महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना
Ø जिल्ह्यातील युवक व नोदंणीकृत संस्थांकडून अर्ज आमंत्रित
चंद्रपूर, दि. 01 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधुमक्षिकापालन) 10 जून 2019 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमीभावाने मध खरेदी, विशेष छंद, प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती आदीबाबत सहाय्य करण्यात येणार आहे.
मध केंद्र योजनेनुसार, अर्जदाराकडे स्वतःची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येणार असून अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. केंद्रचालक प्रगतशील मधपाळ या घटकांतर्गत संबंधित व्यक्ती हा किमान 10वी उत्तीर्ण असावा तर वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे. संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेतजमीन असावी.
लाभार्थ्यांकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्था या घटकांतर्गत संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडेतत्त्वावर घेतलेली किमान 1000 चौ.फूट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजनेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी व संस्थांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री. इंगळे यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment