Search This Blog

Sunday, 8 November 2026

दुष्काळी आपत्तीचा सामना आणि राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर



 दुष्काळी आपत्तीचा सामना आणि राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर

लोहारी सावंगा येथील प्रार्थनासभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

 

लोहारी सावंगा, (नागपूर) दि. 8 : कुठलेही संकट अथवा आपत्ती आल्यास तिचा सामना कशा पद्धतीने करायचा यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मांडलेले विचार मागील अनेक पिढ्यांसाठी  आत्मिक बळ देणारे ठरले आहेत. नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा गावात  गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित प्रार्थना सभेच्या निमित्ताने शनिवारी रात्री नेमक्या याच विचारांचा जागर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आला.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबासोबत साजरी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. लोहारी सावंगा गावात दाखल होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  गावातील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित प्रार्थना सभेत सहभागी झाले. त्यांच्या समवेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार सर्वश्री चरणसिंह ठाकुर, आशिष देशमुख, डॉक्टर राजीव पोतदार, माजी आमदार सुधाकर कोहळे तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी तसेच गावचे सरपंच सतीश चापले हे देखील या प्रार्थना सभेत सहभागी झाले होते.

यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.या प्रार्थना सभेत मोझरी येथील गुरुकुंज आश्रमाच्या भजन मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या भजनांनी वातावरण भारून गेले होते. संकटाच्या काळात मानवी मनांना उभारी देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित या भजनांनी गावात एका आश्वासक वातावरणाची निर्मिती झाल्याचे चित्र अत्यंत भारावून टाकणारे होते.

राष्ट्रसंतांना वंदन करून या प्रार्थना सभेची सुरुवात झाली. त्यानंतर मौन प्रार्थना आणि राष्ट्रवंदना घेण्यात आली. यानंतर गुरुकुंज मोझरीच्या भजन मंडळाच्या वतीने 'शेतकऱ्यांनो कामकार्‍यांनो..', 'मेरे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे' ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रेरणादायी भजने सादर करण्यात आली. गुरुकुंज आश्रम मोझरी येथील भजन मंडळाचे अमोल बांबल, शितल मांडवगडे, गजानन गायकवाड, चेतन अंभोरे, सागर भालचक्र, आकाश वानखडे, श्रावण सोनटक्के यांच्या चमूने ही भजने सादर केली. राष्ट्रवंदनेने या प्रार्थना सभेची सांगता झाली.

 

000000

No comments:

Post a Comment