Search This Blog

Wednesday, 11 December 2024

13 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा

 

13 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा

चंद्रपूरदि. 11 : दरवर्षी 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन निधी म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. आपल्या जिल्हयाचा ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम व माजी सैनिक मेळावा 13 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 10.30 वाजता नियोजन भवन येथे साजरा होणार आहे.

यावेळी ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य करणा-या कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांचा भेट वस्तुस्मृती चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सन्मानशहीद सैनिकांच्या वीर पत्नीवीर माता/पिताशोर्य चक्र प्राप्त सैनिक यांचा शॉल व श्रीफळ देवून सन्मान व माजी सैनिकांच्या पाल्यांना धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे.

तरी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने माजी सैनिकांनी हजर राहावेअसे आवहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे..

००००००

 

Sunday, 8 December 2024

जिल्ह्यात 100 दिवस क्षयरोग मोहिमेची सुरूवात


 जिल्ह्यात 100 दिवस क्षयरोग मोहिमेची सुरूवात

Ø 2 लक्ष 32 हजार 888 संशयित क्षयरुग्णांची होणार तपासणी

चंद्रपूर, दि. 8 : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात 100 दिवस क्षयरोग मोहिमेची सुरूवात खासदर प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. वरोरा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी जेनिथ चंद्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारेतहसीलदार योगेश कोटकर, श्री साई वर्धा पॉवर जनरेशन लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी श्रीकृष्ण किशोर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललितकुमार पटले आदी उपस्थित होते.  मान्यवरांच्या हस्ते  दीप प्रज्वलन व  रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपचारावरील क्षय रुग्णांना पोषण आहार किट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच क्षयरोगाची लक्षणे दिसताच आरोग्य संस्थेमध्ये जाऊन क्षयरोग तपासणी करावी तसेच क्षयरोग झाल्यास वेळेवर उपचार घेण्याचे आवाहन  केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी 100 दिवस मोहिमेसंदर्भात मार्गदर्शन केले.  मोहीम कालावधीत 364 आयुष्यमान आरोग्य  मंदिर येथे निक्षय शिबीर व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिमेचे आयोजन करून जोखीमग्रस्त गटातील 2 लक्ष 32 हजार 888 व्यक्तींची व संशयीत क्षयारुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे, असे सांगितले. यावेळी प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान उपक्रमांतर्गत निक्षय मित्र श्री साई वर्धा पॉवर जनरेशन लिमिटेड यांना  सन्मानीत  करण्यात आले. तसेच खासदारांच्या हस्ते उपचारावरील 10 क्षयरुग्नांना पोषण आहार किटचे  वाटप करण्यात आले. सोबतच वरोरा तालुक्यात टीबी चाम्पियन म्हणून क्षयरोगासंबंधित जनजागृती करण्याकरिता सहाय्य करणारे सचिन कामडी यांचाही सत्कार करण्यात आला. या दरम्यान सर्व उपस्थित मान्यवर, अधिकारी, पदाधिकारी, रुग्णालय कर्मचारी यांनी टीबी मुक्त भारत शपथ घेतली.  

100 दिवस क्षयरोग मोहिमेमध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे निक्षय शिबीर आयोजित करण्यात येत असून यामध्ये जोखीमग्रस्त गटातील लोकसंख्या व संशयीत क्षयरुग्ण यांची क्षयारोगाबाबत NAAT तपासणी व क्ष-किरण तपासणी करण्यात येणार आहे. जोखीमग्रस्त गटातील लोकसंख्येमध्ये खालील व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे. 1) 60 वर्षावरील व्यक्ती, 2)  मधुमेह व्यक्ती, 3) धुम्रपान करणारे व्यक्ती, 4) मागील पाच वर्षामध्ये क्षयरोग  झालेले व्यक्ती, 5) क्षय रुग्णांच्या घरातील व्यक्ती, 6) 18 पेक्षा कमी BMI असणारे व्यक्ती, 7) HIV बाधित व्यक्ती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललितकुमार पटले यांनी केले. संचालन सोनाली रासपायले यांनी तर  आभार उपजिल्हा रुग्णालय वरोराचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रफुल खुजे यांनी मानले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिक बोरकरउपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारीतालुका क्षयरोग पथकजिल्हा क्षयरोग केंद्र कर्मचारी आदी उपस्थित होते.

००००००

Friday, 6 December 2024

नझुल जमीनधारकांनी विशेष अभय योजनेचा लाभ घ्यावा

 

नझुल जमीनधारकांनी विशेष अभय योजनेचा लाभ घ्यावा

Ø नागपूर – अमरावती विभागासाठी मोहीम

चंद्रपूर, दि. 6 : नागपूर व अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनीबाबत ‘विशेष अभय योजना 2024-25’ शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या अनुषंगाने ज्या नझुल जमिनी निवासी प्रयोजनार्थ लिलावाद्वारे –प्रिमियम अथवा अन्य प्रकारे भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत, अशा जास्तीत जास्त नझुल जमीनधारकांनी विशेष अभय योजनेचा लाभ घ्यावा तसेच आपल्या नझुल जमिनी वर्ग ‘ब’ मधून ‘अ’ मध्ये करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

16 मार्च 2024 रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार नागपूर व अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनीबाबत विशेष अभय योजना सन 2024-25 च्या तरतुदी खालीलप्रमाणे विहित करण्यात आल्या आहेत.

1) ज्या नझुल जमिनी निवासी प्रयोजनार्थ लिलावाद्वारे – प्रिमियम अथवा अन्यप्रकारे भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत, त्यांनाच सदर योजना लागू राहील. 2) अभय योजना 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2025 या कालावधीसाठीच लागू राहील. 3) नझुल जमिनी निवासी प्रयोजनार्थ लिलावाद्वारे – प्रिमियम अथवा अन्यप्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या आहेत, त्यांनाच फ्री होल्ड करण्याकरीता (भोगवटदार – 1) अशा जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील येणा-या बाजारमुल्याच्या 2 टक्के एवढे अधिमुल्य आकारण्यात यावे. फ्री होल्ड करण्याकरीता पुर्वीचा भाडेपट्टा नियमित करणे, शर्तभंग नियमानुकूल करणे संदर्भात पूर्वीच्या अटी कायम राहतील. अभय योजनेत थकीत भाडेपट्ट्याची रक्कम 0.02 टक्के दराने आकारणी करण्यात येईल.

4) निवासी प्रयोजनार्थ प्रिमियम लिलावाद्वारे अन्यप्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनीचे वार्षिक भु-भाडे आकारणी 0.02 टक्के दराने व 31 जुलै 2025 या कालमर्यादेत भरणे अनिवार्य असेल. 31 जुलै 2025 पर्यंत प्रलंबित भु-भाडे न भरल्यास थकीत भू-भाडे व त्यावर वार्षिक 10 टक्के दंडनीय व्याज आकारणी करण्यात येईल. 5) विशेष अभय योजना समाप्तीनंतर 1 ऑगस्ट 2025 पासून शासन निर्णय 23.12.2015 व शासन निर्णय 2.3.2019 च्या तरतुदी लागू राहतील. त्यानंतर भु-भाडे अथवा फ्री होल्ड करण्यास अभय योजनेमध्ये मिळणारे फायदे मिळणार नाहीत. त्यानंतर फ्री होल्ड करण्याकरीता प्रयोजन परत्वे 2 मार्च 2019 च्या शासन निर्णयान्वये निवासी प्रयोजनाकरीता 5 टक्के तर वाणिज्यिक / औद्योगिक प्रयोजनाकरीता 10 टक्के रुपांतरण अधिमुल्य आकारून नझुल जमीन फ्री होल्ड केली जाईल.

त्यामुळे जास्तीत जास्त नझुल जमीनधारकांनी विशेष अभय योजना 2024-25 चा लाभ घ्यावा व आपल्या नझुल जमिनी सत्ताप्रकार ‘ब’ मधून ‘अ’ मध्ये करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

००००००

इतर मागासवर्गीय मुले/मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करा

 

इतर मागासवर्गीय मुले/मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करा

Ø अंतिम मुदत 14 डिसेंबर 2024 पर्यंत

चंद्रपूर, दि. 6 : इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मुले / मुलींना उच्च शिक्षण घेता यावे तसेच वाढत्या स्पर्धेमध्ये टिकून राहता यावे, यासाठी शासकीय वसतीगृह सुरू करण्यात आले आहे. सन 2024-25 या वर्षासाठी व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी फक्त पदवी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर विद्यार्थी 12 वी किमान 60 टक्क्यांनी उत्तीर्ण असावा. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी मुले/ मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी 14 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे यांनी केले आहे.

असे आहेत प्रवेशाचे निकष व नियमावली : विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा मात्र चंद्रपूर येथील स्थानिक रहिवासी नसावा. विद्यार्थी हा फक्त पदवी प्रथम वर्षातच शिक्षण घेणारा असावा, वार्षिक उत्पन्न 2 लक्ष 50 हजारांच्या आत असावे. वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. व्यावसायिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिलेअर व कास्ट व्हॅलिडीटी जोडणे बंधनकारक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला, बोनाफाईड व वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र ओरीजनल जोडावे.

असा करा अर्ज : जाहिरात काळजीपूर्वक वाचून दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा. लिंकवर क्लिक करून फॉर्म डाऊनलोड व प्रिंट करावा. अर्जात नमुद संर्पूण कागदपत्रे जोडून सदर अर्ज वसतीगृहात जमा करावा.  अधिक माहितीकरीता सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय दूध डेअरी रोड, जलनगर चंद्रपूर येथे संपर्क करावा.

०००००

अनोळखी मृत्यकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

 

अनोळखी मृत्यकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन   

चंद्रपूरदि.  6  : वरोरा रेल्वे स्टेशन येथे दक्षिण एक्सप्रेस मधून एका अनोळखी पुरुषाला खाली उतरवून सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, असे बल्लारशहा ड्यूटी रेल्वे स्टेशन उपप्रबंधक यांनी लेखी मेमोद्वारे पोलिसांना कळविले. त्यानुसार अकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून सदर इसम बेवारस असल्याने अनोळखी पुरुषाची आजपावेतो ओळख पटलेली नसून नावपत्ता किंवा नातेवाईकाबाबत माहिती मिळालेली नाही.

मृतकाचे वर्णन : अनोळखी पुरुष, रंग -सावळाबांधा - सडपातळ उंची – 5 फुट 2 इंच, केस – काळे, समोर टक्कल, चेहरा – लांब, नाक – सरळ. उजव्या हातावर इंग्रजीत एस.एम असे नाव लिहिलेले व मनगटात शेंदरी रंगाचा धागा. अंगात पांढ-या रंगाची सॅन्डो बनियान, काळ्या रंगाचे जॅकेट आणि हिरव्या रंगचा लोअर घातला आहे.

सदर अनोळखी मृतकाबाबत कोणालाही माहिती असल्यास तपासी अंमलदार धनराज नेवारे (मो. 9823442292) या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

०००००