Search This Blog

Saturday 24 April 2021

बाल विवाह रोखण्यास प्रशासन व जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश

 बाल विवाह रोखण्यास प्रशासन व जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश

बालविवाह रोखण्यास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन

; अजय साखरकर

चंद्रपूर,दि. 24 एप्रिल : जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्याअंतर्गत दिनांक 22 एप्रिल 2021 रोजी अल्पवयीन बालकांचे बालविवाह होणार असल्याची माहिती  बाल ग्राम समिती व तालुका बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा मुलचे तहसीलदार रवींद्र होळी व सदस्य सचिव तथा मुलच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती जगताप यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांना दिली. सदर माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार बालविवाह रोखण्यासाठी कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आली.

  शिक्षणाधिकारी (माध्य.) श्री. नरड यांचेमार्फत बालकांच्या वयाचे पुरावे प्राप्त करुन पोलिस प्रशासनाचे सहाय्य घेत पोलिस उपअधिक्षक श्री.देशमुख  व गोंडपिपरीचे पोलिस निरीक्षक श्री.धोबे, मुल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री.राजपुत तसेच गोंडपिपरीचे तहसिलदार तथा अध्यक्ष तालुका बाल संरक्षण समिती श्री. मेश्नाम व गोंडपिपरीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी शरद पारखी यांच्या समन्वयातुन सदर बालविवाह रोखण्यात आला.

बालकास बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात आले असून बालकाच्या पालकांकडून करार पत्र भरुन घेत बालकाचे समुपदेशन करुन पालकाच्या ताब्यात देण्यात आले व मुलाला वयाचे 21 वर्ष व मुलीला 18 वर्ष पुर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे लिहुन घेण्यात आले.

सदर कार्यवाहीमध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) श्री. राजेश भिवदरे, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा मडावी, ग्रामसेवक तसेच बाल ग्राम संरक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते.

पालकांनो सावध व्हा! जिल्ह्यातील पालकांनी कायद्याच्या (बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006) विरोधात अल्पवयीन बालकांचे विवाह करु नये. अन्यथा प्रशासनाच्या माध्यमातुन कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला तसेच जिल्ह्यात होणारे बालविवाह रोखण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment