इतर मागासवर्गीय मुले/मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करा
Ø अंतिम मुदत 14 डिसेंबर 2024 पर्यंत
चंद्रपूर, दि. 6 : इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मुले / मुलींना उच्च शिक्षण घेता यावे तसेच वाढत्या स्पर्धेमध्ये टिकून राहता यावे, यासाठी शासकीय वसतीगृह सुरू करण्यात आले आहे. सन 2024-25 या वर्षासाठी व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी फक्त पदवी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर विद्यार्थी 12 वी किमान 60 टक्क्यांनी उत्तीर्ण असावा. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी मुले/ मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी 14 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे यांनी केले आहे.
असे आहेत प्रवेशाचे निकष व नियमावली : विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा मात्र चंद्रपूर येथील स्थानिक रहिवासी नसावा. विद्यार्थी हा फक्त पदवी प्रथम वर्षातच शिक्षण घेणारा असावा, वार्षिक उत्पन्न 2 लक्ष 50 हजारांच्या आत असावे. वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. व्यावसायिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिलेअर व कास्ट व्हॅलिडीटी जोडणे बंधनकारक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला, बोनाफाईड व वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र ओरीजनल जोडावे.
असा करा अर्ज : जाहिरात काळजीपूर्वक वाचून दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा. लिंकवर क्लिक करून फॉर्म डाऊनलोड व प्रिंट करावा. अर्जात नमुद संर्पूण कागदपत्रे जोडून सदर अर्ज वसतीगृहात जमा करावा. अधिक माहितीकरीता सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय दूध डेअरी रोड, जलनगर चंद्रपूर येथे संपर्क करावा.
०००००
No comments:
Post a Comment