Search This Blog

Thursday, 5 November 2026

प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत बोर्डा केंद्र महाविजेता तर देवाडा केंद्र उपविजेता




 प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत बोर्डा केंद्र महाविजेता तर देवाडा केंद्र उपविजेता

Ø चार केंद्रांतील 1058 खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

चंद्रपूर, दि. 05 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत बोर्डा केंद्राने सर्वसाधारण महाविजेतेपद पटकाविले, तर देवाडा केंद्राने उपविजेतेपद मिळविले. देवाडा, जिवती, देवई व बोर्डा या चार केंद्रांतील एकूण 1058 खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

शासकीय माध्यमिक कन्या आश्रमशाळा, बोर्डा (ता. जि. चंद्रपूर) येथे 2 ते 4 नोव्हेंबर 2026 या कालावधीत या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 4 नोव्हेंबर रोजी प्रकल्प अधिकारी विकास राचलेवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजीव बोंगीरवार, सुधाकर गौरकर, युवराज चव्हाण, मुख्याध्यापक अनिल बुट्टे, रामदास खवशी, राजपुरोहित तसेच क्रीडा समन्वयक सुरेश श्रीरामे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रकल्प अधिकारी विकास राचलेवार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळांचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणाबरोबरच क्रीडा, कला व सांस्कृतिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत. खेळांमुळे शिस्त, संघभावना, जिद्द, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध करून विभागीय व राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

विविध क्रीडा प्रकारांत खेळाडूंची चमकदार कामगिरी : या प्रकल्पस्तरीय स्पर्धेत कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, 4 बाय 100 व 4 बाय 400 मीटर रिले या सांघिक स्पर्धांसह 100, 200, 400, 600, 800, 1500, 3000 व 5000 मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक आणि भालाफेक अशा विविध वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश होता. यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. खेळाडूंनी क्रीडाकौशल्य, जिद्द आणि संघभावनेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

स्पर्धेतील एकत्रित कामगिरीच्या आधारे बोर्डा केंद्राला सर्वसाधारण महाविजेतेपद, तर देवाडा केंद्राला उपविजेतेपद प्रदान करण्यात आले. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन विभागीय उपसमन्वयक उमेश कडू व अनुराधा लाड यांनी केले, तर प्रीती कुत्तरमारे यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा समन्वयक, क्रीडा शिक्षक, सहाय्यक शिक्षक, अधीक्षक, अधीक्षिका, कला व संगणक शिक्षक, परिचारिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

००००००

No comments:

Post a Comment