Search This Blog

Thursday 29 April 2021

ग्रामपंचायतींना विलगीकरण कक्षासाठी मिळणार 1 कोटी 88 लाखचा निधी - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

 

ग्रामपंचायतींना विलगीकरण कक्षासाठी मिळणार

1 कोटी 88 लाखचा निधी - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर दि. 29 एप्रिल:- जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांकरिता गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध आहे, मात्र ग्रामीण भागातील घरात पुरेशा जागेअभावी गृह विलगीकरणात राहणे शक्य होत नाही किंवा गृह विलगीकरणाचे नियम पाळणे शक्य होत नाही. अशा ग्रामस्थांची योग्य देखभाल व्हावी यासाठी त्यांचेकरिता ग्रामपंचायत स्तरावरच शाळा,  समाजभवन, अथवा ग्रामपंचायतीच्या सोयीनुसार योग्य ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारून गावातच सोय करण्यासाठी एक कोटी ८८ लाख ३० हजार रुपये अनुदानाचा प्रस्ताव जिल्हा खनिज निधीतून मंजूर करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले.

गावात विलगीकरण कक्ष उभारणे व त्यात प्राथमिक सुविधा निर्माण करणे, गावातील नागरिकांची व बाहेरून आलेल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना वैद्यकीय सेवा पुरवणे, गावात फवारणी करणे, आवश्यक साहित्य खरेदी करणे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला  खनिज निधीतून अनुदान  उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी पाच हजारावरील लोकसंख्या असलेल्या २२  ग्रामपंचायतीला प्रत्येकी रुपये ५० हजार, दोन हजार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या १६३ ग्रामपंचायतीला प्रत्येकी रु. ३० हजार तर दोन हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ६४३ ग्रामपंचायतीला रु. २० हजार याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण ८२७ ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येणार आहे.

वरील निर्णयामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांना गावातच विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांनी कोवीड केअर सेंटर मध्येच दाखल व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे..

0 0 0

No comments:

Post a Comment