Search This Blog

Thursday, 2 June 2022

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा


 पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि. 2 जून : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 3 जून 2022 रोजी, सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन. स. 10.45 वा. एसटी वर्कशॉप, तुकूम येथे शेतकरी उत्पादक कंपनी मालविक्री केंद्राचे उद्घाटन. 11 वा. पावसाळ्यापूर्वी करावयाचे नियोजन, खरीप हंगामासाठी निविष्ठा उपलब्धता तसेच मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानसंदर्भात वीस कलमी सभागृहात आढावा बैठक. 11.45 वा. जंगलात लागलेला वणवा व कळमना तालुका बल्लारपूर येथे लागलेली आग आणि वन हिंस्त्र प्राण्यांमुळे नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यासंदर्भात आढावा बैठक. दुपारी 12:30 वा. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील विकास कामांबाबत आढावा बैठक. दु. 1 वा. वेकोली बल्लारपूर एरियाअंतर्गत कामगारांच्या सुरक्षेबाबत तसेच वेकोलिकडून पोवणी येथील शेतकऱ्यांच्या सुटलेली शेतजमीन कोळसा खाणीकरीता संपादित करण्याबाबत आढावा बैठक. दु. 1.30 ते 2 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दु. 2 वा. नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 5 वा. पत्रकार परिषद. सायं. 6 वा. पक्ष कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 7:30 वा. रयतवारी कॉलनी, येथे श्री. कोत्तावार यांच्या निवास्थानी सांत्वनपर भेट. रात्री 8.30 वा. हिराई विश्रामगृह, येथे मुक्काम.

शनिवार दि. 4 जून सकाळी 10 वाजता मुरमाडी ता. सिंदेवाही येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.  स. 10.45 वा. किन्ही येथे मातोश्री ग्रामसमृद्धी शेत,पांदण रस्ते योजनेअंतर्गत पांदण रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स. 11.15 वा. कळमगाव गन्ना, येथे आगमन व उमा नदीवरील बांधकाम सुरू असलेल्या मोठ्या पुलाची पाहणी. स. 11:30 वा. मोहाडी येथे पांदण रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. स. 11.45 वा. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, पारेषण कंपनीच्यावतीने मोहाडी येथील नवीन 33 केव्ही सबस्टेशनचे बांधकाम करण्यासाठी जागेची पाहणी.

दुपारी 12 वा. सांत्वनपर भेट. दु. 12.30 वा. कारवा येथील वनविभागाचे विश्रामगृह येथे आगमन व वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत कारवा गावाचे पुनर्वसनाबाबत नागरिकांसोबत चर्चा. दु. 1:30 वा. सिंदेवाही येथे आगमन व नवनिर्मित तहसील कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सुरु असलेल्या बांधकामाची पाहणी. दु. 1.45 वा. शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन. दु. 2 वाजता तहसील कार्यालय, सिंदेवाही येथे तालुक्यातील विकास कामासंदर्भात आढावा बैठक. सायंकाळी 4 वा. गडमोशी येथे काँक्रिट रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 4.30 वा. तांबेगडी मेंढा, येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायं. 5.30 वा. कच्चेपार येथे कच्चेपार कॅनॉल क्रॉसिंग पूलाचे लोकार्पण आणि पांदन रस्त्याचे भूमिपूजन. सायं. 6.30 वा. कच्चेपार ता. सिंदेवाही येथून गडचिरोलीकडे प्रयाण.

रविवार दि. 5 जून  सकाळी 10:30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन. स. 10.45 ते 11.30 वाजेपर्यंत अभ्यागतांसोबत चर्चा. स. 11:30 वा. ब्रह्मपुरी शहरासह तालुक्यातील विकास कामांबाबत आढावा बैठक. दु. 2.30 ते 3 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. सायं. 4 वा. किन्ही ता. ब्रह्मपुरी येथे आगमन व आरोग्य उपकेंद्र किन्हीच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायं. 4.45 वा. रणमोचन येथे, सायं. 5 वा. खरकाडा येथे, 5.45 वा. निलज येथे, सायं. 6.15 वा. रुई, येथे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 6.30 वा. गांगलवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. रात्री 7.30 वा. गांगलवाडी येथून नागपूरकडे प्रयाण.

००००००

6 जुन रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 


6 जुन रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 1 जुन : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

सोमवार दि. 6 जुन 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज सादर करावा. तदनंतरच तक्रार अर्ज स्व‍िकारण्यात येईल, तसेच निवेदन स्व‍िकारण्याची वेळ दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत राहील. या लोकशाही दिनात नागरिकांनी मास्क घालणे व सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य राहील. असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याचे आवाहन

 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 1 जुन : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक जानेवारी-2021 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या परंतू अद्यापपर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूरकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर न केलेल्या उमेदवारांची यादी संबंधित पंचायत समिती व तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे.

तसेच ज्या उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र तयार झाले आहे व त्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केले नाही. अशा उमेदवारांची यादी देखील संबंधित तहसील व पंचायत समिती कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. अशा उमेदवारांनी तयार झालेले जात वैधता प्रमाणपत्र हे त्यांच्या लॉग इन आयडी व ईमेल-आयडीवर पाठविण्यात आले आहे. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करून जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तात्काळ सादर करावे. जेणेकरून, उमेदवारांचे सदस्यत्व रद्द होणार नाही.

 सदर प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यास अडचण येत असल्यास जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाशी संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.

00000

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

Ø युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 1 जुन : सन 2022-23 मध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम (सीएमइजीपी) च्या उद्दीष्ट पुर्तीबाबत उद्योग विभागाच्या फ्लॅगशीप कार्यक्रमांतर्गत युवक-युवतींना उद्योजक बनविण्यासाठी, सक्षम करणारी आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणारी योजना आहे.

जिल्ह्यातील युवक-युवतींच्या सर्जनशिलतेला वाव मिळून आपल्या जिल्ह्यात स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करणे, त्याद्वारे जिल्ह्यात ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात सुक्ष्म, लघु उपक्रमाव्दारे व्यापक रोजगार संधी निर्माण होण्यासाठी शासनाच्या आर्थिक सहाय्यातून प्रकल्प उभारणीस हातभार लावणे हा या योजनेचा उद्देश आहे.

सन 2021-22 मध्ये या योजनेचे 100 टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. त्यानुसार शासनाने सन 2022-23 या वर्षाकरीता चारपट अधिक निधी उपलब्ध करून दिल्याने जास्तीत जास्त युवक युवतींना स्वयंरोजगाराकरीता लाभ देण्यात येणार आहे.

या आहेत योजनेच्या पात्रता व अटी :

महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेला व किमान 18 ते 45 वर्षे वयोगटातील स्वयंरोजगार करू इच्छिणारा उमेदवार यायोजनेसाठी पात्र आहे. विशेष प्रवर्गासाठी अनु. जाती, अनु.जमाती, महिला, अपंग, माजी सैनिकांकरीता 5 वर्षाची अट शिथिल आहे.  रू. 10 लाखावरील प्रकल्पासाठी किमान शैक्षणिक पात्रता 7 वी उत्तीर्ण व रू. 25 लाखावरील प्रकल्पांसाठी किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराने यापूर्वी अनुदान समाविष्ट असलेल्या राज्य तसेच केंद्र शासनाच्या, महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

योजनेची प्रकल्प मर्यादा किंमत हि प्रक्रिया व निर्मिती प्रकल्पांसाठी कमाल रूपये 50 लाख तसेच सेवा, कृषीपूरक उद्योग प्रवर्गातील प्रकल्पांसाठी कमाल रूपये 10 लाख आहे. योजनेच्या अमंलबजावणीसाठी शहरी व ग्रामिण भागासाठी जिल्हा उद्योग केंद्र, ग्रामिण भागासाठी जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालय, एकत्रीत समन्वय व सनियंत्रण  महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांचे राहिल.  

वैयक्तिक मालकी, भागीदारी, वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेले बचतगट, प्रकल्प खर्च उभारणी व राज्य शासनाचे आर्थीक सहाय्य (मार्जीन मनी अनुदान) मंजूर प्रकल्प किंमतीनुसार राहील. बँक, वित्तीय संस्था यांचा सहभागात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत स्वगुंतवणूक व राज्य शासनाचे (अनुदान स्वरूपातील) आर्थिक सहाय्य या व्यतीरीक्त आवश्यक 60 ते 75 टक्के अर्थसहाय्य बँकामार्फत उपलब्ध होईल. राज्यातील राष्ट्रीयीकृत बँका, शेड्युल्ड बँका, खाजगी बँका आदीमार्फत बँक कर्ज उपलब्ध होईल.

00000

महिलांनी उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेऊन स्वयंरोजगार करावा - डॉ. मिताली सेठी





 

महिलांनी उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेऊन स्वयंरोजगार करावा

- डॉ. मिताली सेठी

चंद्रपूर, दि. 1 जून :  जिल्ह्यातील महिलांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणारे रुरलमार्ट निर्माण करून देण्याचे काम सुरू असुन उपस्थित महिलांनी उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमाचा लाभ घेऊन स्वयंरोजगार करावा. असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले.

कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग, जिल्हा प्रशासन आणि युथ एड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जिल्हा परिषदेतील मा.सा.कन्नमवार सभागृहात दि. 28 ते 30 मे 2022 या कालावधीत  करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

या तीन दिवसीय शिबिराचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगडे, सुशिलाबाई रामचंद्र मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्कचे प्राचार्य डॉ.सुनील साकुरे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे, नाबार्ड व्यवस्थापक तृणाल फुलझेले, धारीवाल पावर प्लांटचे दिनेश गाखर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुशील भुजाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

            संपूर्ण देशात कोरोनाचे संकट ओढवले, या परिस्थितीचा विपरीत परिणाम ग्रामीण तसेच शहरी अर्थव्यवस्थेवर झाला. अनेकांच्या रोजगारावर तसेच लघू आणि मध्यम व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. या अनुषंगाने राज्य शासन, जिल्हा प्रशासन व युथ एड फाऊंडेशन यांच्या एकत्रित प्रयत्नातून लघु व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्याकरिता उद्यमिता यात्रा व विनामूल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील 294  प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत अजय बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा स्वाती धोटकर यांनी जलपर्णी वनस्पतीपासून टाकाऊ पासून टिकाऊ व सुंदर अशा सुशोभनिय पुष्पगुच्छ शोभेच्या भेटवस्तू तयार करण्याचा पुढाकार घेतला आहे, या उपक्रमाची दखल घेऊन  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी त्यांचा सत्कार केला व अशा महिला उद्योजकांना प्रशिक्षणासाठी जिल्हा प्रशासन  प्रोत्साहन व सहकार्य करत असल्याचे सांगितले.

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची व योजनांची माहिती देत प्रशिक्षणातून तयार होणाऱ्या नवीन उद्योजकांना मदतीचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे यांनी एकविसाव्या शतकातील जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताचे भक्कम योगदान आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांनी जिद्दीने पुढाकार घेऊन स्वयंरोजगारातून जिल्ह्याच्या विकासामध्ये हातभार लावतील. कार्यक्रमाला उपस्थित महिला व युवकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करावा. असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे महात्मा गांधी नॅशनल फेलो अजय चंद्रपट्टन यांनी तर आभार सहाय्यक प्राध्यापक किरणकुमार मनुरे यांनी मानले.

000000