Search This Blog

Tuesday, 26 May 2026

230 आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव


 230 आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

Ø उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप

चंद्रपूर, दि. 26 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्यावतीने 23 एप्रिल ते 22 मे 2026 पर्यंत घेण्यात आलेल्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप नुकताच पार पडला. बोर्डा येथील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत घेण्यात आलेल्या या शिबिरात 230 आदिवासी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळुंके तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महिला बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार,  जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक श्री. कांबळे, स्टेट बँकेचे उपव्यवस्थापक श्री. डेकाटे आदी उपस्थित होते. या शिबिरात विद्यार्थ्यांनी 10 प्रकारचे प्रशिक्षण घेतले.  यात मातीकाम, कराटे, योगा, बांबू कला, ढोल वाद्य, आर्चरी, मेहंदी, संगीत, कीवलिंग, म्युरल आर्ट, रांगोळी, रोबोटिक्स या कलांचा समावेश होता.

समारोपीय कार्यक्रमात माती काम, बांबू कला, आर्चरी, मेहंदी, रोबोटिक्स आर्ट, रांगोळी या कलांची प्रदर्शनी भरवण्यात आली होती. तसेच कराटे, योगा, ढोल, आर्चरी, लाठीकाठी या कलांचे प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात आले. 10 प्रकारच्या कलांमध्ये प्रत्येक कलेतून एक, याप्रमाणे 10 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच संपूर्ण शिबिरामधील उत्कृष्ट पाच विद्यार्थी निवडून त्यांना स्मार्टवॉच पारितोषिक देण्यात आले.

यावेळी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख बनवण्याचे प्रयत्न केले गेले. दरवर्षी अनेक विविध प्रशिक्षणाचा समावेश करून पुढील वर्षी देखील अशाच प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला प्रकल्प कार्यालयातील सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षक, अधीक्षिका आदी उपस्थित होते

००००००

Monday, 25 May 2026

जिल्हाधिकारी धडकल्या पेट्रोल पंपावर






जिल्हाधिकारी धडकल्या पेट्रोल पंपावर

Ø साठा रजिस्टरची तपासणी ; ग्राहकांसोबतही संवाद

चंद्रपूर, दि. 25 : पश्चिम आखाती युध्दाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात पेट्रोल – डिझेलची टंचाई जाणवू नये, ग्राहकांना नियमितपणे पेट्रोल –डिझेल मिळावे तसेच साठेबाजी व काळाबाजारी रोखण्यासाठी आज (दि.25) जिल्हाधिकारी वसुमना पंत थेट पेट्रोल पंपावर धडकल्या.

चंद्रपूर – नागपूर महामार्गावर, शहरात असलेल्या कोटपल्लीवार यांच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पेट्रोल पंपावर जिल्हाधिका-यांनी अचानक भेट देऊन साठा रजिस्टरची तसेच दैनंदिन साठ्याबाबत असलेल्या ॲपची सुध्दा पाहणी केली. सद्याच्या परिस्थितीत तेल कंपन्यांकडून पेट्रोल – डिझेलचा पुरवठा सुरळीत होत आहे का, गत आठवड्याच्या स्थितीत आता सुधारणा झाली का, एका दुचाकी किंवा चारचाकीला किती मर्यादेत पेट्रोल – डिझेल देण्याचे नियोजन केले आहे, शेवटचा स्टॉक कधी आला, पेट्रोल पंपावर ग्राहकांची झुंबड असते का, औद्योगिक जिल्हा असल्यामुळे मोठमोठे ट्रक कुठून पेट्रोल – डिझेल भरतात, युध्द परिस्थती नसतांना दररोज किती टँकर येत होते व सद्यस्थितीत किती येतात, आदींबाबत विचारणा करून त्यांनी माहिती जाणून घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, कॅनमध्ये तसेच बॉटलमध्ये पेट्राल – डिझेल विकणे हे अनधिकृतच आहे. असे होऊ देऊ नका. तसेच दररोज किती साठा उपलब्ध असतो, त्याचा फलक दर्शनी भागात लावावा, जेणेकरून नागरिकांना तो बघता येईल. पेट्रोल – डिझेलची काळाबाजारी व अवैध साठेबाजी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

पेट्रोलपंप चालक व्ही.एम. कोटपल्लीवार यांनी सांगितले की, गत आठवड्याच्या परिस्थतीत आता सुधारणा झाली आहे. नियमितपणे पेट्रोल आणि डिझेलचे टँकर उपलब्ध होतात. कधीकधी अफवांमुळे ग्राहक अचानक गर्दी करतात, तेव्हा थोडी अडचण होते, मात्र स्टॉक संपला असे सहसा होत नाही. तसेच बहुतांश मोठमोठे ट्रक, शहराच्या बाहेर असलेल्या पंपावरून पेट्रोल – डिझेल खरेदी करतात. आमच्याकडे कॅनमध्ये पेट्रोल – डिझेल दिले जात नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

सदर भेटीदरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर, खरेदी अधिकारी राहुल वानखेडे, अन्नधान्य वितरण अधिकारी सुमेध चवरे, पेट्रोलपंप चालक व्ही.एम. कोटपल्लीवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिका-यांचा ग्राहकांशी संवाद : यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी ग्राहकांशी संवाद साधला. वाहनामध्ये किती पेट्रोल भरता, पहिले कमी आणि आता टंचाईमुळे जास्त पेट्रोल भरत आहे का, पेट्रोल भरायला आहे आणि मिळाले नाही, असे कधी झाले का, पेट्रोल – डिझेल बरोबर मिळते का, की त्यात कर्मचा-यांकडून कपात केल्याचे कधी निदर्शनास आले का, अशी विचारणा केली.

जिल्ह्यातील शिल्लक साठा : 24 मे 2026 अखेरपर्यंत जिल्ह्यात पेट्रोलचा एकूण साठा 9 लक्ष 78 हजार 571 लिटर, यापैकी विक्री 2 लक्ष 22 हजार 659 लिटर तर शिल्लक पेट्रोल साठा 7 लक्ष 55 हजार 912 लिटर. डिझेलचा एकूण साठा 11 लक्ष 9 हजार 162 लिटर, यापैकी विक्री 4 लक्ष 23 हजार 760 लिटर, शिल्लक साठा 6 लक्ष 85 हजार 402 लिटर. तर एलपीजी सिलिंडरचा एकूण साठा 17448, विक्री 6567 आणि शिल्लक साठा 10881 होता.

००००००


Friday, 22 May 2026

सण – उत्सव शांततेत साजरे करू या!


 

सणउत्सव शांततेत साजरे करू या!

Ø जिल्हाधिका-यांचे नागरिकांना आवाहन

Ø जिल्हा शांतता समितीची बैठक

चंद्रपूर, दि. 22 : पुढील आठवड्यात संपूर्ण जिल्ह्यात बकरी ईद साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्हाभर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन कटिबध्द आहे. प्रशासनाला सहकार्य करून नागरिकांनीसुध्दा सण आणि उत्सव आनंदात व शांततेत साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.

नियोजन भवन येथे चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि पेालिस विभागाच्या वतीने आयेाजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, सहायक पोलिस अधिक्षक गौरव कायंदे पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीचे सदस्य, पोलिस पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, शहरातील पाणी पुरवठा व वीज पुरवठा खंडीत होणार नाही, याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. सोशल मिडीयावर फेक किंवा निगेटिव्ह मॅसेज दिसला की त्वरीत पोलिस विभाग किंवा सायबर टीमला कळवावे. वेळेवर फॅक्ट चेक करावे, जेणेकरून अफवा पसरणार नाही. विशेष म्हणजे पुढील काही दिवस चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी सण साजरा झाल्यावर दुपारी कोणीही विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

मनपा आयुक्त अकुनूरी नरेश म्हणाले, शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित रहावा, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. कुर्बानीच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी टँकरद्वारे पाणी उपलब्ध्करून दिले जाईल. साफसफाई व इतर आवश्यक उपाययेाजना मनपाने केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन पोलिस अंमलदार मंगला घागी यांनी केले.

पोलिस प्रशासन सजगपोलिस अधिक्षक नोपाणी

ईद निमित्त संपूर्ण जिल्ह्यात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गोमांसची तस्करी होऊ नये, यासाठी आंतरजिल्हा व आंतरराज्य सीमेवर नाकाबंदी पॉईंट्स सुरू करण्यात आले आहे. सोशल मिडीयावरील अफवांवर किंवा चुकीच्या पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी सायबरची टीम 24 बाय 7 कार्यरत आहे. काही चुकीचे आढळल्यास पोलिस विभाग किंवा 112 क्रमांकावर त्वरीत माहिती द्यावी. जिल्ह्यात बकरी ईद शांततेत साजरी करण्यासाठी पोलिस प्रशासन सजग आहे, अशी ग्वाही जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी दिली.

नागरिकांनी केल्या सुचना : ईद निमित्त शांतता समितीच्या सदस्यांनी यावेळी प्रशासनाला सुचना केल्या. यात 1) विद्युत पुरवठा अखंडीत राहावा 2) पाणी पुरवठा नियमित व्हावा 3) कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवावा 4) गर्दीवर योग्यरित्या नियंत्रण ठेवावे 5) असामाजिक तत्व व विघातक लोकांना गर्दीपासून दूर ठेवावे 6) सोशल मिडीयावर अफवा पसरू नये, यासाठी गांभियाने दक्षता घ्यावी 7) शहरातील पार्किंगचे योग्य व्यवस्थापन करावे 8) अवैध होर्डीग्जवर कारवाई करावी.

०००००००

आदिवासी विद्यार्थ्यांची बीआरटीसी केंद्राला भेट

 

आदिवासी विद्यार्थ्यांची बीआरटीसी केंद्राला भेट

चंद्रपूर, दि. 22 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत विविध आश्रमशाळांमधील 9 वी आणि 11 वी वर्गातील विद्यार्थ्यांकरिता उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बांबू काम, टेराकूटाचे विविध वस्तू बनवणे, मेहंदी, रांगोळी आर्ट, योगा, आर्चरी, विविध वाद्य वाजवणे, कराटे, लाठी काठी, गोंडी पेंटिंग यासारख्या विविध विषयांवर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. सदर विषय शिकवण्यासाठी मानधन तत्वावर शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आणि ते शिक्षक उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात 24 तास विद्यार्थ्यांना उपलब्ध होते.

सदर प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून तसेच पुढील भविष्यामध्ये त्यांना बांबू टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करता यावे, या उद्देशाने 40 आदिवासी विद्यार्थ्यांना चिचपल्ली येथील बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र’ (बीआरटीसी) येथे विद्यार्थ्यांची भेट घडवून आणण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी बांबू प्रशिक्षणाबद्दल माहिती जाणून घेतल्याचे अधिकारी विकास राचेलवार यांनी कळविले आहे.

०००००

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत 25 मे रोजीची यात्रा स्थगित

 

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत 25 मे रोजीची यात्रा स्थगित

चंद्रपूर, दि. 22 : राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना, भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनेमुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनासुरू करण्यात आली आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी 25 मे ते 30 मे या कालावधीत महाबोधी मंदीर बुध्दगया (बिहार) येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव लाभार्थ्यांना घेऊन जाणारी 25 मे रोजीची यात्रा स्थगित करण्यात आली असून यात्रेची पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

०००००००