Search This Blog

Monday, 1 August 2022

राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे जिल्हाधिका-यांचे हस्ते उद्घाटन



 

राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे जिल्हाधिका-यांचे हस्ते उद्घाटन

चंद्रपूर, दि. 1 ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या सुचनेप्रमाणे 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकाविणे अपेक्षित आहे. बचत गट आणि स्वस्त धान्य दुकानातून हे नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंचायत समिती, चंद्रपूर येथे राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटनप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.मिताली सेठी,  अति. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील  हर घर तिरंगा उपक्रमाची  यशस्वी अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिका-यांनी मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रध्वज प्रत्येक घरांमध्ये व्यवस्थित वेळेत पोहचविण्याकरीता नियोजन  करण्याबाबत डॉ. मिताली सेठी  यांनी सूचना  केल्यात.

 

याप्रसंगी जिल्हा अभियान व्यवस्थापक मनोहर वाकडेजिल्हा व्यवस्थापक  प्रवीण भांडारकर, तालुका अभियान व्यवस्थापक शीतल देरकर,  प्रतीक्षा खोब्रागडे तालुका  व्यवस्थापक जयश्री नागदेवतेसर्व प्रभाग समन्वयक आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या जिल्हा व्यवस्थापन कक्ष व पंचायत समिती व्यवस्थापन कक्ष यांच्या समन्वयातून प्रत्येक कुटुंबापर्यंत राष्ट्रध्वज पोहोचविण्याकरीता उमेद अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये पंचायत समिती स्तरावर राष्ट्रध्वज विक्री केंद्र उघडण्यात येत आहेत.

०००००००

जिल्ह्यात “मोहरम”च्या पार्श्वभुमीवर कलम 36 लागू

 


जिल्ह्यात मोहरमच्या पार्श्वभुमीवर कलम 36 लागू

चंद्रपूर, दि. 1 ऑगस्ट : जिल्ह्यात  31 जुलै  ते  9 ऑगस्ट 2022  दरम्यान मोहरम  हा सण मुस्लीम धर्मीय व काही प्रमाणात हिंदु समाजातर्फे साजरा करण्यात येणार आहे.  त्यादृष्टीने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दि. 30 जुलै ते 9 ऑगस्ट 2022 चे रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू करण्यात आले आहे.

या कालावधीत सार्वजनिक  शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविण्याबाबत, सभेचे आयोजन व मिरवणूक काढण्याबाबत, त्याठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत, लाऊडस्पीकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी  कळविले आहे.

हे आहेत अधिकार :

मिरवणूक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांच्या वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पुजास्थानाच्या जवळ लोकांच्या वागणुकीस निर्बंध घालण्याचे अधिकार, मिरवणुकीस बाधा होणार नाही याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पूजास्थळी लोकांच्या वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार,  सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे इत्यादी निर्बंध घालण्याचे अधिकार, रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर लाऊड स्पीकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, तसेच कलम 33, 35 ते 40 व 45 मुंबई पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सूचना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहे.

सदर आदेश लागू असतांना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजवणे, लाऊडस्पीकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घ्यावी. सर्व बाबतीत पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. सदर आदेश दि. 30 जुलैच्या रात्री 12 वाजतापासून ते दि. 9 ऑगस्ट 2022 च्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीपर्यंत अंमलात राहील.

00000

10 ऑगस्ट रोजी आयटीआय मधील निर्लेखित साहित्य विक्रीकरीता जाहीर लिलावाचे आयोजन

 10 ऑगस्ट रोजी आयटीआय मधील निर्लेखित साहित्य विक्रीकरीता जाहीर लिलावाचे आयोजन

Ø खरेदीधारकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 1 ऑगस्ट : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रह्मपुरी येथील विविध व्यवसायाची कालबाह्य झालेली निर्लेखित अवजारे, सयंत्रे व साहित्य, उपकरणे, संगणक आहे, तशाच अवस्थेत विक्री करण्यासाठी बुधवार, दि. 10 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे.

इच्छुक निर्लेखित साहित्य खरेदीदारांनी या लिलावात सहभागी होण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खेड रोड शिवाजीनगर, ब्रह्मपुरी येथे त्यांच्याकडे असलेल्या अधिकृत अभिलेख्यासह उपस्थित रहावे. किमान तीन खरेदीधारक उपस्थित झाल्याशिवाय लिलावाची प्रक्रिया करण्यात येणार नाही. लिलावाच्या अटी व विक्री करावयाचे साहित्य संस्थेच्या कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत, असे ब्रह्मपुरी,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य एन. डी. पिसे यांनी कळविले आहे.

००००००

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

Ø जिल्ह्यातील 96 उमेदवारांची प्राथमिक निवड

चंद्रपूर,दि. 1 ऑगस्ट : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व कर्मवीर महाविद्यालय, मुल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळावा कार्यक्रम 29 जुलै रोजी कर्मवीर महाविद्यालय, मुल येथे पार पडला.

सदर मेळावा कार्यक्रमाचे उद्घाटन कर्मवीर महाविद्यालय, मुलच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, सक्सेस कम्प्युटर एज्युकेशन मुलचे संचालक नितीन येरोजवार, सहाय्यक प्राध्यापक प्रवीण उपरे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी शैलेश भगत उपस्थित होते.

या मेळाव्यामध्ये अॅलेस्टी म्युच्युअल फंड निधी लिमिटेड, स्पंदन स्फूर्ती फायनान्स लिमिटेड, डी मार्ट, बजाज ऑटो लिमिटेड, आस्क फर्स्ट एचआर डेस्क, हेक्सावेअर कंपनी, साथ आऊटसोर्सिंग कंपनी लिमिटेड, नवभारत फर्टीलायझर लिमिटेड या कंपन्यांनी सहभाग नोंदविला. या मेळाव्यामध्ये जवळपास 165 उमेदवारांनी नोंदणी केली व संबंधित कंपनीकडे असलेल्या रिक्त पदासाठी प्राथमिक मुलाखती दिल्या. यामध्ये विविध कंपन्यांनी जिल्ह्यातील 96 उमेदवारांची प्राथमिक निवड केली असून अंतिम निवडीकरिता संबंधित उमेदवारास कंपनीमार्फत त्यांच्या मुख्यालयी बोलाविण्यात येणार असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश भगत यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. गजानन आगलावे तर आभार गजानन घुमडे यांनी मानले.

००००००

जिल्हास्तरीय नेहरू कप हॉकी स्पर्धा 2022-23

 

जिल्हास्तरीय नेहरू कप हॉकी स्पर्धा 2022-23

Ø 5 ऑगस्टपर्यंत प्रवेशिका व स्पर्धा सहभाग शुल्क जमा करण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 1 ऑगस्ट : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तर ज्युनियर व सब ज्युनियर नेहरू कप हॉकी स्पर्धेचे आयोजन ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करण्यात येणार आहे.

जवाहरलाल नेहरू हॉकी टूर्नामेंट सोसायटी, नवी दिल्ली च्या वतीने सन 2022-23 या वर्षातील राष्ट्रीय ज्युनियर व सब ज्युनियर नेहरू कप हॉकी स्पर्धेचे आयोजन दि. 02 सप्टेंबर ते 09 ऑक्टोंबर 2022 या कालावधी शिवाजी स्टेडियम, नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यापूर्वी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तर स्पर्धेचे आयोजन करावे लागणार आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील 15 वर्षाखालील मुले (सब ज्युनियर) आणि 17 वर्षाखालील मुले व मुली (ज्युनियर) या गटांमध्ये हॉकी स्पर्धेचे आयोजन ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंची जन्मतारखेनुसार वयोमर्यादा 15 वर्षे मुले (सब ज्युनियर) 1 नोव्हेंबर 2007 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. 17 वर्षे मुले व मुली (ज्युनियर) 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा / असावी.

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व शाळा व संघांनी आपल्या संघाच्या प्रवेशिका तसेच स्पर्धा सहभाग शुल्क, फी दि. 5 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे जमा करावी. अधिक माहितीकरीता क्रीडा मार्गदर्शक संदीप ऊईके यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ज्या संघांनी नोंदणी वेळेत सादर केली नाही, अशा संघांना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, याची नोंद घ्यावी.

सन 2022-23 च्या स्पर्धा कालावधीत प्रशासनाकडून कोविड-19 बाबत काही सूचना आल्यास त्यानुसार निर्णय घेण्यात येईल. सद्य:स्थितीत कोविड-19 च्या प्रादुर्भावानंतर होणाऱ्या या स्पर्धेत जास्तीत-जास्त संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

०००००००