Search This Blog

Tuesday, 1 August 2023

जागतिक बालतस्करी विरोधी दिनानिमित्त जिल्ह्यात बालतस्करी विरुद्ध जनजागृती मोहीम



जागतिक बालतस्करी विरोधी दिनानिमित्त जिल्ह्यात बालतस्करी विरुद्ध जनजागृती मोहीम

चंद्रपूर, दि. 01 : जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त, रुरल अँड अर्बन डेव्हलपमेंट युथ असोसिएशन, गडचिरोली अंतर्गत चंद्रपूर येथील असेस टू जस्टिस प्रकल्पान्वये, जिल्ह्यातील हॉटस्पॉट असलेले ठिकाण जसे, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, बाजारपेठ, चंद्रपूर व बल्लारपुर ही शहरे आदी तालुक्यातील ठिकाणी बालतस्करी विरुद्ध जनजागृती मोहीम राबविण्यात आली.  यावेळी माहिती फलके, पत्रके वितरीत करुन तसेच घोषवाक्य देत प्रभात फेरी काढण्यात आली.

बालतस्करी विरुद्ध जनजागृती मोहिमेला बल्लारपूर स्टेशन प्रबंधक श्री. नंदनवार, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, रेल्वे पोलिस कर्मचारी प्रवीण गावडे  यांच्यासह असेस टु जस्टीस प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक नरेश मॅकलवार, समुपदेशिका राणी मेश्राम, कम्युनिटी सोशल वर्कर पुनम साळवे, सोनल रामटेके, बालाजी जाधव, शशिकांत मोकाशे, समन्वयक अभिषेक मोहरले, समुपदेशिका दिपाली मसराम, किरण बोरा आदींची उपस्थिती होती.

रुरल अँड अर्बन डेव्हलपमेंट युथ असोसिएशन गडचिरोली अंतर्गत जिल्ह्यात असेस टू जस्टिस प्रकल्प अनेक दिवसांपासून शाळा, अंगणवाडी, पंचायत समिती क्षेत्रात तसेच घरोघरी जाऊन बालतस्करी व बालमजुरी विरुद्ध जनजागृती मोहीम राबवित आहे. विशेष म्हणजे, नागरीकांना बालतस्करी थांबवण्यासाठी शपथ देखील देण्यात येत आहे. बाल तस्करी आणि बालमजुरी विरुद्ध लोकांमध्ये जागरूकता वाढवणे हे या मागचे उद्दिष्ट आहे.

 बालतस्करीच्या बाबतीत सामान्य नागरीकांमध्ये जागरूकतेच्या अभाव असल्यामुळे बालतस्करी थांबवण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही. देशात बालशोषण किंवा मुलांची तस्करी रोखणे हे एक मोठे आव्हान आहे.  असेस टू जस्टिस प्रकल्पाचे संस्थापक श्री. देवगडे म्हणाले आज अधिकाधिक नागरीक हरवलेल्या मुलांची तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत, हा एक मोठा बदल आहे. आम्ही तळागाळात सुरू केलेल्या जनजागृती मोहिमेमुळे लोकांची मानसिकता बदलली आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, एक हा मोठा बदल आहे. शासन आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांकडून मुलांची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

०००००००

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना


महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना

Ø जिल्ह्यातील युवक व नोदंणीकृत संस्थांकडून अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, दि. 01 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधुमक्षिकापालन) 10 जून 2019 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमीभावाने मध खरेदी, विशेष छंद, प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती आदीबाबत सहाय्य करण्यात येणार आहे.

मध केंद्र योजनेनुसार, अर्जदाराकडे स्वतःची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येणार असून अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.  केंद्रचालक प्रगतशील मधपाळ या घटकांतर्गत संबंधित व्यक्ती हा किमान 10वी उत्तीर्ण असावा तर वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे. संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेतजमीन असावी.

लाभार्थ्यांकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्था या घटकांतर्गत संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडेतत्त्वावर घेतलेली किमान 1000 चौ.फूट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजनेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी व संस्थांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री. इंगळे यांनी केले आहे.

००००००

अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेकरीता अर्ज आमंत्रित

 

अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेकरीता अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, दि. 01 : केंद्रीय क्रीडा नियंत्रक मंडळ, नवी दिल्ली यांच्यावतीने विविध खेळ प्रकारातील "अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा" दरवर्षी आयोजित केल्या जातात. केंद्रीय नियंत्रक मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धा निरनिराळ्या राज्य शासनाच्यावतीने त्या-त्या राज्यामध्ये आयोजित केल्या जातात. या स्पर्धेसाठी विविध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ निवड चाचणी घेऊन स्पर्धेसाठी पाठवायचे आहे. राज्य शासनाकडून सचिवालय जिमखान्यास या स्पर्धेसाठी शासनाच्या विविध खेळ प्रकारातील संघ निवडण्याची व त्यांच्या प्रशिक्षण शिबिराची जबाबदारी शालेय शिक्षण व क्रीडा विभागास सोपविण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात कार्यरत असलेले खेळाडू व कर्मचाऱ्यांना टेबल टेनिस, बॅडमिंटन फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, कॅरम, बुद्धिबळ, अथलेटिक्स, कबड्डी, शरीर सौष्ठव, कुस्ती, लॉन टेनिस, खो-खो, योगासत्र, संगीत, नृत्य व लघुनाट्य आदी क्रीडा व कला प्रकारात सहभाग घ्यावयाचा असल्यास त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथून प्राप्त करून कार्यालय व विभाग  प्रमुखांच्या  मान्यतेने दोन  प्रतीत  (प्रत्येक खेळ प्रकारासाठी वेगळे)  व्यवस्थापक, सचिवालय  जिमखाना, मुंबई 400032 यांच्याकडे स्पर्धेपूर्वी टपालाद्वारे, व्यक्तिशः किंवा ई-मेलद्वारे sachivalayagym@rediffmail.com/sachivalayagym1954@gmail.com  वर पाठवावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

०००००००

उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना मिळणार शासनाकडून पुरस्कार

 

उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना मिळणार शासनाकडून पुरस्कार

Ø सार्वजनिक गणेश मंडळाकडुन 5 सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज आमंत्रित

चंद्रपूर,दि. 01 : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णय क्र.पुलदे-2023/ प्र.क्र.1/सां.का.2, दि. 4 जुलै 2023 अन्वये, दि. 19 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणाऱ्या सन 2023 च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरीता स्पर्धा आयोजित करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

त्यानुसार, सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या 10 निकषांची पूर्तता करणाऱ्या, व करू शकणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com  या ई-मेलवर दि. 5 सप्टेंबर 2023 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अर्जाचा नमुना 4 जुलै, 2023 च्या शासन निर्णयात उपलब्ध असून सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे  नायब तहसिलदार (सामान्य) गिता उत्तरवार यांनी कळविले आहे.

०००००००

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित


 सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

Ø नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था, उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक, व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 01 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक/व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.  

सन 2019-20, 2020-21, 2021-22, व 2022-23 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

यापूर्वी अर्जदार संस्था ज्यांनी, सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वित्तीय वर्षाकरीता अर्ज केला आहे, त्यांना नव्याने या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी ज्या वर्षाकरीता अर्ज केला आहे त्या वर्षाकरीताचे चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा. तसेच यापूर्वी अर्ज केलेल्या व्यक्तींना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या वर्षासाठी, ज्या पुरस्काराकरीता अर्ज करण्यात येत आहे, त्या वर्षासाठी त्या पुरस्काराकरीता विहित केलेल्या अटीची पूर्तता करणे आवश्यक राहील.

समाजकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इच्छुकांनी सदर पुरस्कारासाठी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज नमूद कागदपत्रासह सादर करावे. विविध पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

००००००