Search This Blog

Monday, 4 July 2022

हातमाग विणकरांसाठी कौशल्य विकास करण्याकरीता केंद्र पुरस्कृत समर्थ योजना

 


हातमाग विणकरांसाठी कौशल्य विकास करण्याकरीता केंद्र पुरस्कृत समर्थ योजना

चंद्रपूर, दि. 4 जुलै : केंद्र शासनामार्फत समर्थ योजनेचे दिशा निर्देशाप्रमाणे हातमाग विणकरांसाठी कौशल्य विकास करण्याकरीता केंद्र पुरस्कृत समर्थ योजना राबविण्यात येत आहे.  या योजनेबाबतचे तपशिल व दिशा निर्देश Samarth-texttiles.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तरी, या योजनेअंतर्गत समर्थ प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याकरीता प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्था, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, ट्रस्ट, कंपनी व इतर सेवाभावी संस्था व वस्त्रोद्योग विभागातील संस्था पात्र असल्यास प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग सीमा पांडे यांनी कळविले आहे.

००००००

व्हॉलीबॉल खेळाडू शोध प्रक्रियेतून 16 वर्षाखालील मुलींचे वीस दिवसीय प्रशिक्षण शिबीर

 

व्हॉलीबॉल खेळाडू शोध प्रक्रियेतून 16 वर्षाखालील मुलींचे वीस दिवसीय प्रशिक्षण शिबी

चंद्रपूर, दि. 4 जुलै : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत व्हॉलीबॉल खेळ व खेळाडू यांच्या भवितव्याचा विचार करून शोध प्रक्रियेतून 16 वर्षाखालील मुलींचे 20 दिवसाचे प्रशिक्षण शिबीर शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पी.सी.पांडियन (तामिळनाडू) यांचे मार्गदर्शनात प्रशिक्षण मिळणार असून विविध स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यासोबतच भविष्यात या खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होऊ शकेल.

या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील (सेंटर-1, अटॅकर-2, युनिव्हर्सल/ ब्लॉकर-2) असे जास्तीत जास्त 5 खेळाडू मुली ज्यांची जन्मतारीख 1 जानेवारी 2023 रोजी 16 वर्षाखालील असावी. उंची 175 सेंटीमीटर व त्यापुढे शाळेत शिकत असलेली किंवा नसलेली अशा खेळाडूंनी पुणे येथे प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी चंद्रपूर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा व्हॉलीबॉल या खेळाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप उईके यांचेशी 9975862469 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

००००००

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने कलम 37(1) व (3) लागू


जिल्ह्यात कायदा  सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने कलम 37(1)  (3) लागू

चंद्रपूर, दि. 4 जुलै : जिल्ह्यात कायदा  व  सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने 1 ते 15 जुलै 2022 च्या रात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) लागू करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी  अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.

या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने  विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. तरी, सदर कालावधीत कोणतीही व्यक्ती शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीच्या आकृत्या, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, तसेच यामुळे सभ्यता आणि नीतिमत्ता यास धोका पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे किंवा आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे, त्याचा जनतेत प्रसार करणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात येत आहे.

तहसीलदार तथा, तालुका दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणीही सभा, मोर्चा, उत्सव व मिरवणुका काढू नये. पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. याची नोंद घ्यावी. सदर आदेश दि. 1 जुलै ते 15 जुलै 2022 चे रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राकरीता लागू राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

०००००००

Sunday, 3 July 2022

मानवी तस्करी व व्यापारी आणि लैंगिक शोषणाचे बळी या विषयावर कार्यशाळा

 


मानवी तस्करी व व्यापारी आणि लैंगिक शोषणाचे बळी या विषयावर कार्यशाळा

 चंद्रपूर, दि. 3 जुलै : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, आरोग्य विभाग टाटा ट्रस्ट, सिटी पोलीस स्टेशन तसेच चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने देह विक्री करणाऱ्या महिलांना प्रशिक्षित करण्याबाबत (मानवी तस्करी व व्यापारी आणि लैंगिक शोषणाचे बळी) या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

सदर कार्यशाळेला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी, संबोधन ट्रस्टचे अध्यक्ष राज काचोडे, धनंजय तावाडे, टाटा ट्रस्टचे डॉ.आशिष बारब्दे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश जगताप प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा कविता बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात दि. 2 जुलै रोजी रेड लाईट एरिया, गौतम नगर, चंद्रपूर येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (मानवी तस्करी व व्यापारी आणि लैंगिक शोषणाचे बळी) योजना 2015 बाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी यांनी मार्गदर्शन केले. संबोधन ट्रस्टचे अध्यक्ष राज काचोडे यांनी संबोधन ट्रस्ट या संस्थेमार्फत देह विक्री करणाऱ्या महिलांसाठी केली जाणारी मदत स्पष्ट केली. तर धनंजय तावडे यांनी मानवी तस्करी प्रतिबंध व उपाय योजनेबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार एडवोकेट एम.बी. असरेट यांनी केले.

00000

Saturday, 2 July 2022

जिल्ह्यात 1 जुलै ते 15 जुलै 2022 पर्यंत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा

 



जिल्ह्यात 1 जुलै ते 15 जुलै 2022 पर्यंत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा

 दुर्गापुर पीएचसी येथे ओआरटी झिंक कॉर्नर कार्यक्रम

 

चंद्रपूर दि. 2 जुलै: जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, दुर्गापूर येथे विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा अंतर्गत ओआरटी झिंक कॉर्नर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.माधुरी मेश्राम वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती राजगोपाल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एन.जे.शृंगारे  प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्गापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष वाकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते.

विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा कार्यक्रमात जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षापर्यंतच्या 1 लक्ष 62 हजार 412 ग्रामीण, 37 हजार 568 शहरी तर 35 हजार 543 महानगरपालिका असे एकूण 2 लक्ष 35 हजार 523 मुलामुलींना ओआरटी झिंकचे जिल्ह्यातील 2 हजार 3 आशा कर्मचाऱ्यांमार्फत वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासोबतच स्वच्छता राखण्यासाठी माहिती व समुपदेशन करण्यात येणार आहे.

देशातील अर्भक मृत्यूदर व बाल मृत्यूदर कमी करणे हे केंद्र व राज्यशासनाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. देशात पाच वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून 7 टक्के बालके अतिसरामुळे दगावतात आणि ह्या बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्यातील सर्व जिल्ह्यात 1 जुलै ते 15 जुलै 2022 पर्यंत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येत आहे.

नियंत्रण पंधरवाडा कार्यक्रमाची जनजागृती करून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार यांनी यावेळी केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रमाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन मुरलीधर नन्नावरे तर आभार डॉ.आशिष वाकडे यांनी मानले. कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र, दुर्गापुर येथील कर्मचारी उपस्थित होते.

00000