रस्ते अपघात टाळण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी विनय गौडा
Ø जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची सभा
चंद्रपूर,दि.31: कोणताही अपघात हा त्या व्यक्तीवर व त्याच्या कुटुंबावर होणारा फार मोठा आघात असून प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करून वाहन चालविणे आवश्यक आहे. हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होवून रस्ते अपघातात नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. हे अपघात कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करावे. तसेच रस्ते अपघात टाळण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणाना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, नगरप्रशासन अधिकारी विद्या गायकवाड, विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व नगरपंचायतचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांची (ब्लॅकस्पॉट) माहिती घ्यावी. जिल्ह्यातील नवीन ब्लॅकस्पॉटला पोलीस व आरटीओ विभागाने संयुक्तपणे भेटी द्याव्यात. रस्त्यावर असणाऱ्या अपघातप्रवण स्थळांची संख्या कमी करण्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने त्यांची दुरुस्ती करुन सदर ब्लॅकस्पॉट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. अपघात प्रवणस्थळ तसेच वर्दळीच्या ठिकाणी गतिरोधकाची आवश्यकता आहे की नाही याबाबत पोलीस, परिवहन आणि बांधकाम विभागाने संयुक्तपणे भेट देवून तपासणी करावी.
नॅशनल हायवे विभागाने रस्ता खराब झाल्यास तातडीने दुरुस्ती करावी. स्पीड कंट्रोलसाठी ऑटोमॅटिक चालान जनरेटर लावण्यात यावे. जेणेकरून, वेगावर मर्यादा येईल व चालकांना शिस्त लागेल. रोडवरील वाहतूक अतिक्रमणासाठी पोलीस, परिवहन विभागाने संयुक्तपणे कार्यवाही करावी. महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी बसणाऱ्या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अशा जनावरांचा बंदोबस्त करावा. तालुकास्तरावर विभागनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग व परिवहन विभागाने समन्वयातून काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या रस्ते अपघाताची माहिती जाणून घेतली. रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहन चालकांना वाहतूक नियमांची माहिती असणे गरजेचे आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करावी. विशेषत: शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या मुला-मुलींमध्ये प्रामुख्याने जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना देखील दिल्या.
0000000
No comments:
Post a Comment