून नागपूरकडे प्रयाण.

शनिवार, दि. 5 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन. दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंतचा कालावधी शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे अभ्यागंतासाठी राखीव. व शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे मुक्काम.

00000

जिल्ह्यात बुधवारी 739 कोरोनामुक्त तर 206 नवे बाधित

 

जिल्ह्यात बुधवारी 739 कोरोनामुक्त तर 206 नवे बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 1976

चंद्रपूर, दि. 2 फेब्रुवारी : जिल्ह्यात गत 24 तासात 739 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 206 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

 आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 64, चंद्रपूर 17, बल्लारपूर 15, भद्रावती 10, ब्रह्मपुरी 10, सिंदेवाही 1, मुल 1, सावली 5, गोंडपिपरी 1, राजुरा 8, चिमूर 8, वरोरा 60,कोरपना 4 तर जिवती येथे 2 रुग्ण आढळून आले असून नागभीड, पोंभूर्णा व  इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 97 हजार 864  वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 94 हजार 337 झाली आहे. सध्या 1976 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 47 हजार 308 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 47 हजार 615 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1551 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यात कोविड-19 च्या निर्बंधांना शिथिलता

 जिल्ह्यात कोविड-19 च्या निर्बंधांना शिथिलता

चंद्रपूर दि. 2 फेब्रुवारी : 30 जानेवारी 2022 रोजी ज्या जिल्हयांमध्ये पहिला डोजचे प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा जास्त तसेच दोन्ही डोसचे प्रमाण 70 टक्के असेल, अशा जिल्ह्यांमध्ये निर्बंधात शिथिलता देण्याच्या शासनाच्या सूचना आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात लसीकरणाचा पहिला डोज 94.71 टक्के तर दुस-या डोसची टक्केवारी 72.21 टक्के आहे. त्यामुळे जिल्हयात सवलती लागू करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.

जिल्ह्यात ह्या सवलती लागू :

सर्व राष्ट्रीय उद्याने आणि सफारी नियमित वेळेनुसार ऑनलाइन तिकीटासह खुली राहतील. परंतु भेटी  देणा-या सर्व अभ्यागतांचे पूर्णपणे लसीकरण अनिवार्य असेल. कोविड 19 या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर संबंधित नियंत्रण अधिका-यांनी गर्दी टाळण्याचे अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात. ब्युटी पार्लर, केश कर्तनालयासाठी लागू केलेल्या समान निर्बंधांच्या अधीन स्पा 50 टक्के क्षमतेसह कार्यरत राहू शकतात, अंत्यसंस्कारात सहभागी होणा-या व्यक्तीच्या संख्येवर मर्यादा नसेल.

निर्बंधांना शिथिलता:

जिल्ह्यात आदेशांमध्ये नमूद केलेल्या निर्बंधांना शिथिलता देण्यात येत आहे. त्यामध्ये स्थानिक प्राधिकरणांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार उद्याने, बगीचे खुली राहतील. एम्युजमेंट पार्क, थीम पार्क 50 टक्के क्षमतेसह कार्यरत राहतील. जलतरण तलाव, जल उद्याने 50 टक्के क्षमतेसह खुली राहतील.  रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेसह स्थानिक प्राधिकरणाने ठरविलेल्या वेळेनुसार चालू राहतील. शहरी भागाचे अधिकार हे आयुक्त, महानगरपालिका, मुख्याधिकारी नगर परिषद / पंचायत यांना व ग्रामीण भागाकरीता तहसीलदार यांना राहतील. शहरी व ग्रामीण भागावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी (महसूल) यांना राहतील.  भजन आणि इतर सर्व सांस्कृतिक आणि लोक करमणुकीच्या कार्यक्रमांना हॉल,पंडालच्या 50 टक्के क्षमतेसह परवानगी राहील. यासाठी संबंधित तहसीलदार यांची परवानगी घेणे अनिवार्य असेल.

विवाहामध्ये खुल्या मैदानाच्या आणि बँकेत हॉलच्या क्षमतेच्या 25 टक्के पर्यंत किंवा 200 यापैकी जे कमी असेल तेवढ्या व्यक्तिंना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. यासाठी संबंधित तहसीलदार यांची परवानगी घेणे अनिवार्य असेल. वरील बाबी व्यतिरीक्त उर्वरित बाबींकरिता यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशातील तरतूद लागू राहतील.

कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी उपरोक्तप्रमाणे निर्गमित करण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार व अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहतील. सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 1 फेब्रुवारी 2022 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

00000