Search This Blog

Sunday 4 April 2021

सिंदेवाही तालुक्यातील विकास कामांचा आढावा

 

सिंदेवाही तालुक्यातील विकास कामांचा आढावा

आमसभेतील ठरावाप्रमाणे पांदन रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करा

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश

चंद्रपूर, दि. 04 एप्रिल : सिंदेवाही विभागात मनरेगा अंतर्गत सेल्फवर 175 कामे असताना अद्याप एकही काम सुरू नाही ही बाब योग्य नसून वरील सर्व कामे तातडीने सुरू करण्याचे तसेच आमसभेच्या ठरावात नमूद केल्याप्रमाणे पांदण रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

सिंदेवाही तालुक्यातील विकास कामांचा आढावा काल पालकमंत्री वडेट्टीवार यांनी विश्रामगृह भवनात घेतला. यावेळी नगराध्यक्षा आशा गंडाटे, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोधे, गट विकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुप्रिया राठोड, नायब तहसीलदार श्री. धात्रक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

2016-17 पासून विभागातील घरकुलाचे कामे प्रलंबित असल्याबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करून घरकुलाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी कृषी विभाग, पाणीपुरवठा, तांडा वस्ती सुधार योजना, स्वच्छ भारत मिशन, शिक्षण विभाग, एकात्मिक बाल विकास, धडक सिंचन विहीर योजना इत्यादी बाबत आढावा घेऊन अधिकाऱ्यांना दिशानिर्देश दिले.

राज्य पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार

राज्य शासनातर्फे सिंदेवाई तालुक्यातील मेंढा येथील दिनेश नामदेव शिंदे यांना कै. वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार-2019 तसेच पांढरवाणी येथील गुरुदास अर्जुन मसराम यांना कै. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार-2019  प्राप्त झाल्याबद्दल पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

बैठकीला विविध विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

०००

No comments:

Post a Comment