ई-उपकरण प्रणालीतील तफावत दूर करून
अचुक व परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर
Ø नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लाकडी फर्निचर आणि साहित्य खरेदी
चंद्रपूर दि. 26 : चंद्रपूर शहरातील बाबुपेठ बायपास मार्गावर जवळपास 50 एकर जागेत नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. या नवीन इमारतीत लाकडी फर्निचरसाठी 57 कोटी तर मेडिकल साहित्यासाठी 41 कोटी 76 लाख रुपयांची आवश्यकता आहे. कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी साहित्य खरेदीसाठी निधी मागणीबाबतचा प्रस्ताव सहा महिन्यापुर्वीच राज्य शासनाकडे सादर केला आहे.
या रुग्णालय व महाविद्यालयाकरिता आवश्यक यंत्रसामुग्रीचा अभ्यासपूर्वक प्रस्ताव विहित नमुन्यात राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषद, रुग्णालयातील आवश्यक यंत्रसामुग्री, सध्या रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेली यंत्रसामग्री आणि यापैकी ज्या यंत्रसामुग्री संस्थेत मानकाप्रमाणे आवश्यक आहे परंतू, ती यंत्रसामुग्री उपलब्ध नाही, अशा यंत्रसामुग्रीचा रु. 42 कोटी 71 लक्ष 79 हजार 800 रकमेचा प्रस्ताव संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना सादर करण्यात आला होता.
मात्र, सदर प्रस्तावात ई-उपकरण प्रणाली किमतींमध्ये तफावत आल्याने त्रुटी पूर्ण करण्याबाबत तसेच प्रस्तावाची संपूर्ण छाननी करून अचूक व परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. अनुषंगाने, संस्थेमार्फत दि. 19 मार्च 2024 च्या प्रस्तावातील ई-उपकरण प्रणालीतील तफावत दूर करून रु. 41 कोटी 76 लक्ष 61 हजार 800 एवढ्या रकमेचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता.
ई-उपकरण प्रणालीमध्ये दर्शविलेल्या यंत्रसामुग्रीच्या किंमतीबाबत संस्थेतील विभागांना किंमती मान्य आहे. तसेच यंत्रसामुग्री खरेदीसाठीचा प्रस्ताव रु.41 कोटी 76 लक्ष 61 हजार 800 रकमेचाच असल्यामुळे शेवटी हीच किंमत ग्राह्य धरून सदर प्रस्तावास प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देणेबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी शासनाला कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment