Search This Blog

Monday, 23 December 2024

२४ डिसेंबर रोजी जिल्ह्यात साजरा होणार पेसा दिवस

 २४ डिसेंबर रोजी जिल्ह्यात साजरा होणार पेसा दिवस

चंद्रपूर दि.२२: केंद्र शासनाने दिनांक २४ डिसेंबर १९९६ रोजी "पंचायत्ती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे) अधिनियम, १९९६" अर्थात पेसा कायदा पारित केला आहे. या कायद्यामुळे अनुसूचित क्षेत्रांतील पंचायतींना स्वयंशासनाच्या संस्था म्हणून काम करणे शक्य होऊ लागले. पेसा कायद्याच्या निर्मितीला दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी २८ वर्षे पूर्ण होत आहेत. भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाने हा दिवस "पेसा दिन" म्हणून साजरा करायचे निर्देशित केले आहे. पंचायती राज मंत्रालयाचे अनुसूचित क्षेत्रामध्ये पेसा कायद्याच्या अंमलबजावणीला बळकटी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, ग्रामसभांचे सक्षमीकरण आणि अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या कामकाजात सुधारणा ही विशेष उद्दिष्टे समोर ठेऊन, पेसा कायद्याबद्दलची जनजागृती आणि स्वंयशासन संबंधित घटकांच्या क्षमता बांधणीचे प्रयत्न सुरू आहेत.

या उद्दिष्टांच्या परिपूर्तीसाठी पेसा दिनाच्या निमित्ताने ग्रामसमा सदस्य, पंचायत सदस्य तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची क्षमताबांधणी व्हावी व त्यांच्यामध्ये जनजागृती वाढावी तसेच त्यांचा या कायद्याच्या अंमलबजावणीतील सहभाग वाढावा यासाठी विविध उपक्रम जिल्हा, तालुका, तसेच ग्रामस्तरावर आयोजित करण्यात येऊन प्रभात फेरी काढुन व पेसा या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजीत करुन पेसा दिन साजरा करण्यात येणार आहे. चंद्रपुर जिल्हयामध्ये राजुरा, कोरपना, जिवती असे एकुण ३ तालुके पेसा क्षेत्रात येत असुन यातील ९६ ग्रामपंचायत व ग्रामपंचायत अंतर्गत १८२ गावे यामध्ये समाविष्ठ आहेत. यामध्ये तालुक्यानी नियोजीत केलेल्या ठिकाणी तालुका स्तरीय कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

तरी सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने नागरीकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन विवेक जॉनसन (भाप्रसे) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपुर यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment