भविष्यवेधी प्रशिक्षण कार्यक्रमात 59 शिक्षकांचा सहभाग
Ø विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विकास विभागाचा उपक्रम
चंद्रपूर, दि. 12 : चंद्रपूर आणि चिमूर आदिवासी प्रकल्पांतर्गत येणा-या सर्व शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत शिकविणा-या शिक्षकांसाठी भविष्यवेधी प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक आदिवासी विकास विभागातर्फे शिक्षकांचे सक्षमीकरण हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला असून यात 59 शिक्षकांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी राजीव बोंगीरवार, श्री. धोटकर, श्री. गिरडकर, श्री. चव्हाण, श्री. श्रीरामे, श्री. कुळसंगे यांच्यासह शिक्षकांना मार्गदर्शन करणारे काकासाहेब नागरे, उमेश आडे, गोविंद पेदेवाड, विकास गेडाम उपस्थित होते. सदर प्रशिक्षणात जिवती, देवाडा, मंगी, रुपापेठ, मरेगाव, बोर्डा, देवई, चंदनखेडा, जांभुळघाट, कोसंबी, पाटण, चिंधीचक या शाळेतील 59 शिक्षकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
यावेळी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, आजच्या बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये शिक्षकांची भुमिका अधिकाधिक महत्वाची आणि भविष्य घडविणारी ठरत आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या भविष्यवेधी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे शिक्षकांना आधुनिक शिक्षण पध्दती, नवतंत्रज्ञान, अध्यापन कौशल्यांच्या माध्यमातून अधिक सक्षम बनविणे, हा आहे. विद्यार्थी स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी शिक्षक हे एक स्तंभ आहेत. त्यामुळे अशा प्रशिक्षणाद्वारे शिक्षकांची क्षमता वाढविणे, भविष्यात अशा उपक्रमांना अधिक प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणे, यासाठी आपले प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या विषयावर झाले प्रशिक्षण आणि चर्चासत्र : आधुनिक शिक्षण तंत्रज्ञानाचा वापर, नवीन उपक्रम आणि शैक्षणिक पध्दती, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक धोरणे, खेळ आणि सृजनशील कृतींचे आयोजन, समूह चर्चा आणि अनुभवांची देवाणघेवाण, नेतृत्व कौशल्य विकास व भविष्यातील शैक्षणिक गर्जांची तयारी, अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन, कामाचे टप्पे आणि प्राधान्यक्रम, अध्ययन स्तर, अध्ययन निष्पती व 21 व्या शतकातील कौशल्य, शिकण्याच्या प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा उपयोग, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान, प्रशिक्षणोत्तर सहायक प्रणाली, मुलांना स्वत: शिकण्यास प्रेरीत करणे आदी विषयांवर प्रशिक्षण आणि चर्चासत्र घेण्यात आले.
दुस-या टप्प्यातील उर्वरीत शिक्षकांचे प्रशिक्षण 11 ते 14 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment