Search This Blog

Sunday, 8 November 2026

मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यासोबत! लोहारी सावंगाला मिळाला पाण्याचा शाश्वत दिलासा


 

मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यासोबत! लोहारी सावंगाला मिळाला पाण्याचा शाश्वत दिलासा

१० शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ,

२४३.३५ लाखांच्या साठवण तलावाचे बांधकाम होणार

 

लोहारी सावंगा, नागपूर,  दि. 8 : दिवाळीचा उजेड जेव्हा शेतकऱ्याच्या घरात मंदावला होता, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली दिवाळी थेट शेतकऱ्याच्या अंगणात साजरी केली. दुष्काळाच्या छायेत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा गावात मुक्काम करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या व्यथा ऐकल्या आणि केवळ आश्वासन नाही, तर प्रत्यक्ष पाण्याच्या योजनांचा लाभ देऊन दिलासा दिला.

 

लोहारी सावंगा हे ४२६४ लोकसंख्या आणि ८४४ कुटुंबांचे गाव आहे. कापूस, तूर, संत्रा, मोसंबी, सोयाबीन, चना, गहू ही येथील प्रमुख पिके आहेत. यंदा पावसाअभावी पिके करपली, संत्रा बागा सुकल्या. अशा कठीण काळात मुख्यमंत्र्यांनी गावात येऊन बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.

 

१० शेतकऱ्यांना सिंचन विहिरी योजनेचा लाभ

 

शेतकऱ्यांना सिंचन विहिरी योजने अंतर्गत दहा शेतकऱ्यांना सिंचन विहीर मंजुर करण्यात आले. या विहिरींमुळे शेतकऱ्यांना आता बारमाही पाण्याची सोय होणार आहे.

 

लाभार्थी शेतकरी :  विमल शामराव खडगा,  सुमन रामभाऊ थापले,  रामचंद्र मधुकर घोडे,  मेघनाथ भिमराव राऊत,  खुशाल महादेव बरडे, धनराज सदाशिव वैद्य, तेजराव नथुजी फंदी, संध्याताई मनोहर राऊत, रमेश चंपत काळे व दानीश खान हनिफ पठाण.

 

"मुख्यमंत्री आमच्या गावात आले, आमचे दुःख ऐकले आणि थेट विहिरीचा लाभ दिला, हाच आमच्यासाठी सर्वात मोठा दिलासा आहे," अशी प्रतिक्रिया लाभार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

 

लोहारी सावंगा येथे २४३.३५ लाखांच्या साठवण तलावाचे बांधकाम

 

याच दौऱ्यात लोहारी सावंगा येथे साठवण तलावाचे बांधकाम करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. हा प्रकल्प लघु सिंचन मृद व जलसंधारण विभागाच्या सन २०२२-२३ च्या दरसूचीनुसार अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

साठवण तलाव प्रकल्पाची ठळक माहिती:

- प्रकल्पाचे ठिकाण: मौजा लोहारी सावंगा, ता. नरखेड, जि. नागपूर - नरखेडपासून ४० कि.मी. अंतरावर, गावाच्या दक्षिणेस

- प्रकल्पाची अंदाजित किंमत: २४३.३५ लक्ष रुपये

- तलावाची लांबी: २९० मी., महत्तम उंची ९.९० मी., माथा रुंदी ३.०० मी.

- लघुत्तम संचय पातळी (L.S.L.): १०२.६० मी.

- निम्नतम नाला तळपातळी (N.B.L.): ९७.९० मी.

- सिंचन क्षेत्र: अप्रत्यक्ष सिंचन क्षेत्राला लाभ

- लाभ झालेले गाव: लोहारी सावंगा

 

या साठवण तलावामुळे शेतीच्या सिंचनाला लाभ मिळेल, गावातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पिण्याच्या पाण्याची सोय होईल आणि या परिसरातील शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावण्यास मदत होणार आहे. या तलावासाठी वन विभागा यांच्या मान्यतेने भूसंपादन झालेले आहे.

 

मुख्यमंत्र्यांचा दिलासा

 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "शेतकरी हा राज्याचा कणा आहे. दुष्काळात शेतकरी एकटा नाही. सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. केवळ मदत देऊन थांबणार नाही, तर शेतकऱ्याला कायमस्वरूपी पाणी देणे हेच आमचे ध्येय आहे. सिंचन विहीर आणि साठवण तलावामुळे लोहारी सावंगा आता दुष्काळावर मात करेल."

 

मुख्यमंत्री आमच्या गावात दिवाळीला मुक्कामाला आले, आमच्यासोबत फराळ केला, आमचे दुःख ऐकले आणि पाण्याच्या योजना दिल्या, यामुळे गावात पुन्हा आशेचा उजेड पसरला आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

 

000000

No comments:

Post a Comment