देशाच्या संरक्षणात सैनिकांचे योगदान महत्वपुर्ण - जिल्हाधिकारी विनय गौडा
Ø सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ
चंद्रपूर, दि. 13 : सीमेवरील सैनिक हे स्वत:च्या कुटूंबापासून दूर राहून प्रतिकुल परिस्थितीत देशाची सुरक्षा करण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडीत असतात. सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित असून देशाच्या संरक्षणात सैनिकांचे योगदान महत्वपुर्ण आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. नियोजन भवन सभागृह येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शुभम दांडेकर, माजी सैनिक बहूउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष हरीष गाडे, देवानंद काळबांडे, जिल्ह्यातील माजी सैनिक, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी तसेच विविध कार्यालय प्रमुखांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, तिन्ही सशस्त्र दलाचे बलिदान व योगदान देशासाठी अमुल्य आहे. माजी सैनिक मेळाव्याच्या माध्यमातून शहिद सैनिकांचे स्मरण तसेच माजी सैनिकांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी दरवर्षी ध्वजदिन निधी संकलीत केला जातो. यातून त्यांच्या कुटूंबियांच्या कल्याणासाठी मदत होणार आहे. जिल्ह्याने मागील वर्षी निधी संकलनात 98.96 टक्के उद्दीष्ट पुर्ण केले आहे. सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी उभारल्या जाणाऱ्या ध्वजदिन निधी संकलनात सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन देवून योगदान द्यावे. जेणेकरुन, 100 टक्के उद्दिष्ट साध्य करता येईल. निधी संकलनात सर्वांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.
प्रास्ताविकेत बोलतांना जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शुभम दांडेकर म्हणाले, पूरपरिस्थिती, दुष्काळ, भुकंप यासारख्या नैसर्गिक परिस्थितीत देखील सैनिकांची मदत घेतली जाते. या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ध्वजनिधीतून सैनिकांच्या वारसांना आर्थिक मदत करणे, शहीद व सेवारत सैनिकांच्या परिवारांना मदत करणे, त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे या निधीतून करण्यात येते. गत वर्षी 39 लक्ष 84 हजाराचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 39 लक्ष 42 हजार 607 निधीचे संकलन झाले असून 98.96 टक्के उद्दिष्ट साध्य केले असल्याची माहिती शुभम दांडेकर यांनी दिली.
वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी तसेच शौर्यपदक धारकांचा सत्कार : वीरपत्नी वेंकम्मा गोपाल भिमनपल्लीवार, अरुणा सुनिल रामटेके, वीरमाता शिला सुदाम कोरे, पार्वती डाहुले, छाया बालकृष्ण नवले, वीरपिता वसंतरावजी डाहुले, बालकृष्ण नवले तसेच माजी सुबेदार (शौर्यचक्र) शंकर मेंगरे यांना शॉल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
ध्वजदिन निधी संकलनात सहभाग घेणाऱ्यांचा सत्कार : मागील वर्षी ध्वजदिन निधी संकलन कार्यात विविध कार्यालयांनी मोलाची कामगिरी केली आहे. सदर कार्यालय प्रमुखांना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देवून यथोचित सत्कार करण्यात आला.
विशेष गौरव पुरस्कार धनादेशाचे वितरण : माजी सैनिक वसंत खामनकर यांचे पाल्य कुमार अभिनंदन यास क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल 25 हजारांचा धनादेश देवून गौरविण्यात आले.
सैनिक कल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती धनादेशाचे वाटप : सैनिक कल्याण विभागातर्फे माध्यमिक, उच्च माध्यमिक अभ्यासक्रमात उत्कृष्ठ गुणांनी उत्तीर्ण झालेल्या शुभम बुरांडे, सुहानी पिसे, प्रथमेश तेलरांधे, अजहर शकील या पाल्यांना (10वी करीता) रु. 2 हजार 500 तर आयुष फुले यास (12 वी करीता) रु. 5 हजार शिष्यवृत्ती धनादेशाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन हेमंत शेंडे यांनी केले तर आभार देवानंद काळबांडे यांनी मानले.
००००००
No comments:
Post a Comment