Search This Blog

Friday, 9 October 2026

महसूल लोक अदालतीत 16 प्रकरणे निकाली



महसूल लोक अदालतीत 16 प्रकरणे निकाली

Ø अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयातील 50 प्रकरणांवर सुनावणी

चंद्रपूर, दि. 09 : महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणांचा जलद, पारदर्शक व सामंजस्यपूर्ण पद्धतीने निपटारा करण्याच्या उद्देशाने नियोजन भवन येथे ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत’ घेण्यात आली. या लोक अदालतीत अपर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयातील एकूण 50 प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 16 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या उपस्थितीत 7 ऑक्टोबर रोजी ही महसूल लोक अदालत पार पडली. महसूल न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांतील पक्षकारांना परस्पर संवादातून तोडगा काढण्याची संधी उपलब्ध करून देणे, अनावश्यक विलंब टाळणे आणि नागरिकांना जलद न्याय मिळवून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

सुनावणीसाठी ठेवण्यात आलेल्या 50 प्रकरणांतील संबंधित पक्षकारांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. तसेच परस्पर सहमती व सामंजस्यातून वाद मिटविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने 16 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

या महसूल लोक अदालतीसाठी चंद्रपूर बार असोसिएशनचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी मोठ्या संख्येने अधिवक्ता व पक्षकार उपस्थित होते. लोक अदालतीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी अजय मेकलवार, ओंकार आमटे, संजय पुष्पलवार तसेच प्रकाश दुपारे यांनी परिश्रम घेतले.

पुढील महसूल लोक अदालत 4 डिसेंबर 2026 रेाजी होणार असून महसूल विषयक प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment