Search This Blog

Wednesday, 18 December 2024

विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर वाहतुक नियत्रंण शाखेची कारवाई

 

विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर वाहतुक नियत्रंण शाखेची कारवाई

चंद्रपूर, दि.18:  जिल्ह्यात दुचाकी वाहन चालकांच्या अपघाताचे प्रमाण वाढत असून मृत्यूमुखी पडणाऱ्या अनेक दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आले आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करणे हे मोटार वाहन कायदा 1988 कलम 129 अन्वये सक्तीचे आहे. जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर 2024 पर्यत दुचाकीचे एकुण 384 अपघात झाले असुन त्यात 194 नागरिकांचा मृत्यु झाला आहे. त्यापैकी 166 दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले आहेत.

हेल्मेटबाबत सर्वोच्च न्यायालयाने कडक धोरण अवलंबले असून चंद्रपूर पोलीस दलाच्यावतीने हेल्मेट न परीधान करणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाई करण्याचा उद्देश अपघातामध्ये मृत्युदराचे प्रमाण कमी करणे हे आहे.

दि. 10 ते 17 डिसेंबर 2024 या कालावधीत वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपूर व सर्व पोलीस स्टेशनतर्फे हेल्मेटबाबत विशेष मोहिम राबवून 4 हजार 300 विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये वाहतुक नियंत्रण शाखेतर्फे 3 हजार 493 तर पोलीस स्टेशनतर्फे 807 विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आली आहे.  दि. 17 डिसेंबर 2024 रोजी विसापुर येथील टोलनाक्याजवळ वाहतुक शाखेतर्फे एकुण 1 हजार 97 विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

बरेचसे नागरीक हे हेल्मेट परीधान न करता दुचाकी चालवितात. त्यामुळे मोठया प्रमाणात अपघात होतात. नागरीकांच्या सुरक्षेकरीता सदर मोहिम संपुर्ण जिल्हयात राबविण्यात येत आहे. तरी, नागरीकांनी यापुढे दुचाकी चालवितांना हेल्मेट परीधान करावे. जिल्हयातील वाढते अपघाताचे प्रमाण पाहता सर्व वाहन चालकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment