Search This Blog

Sunday, 30 August 2020

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1224 कोरोना मुक्त


 

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1224 कोरोना मुक्त

जिल्हा कारागृहात आढळले 72 बाधित

24 तासात 270 बाधित आले पुढे; एका बाधिताचा मृत्यू

Ø  जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 2344

Ø  उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 1094

चंद्रपूर, दि. 30 ऑगस्ट: चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात 270 बाधित पुढे आलेले असून एकूण बाधितांची संख्या आता 2 हजार 344 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 1 हजार 224 कोरोना बाधित उपचाराअंती बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 1 हजार 94 आहे.

50 वर्षावरील नागरिकांची घरोघरी जाऊन मोठ्या प्रमाणात आरोग्य तपासणी सुरू आहे. नागरिकांनी घरी येणाऱ्या आरोग्य पथकाला सहकार्य करावे. नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टन्सिंग ठेवावे. हॅन्ड सॅनिटायजरचा वापर करावा तसेच ताप, सर्दी, खोकला सारखे लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य विभागाला माहिती देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार  जिल्ह्यात 24 तासात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. नवेगांव ता.मुल येथील 76 वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 21 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले. कोरोनासह न्युमोनिया तसेच श्वसनाचा आजार असल्याने 29 ऑगस्टला रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 26 बाधितांचा मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 23, तेलंगाणा, बुलडाणा व गडचिरोली येथील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे.

24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये जिल्हा कारागृहातील  एक अधिकारी व 71 कैदी बाधित ठरले असून चंद्रपूर शहर व परिसरातील 166 बाधितांचा समावेश आहे. त्याचबरोबर मुल 9, चिमूर 1 , नागभीड 21, राजुरा 8, वरोरा 13, भद्रावती 2, सावली 5, ब्रह्मपुरी 24, बल्लारपूर 5, कोरपना 14, गोंडपिपरी 2 बाधित पुढे आले अाहेत. असे एकूण 270 बाधित पॉझिटिव्ह ठरले आहेत.

चंद्रपूर शहरातील जिल्हा कारागृहातील सर्वाधिक पॉझिटिव्ह ठरले असून साई बाबा वार्ड, तुकुम, नगीना बाग, बंगाली कॅम्प, भानापेठ, समाधी वार्ड, सिस्टर कॉलनी, पठाणपुरा, जुने तलाठी कार्यालय परिसर, संत रवीदास चौक, जटपुरा गेट परिसर, कोतवाली वार्ड, सिव्हिल लाईन,  जीएमसी परिसर, अंचलेश्वर वार्ड, विठ्ठल मंदिर वार्ड,  घुटकाळा वार्ड, रयतवारी तसेच तालुक्यातील दुर्गापुर, पडोली, ऊर्जानगर भागातून बाधित पुढे आले आहेत.

मूल येथील पंचशील चौक तर  तालुक्यातील फिस्कुटी, चिंचाळा तालुक्यातून पॉझिटिव्ह ठरले आहेत. नागभीड तालुक्यातील तळोदी बाळापुर येथील बाधित ठरले आहेत. राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन परिसर, इंदिरानगर, चुनाभट्टी परिसरातून बाधित आढळून आले आहे.

वरोरा येथील अभ्यंकर वार्ड येथील बाधित ठरले आहेत. भद्रावती तालुक्यातील पाटाळा, गौराळा भागातून बाधित पुढे आले आहेत. सावली तालुक्यातील व्याहाड बु परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहेत.

ब्रह्मपुरी येथील संत रवीदास चौक, गुजरी वार्ड,हनुमान नगर तर तालुक्यातील बोरगाव,  उदापूर, चिंचोली, मेंडकी, जुगनाळा परिसरातून बाधित पुढे आले आहेत. बल्लारपूर येथील रेल्वे नगर वार्ड, गोकुळ नगर, महाराणा प्रताप वार्ड भागातून बाधित ठरले आहेत.

कोरपणा तालुक्यातील वनसळी, गडचांदूर परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील किरिमिरी, आर्वी गावातून बाधित ठरले आहेत.

000000

चंद्रपूर जिल्हयातील दिनांक 30 ऑगस्ट, 2020 रोजी पर्जन्यमानाची स्थिती दर्शवणारा तक्ता

 चंद्रपूर जिल्हयातील दिनांक 30 ऑगस्ट, 2020 रोजी पर्जन्यमानाची स्थिती दर्शवणारा तक्ता



Saturday, 29 August 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2074


 चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2074

1176 कोरोनातून बरे ; 873 वर उपचार सुरू

24 तासात 178 बाधितांची नोंद ; दोन बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर,दि. 29 ऑगस्ट: चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 2074 वर पोहोचली आहे. यापैकी कोरोनातून 1176 बाधित बरे झाले आहेत . तर सध्या 873 बाधितांवर उपचार सुरू आहे. 24 तासात 178 बाधितांची नोंद झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, नेताजी चौक विजासन रोड, भद्रावती येथील 70 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे. या बाधित महिलेला 19 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले. कोरोनासह न्युमोनिया असल्याने 28 ऑगस्टला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला.

तर दुसऱ्या बाधिताचा आज 29 ऑगस्टच्या पहाटे 2.30  वाजता 49 वर्षीय शेडमाके चौक दुर्गापूर, चंद्रपूर येथील बाधित पुरूषाचा मृत्यू झाला आहे. 29 जुलैला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसापासून बाधिताला श्वसनाचा त्रास जाणवत होता. वैद्यकीय शर्तीचे प्रयत्न करूनही 29 ऑगस्टच्या पहाटे 2.30  वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे बाधिताचा मृत्यू झाला.या बाधिताला न्युमोनियाचा आजार होता.

गेल्या 24 तासांमध्ये पुढे आलेल्या पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील सर्वाधिक 76 बाधित ठरले आहेत. त्याचबरोबर, पोंभुर्णा 4, कोरपना 5, सिंदेवाही 2, वरोरा 8, ब्रह्मपुरी 4, राजुरा 10, मुल 16, गोंडपिपरी 5, सावली 33, भद्रावती 4, चिमूर 2, बल्लारपूर 8, नागभिड एक असे एकूण 178 बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपूर शहरातील नगीना बाग, पंचशील चौक, जटपुरा वार्ड, जलनगर, भानापेठ, तुकूम, रामाळा तलाव, विठ्ठल मंदिर वार्ड, बियाणी नगर, चांदमारी चौक, पठाणपुरा गेट, गंज वार्ड, रामनगर, गोपाल पुरी वार्ड, सरकार नगर, रयतवारी, सिव्हिल लाईन, जीएमसी चंद्रपूर परिसर, नर्सिंग होस्टेल परिसर, गायत्री नगर, बालाजी वार्ड, सन्मित्र नगर, कृष्णा नगर, अंचलेश्वर वॉर्ड, बाबुपेठ, समाधी वार्ड तर तालुक्यातील घुग्घुस, मोहर्ली गेट भागातून बाधित ठरले आहेत.

पोंभुर्णा तालुक्यातील कसरगट्टा गावातून बाधित पुढे आले आहेत. कोरपना तालुक्यातील उपरवाही, गडचांदूर, आवारपूर परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहेत.

सिंदेवाही शहरातील तसेच तालुक्यातील लोनवाही गावातून बाधित ठरले आहेत. वरोरा येथील गुरु माऊली नगर, अभ्यंकर वार्ड तर  तालुक्यातील शेगाव, अहेगाव गावातून पॉझिटिव पुढे आले आहेत. ब्रह्मपुरी येथील गुरुदेव नगर तर तालुक्यातील नानोरी, चांदली गावातून बाधीत ठरले आहेत.

राजुरा येथील पेठ वार्ड, इंदिरानगर, साई मंदिर परिसरातील तर तालुक्यातील लखमापूर, विहीरगाव भागातून बाधित पुढे आले आहेत. मूल तालुक्यातील फिस्कुटी, चिंचाळा, बोरचांदली, राजोली गावातून बाधित ठरले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील आर्वी, वढोली भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहेत. सावली तालुक्यातील व्याहाड बु, सामदा गावातून बाधित पुढे आले आहेत.भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथून बाधित ठरले आहेत. चिमूर तालुक्यातील सोनेगाव व म्हसाळा गावातून पॉझिटिव्ह ठरले आहेत.

00000

चंद्रपूरातील बचतगटांची उत्पादने आता ॲमेझानवर ना. वडेट्टीवार यांचे हस्ते करण्यात आले वेबसाईटवर प्रदर्शित





चंद्रपूरातील बचतगटांची उत्पादने आता ॲमेझानवर

ना. वडेट्टीवार यांचे हस्ते करण्यात आले वेबसाईटवर प्रदर्शित

चंद्रपूर, दि. 29 ऑगस्ट : गावपातळीवर आपल्या गुणकौशल्यातून विविध नाविण्यपुर्ण उत्पादने निर्माण करणाऱ्या उमेद स्वयंसहायता समुहांना जागतिक बाजारपेठ मिळविण्याच्या दृष्टीने जिल्हयाने आणखी एक महत्वाचे पाउल टाकले आहे. जिल्हातील उमेद समुहांची उत्पादने आता ॲमेझान या ई कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध झाली आहेत. दिनांक 29 ऑगस्ट रोजी नियोजन भवनात महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते औपचारिकरित्या या उत्पादनांना वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आले. 

    राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची (उमेद) अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. सदयस्थितीत जिल्हयात सुमारे 7200 समुह आहे. या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर 860 ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली आहे, तर 34 प्रभागसंघ तयार झाले आहेत. अभियानाच्या माध्यमातून सुमारे 1 लाख 80 हजार कुटूंबे आपल्या विविध आर्थिक गरजा भागवत आहेत. जिल्हयात विविध समुह अनेक उत्पादने तयार करीत आहेत. यात कलाकुसरीच्या वस्तू , खादय उत्पादने, काष्ठ शिल्प, वनऔषधी आदीचा समावेश आहे. सध्या या वस्तू जिल्हा व राज्य पातळीवरील प्रदर्शने तसेच स्थानिक स्तरावर विकल्या जात आहेत. आता या उत्पादनांना जागतिक दर्जाच्या ई कॉमर्स वेबसाईट ॲमेझान वर स्थान मिळाले आहे. 

    आज नियोजन भवनात झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या सह जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर आदीची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी बल्लारपूर तालुक्यातील कोठारी, विसापूर येथील सुरभी, झाशी राणी व जागृती या स्वयंसहायता समुहातील महिलांना ॲमेझान उत्पादनाचे पत्र देण्यात आले तसेच त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ना. वडेट्टीवार यांनी महिलांचे कौतुक करीत सदर वस्तू आता भारतभरातील ग्राहक खरेदी करतील आणि या माध्यमातून महिलांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल, असा विश्वास व्यक्ती केला. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनीही यावेळी महिलांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा अभियान संचालक राहुल कर्डिले यांनी लवकरच ॲमेझानवरील उत्पादनांची संख्या वाढून 16 होईल, असे सांगितले. तसेच उमेद अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहायता समुहांचे उत्पादने जिल्हा तसेच जिल्हास्तरावरील विक्री केंद्रातून उपलब्ध होतील, असे सांगितले. 

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजने यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा व्यवस्थापक संदीप घोंगे, तालुका अभियान व्यवस्थापक उमप, सुकेशीनी गणवीर, श्री. माउलीकर, सुहास वाडगुरे यांनी सहकार्य केले.

0000000

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी खाजगी डॉक्टरांनी शासकीय यंत्रणेत सहभागी व्हावे : ना. विजय वडेट्टीवार





 कोरोना संक्रमण रोखण्यासाठी खाजगी डॉक्टरांनी

शासकीय यंत्रणेत सहभागी व्हावे : ना. विजय वडेट्टीवार

Ø लंपी आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण वाढवा

Ø पालकमंत्र्यांकडून कोरोनासह विविध विभागाचा आढावा

चंद्रपूर, दि.29 ऑगस्ट: चंद्रपूर जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या बघता कोरोना संक्रमण रोखण्यासाठी 20 ते 25 खासगी डॉक्टरांना शासकीय रुग्णालयाची जोडून घ्यावे, तसेच जिल्ह्यात गुरांवर आलेल्या लंपी आजाराच्या नियंत्रणासाठी यंत्रणा बळकट करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री  तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडलेल्या बैठकीत कोरोनासह विविध विभागांचा त्यांनी आढावा घेतला.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या काळात बाधितांना उत्तमोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी  20 ते  25 डॉक्टरांची आवश्यकता असून खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना कोरोनाच्या कार्यात जोडून घेण्याच्या तसेच त्यासंबंधी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्यात.  

          यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एन. मोरे, मुख्य वनसंरक्षक जितेंद्र खामगावकर,  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता  सुषमा साखरवाडे आदींसह अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात  कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून मोठ्या प्रमाणात बाधित पुढे येत आहेत. यासाठी रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्याच्या सूचना तसेच मनुष्यबळाची उपलब्धता वाढविण्यासाठी पर्यायी व्यवस्था, ऑक्सिजन जनरेशन प्लांट लावण्यासंदर्भातील सूचना देखील यावेळी आरोग्य विभागाला दिल्या.

जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केलेल्या असून 50 वर्षावरील नागरिकांचे घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करून घेण्याचे कार्य जिल्ह्यात सुरू केले आहे. तसेच आयएलआय व सारी रुग्णांची देखील तपासणी जिल्ह्यात सुरू आहे. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यासोबतच जिल्हा आरोग्य विभागामार्फत संक्षिप्त माहिती देणारी होम आयसोलेशन म्हणजेच गृह विलगीकरण ही माहिती पुस्तीका तयार करण्यात आले असून त्यांचे लोकार्पण मा. पालकमंत्री यांच्या हस्ते आज करण्यात आले. ही पुस्तीका सर्वसामान्य नागरिकासाठी अती महत्वाची ठरेल.

यासोबतच नगर विकास विभागाअंतर्गत चंद्रपूर तालुका तसेच ब्रह्मपुरी व सिदेंवाही नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी हद्दवाढ ही महत्त्वाची असून त्यासाठी मास्टर प्लान तयार करण्याच्या सूचना नगर विकास विभागाला दिल्या.

         लम्पी हा आजार गाई व म्हशींमध्ये आढळणारा त्वचारोग असून याचा प्रादुर्भाव महाराष्ट्रा सह चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून दिली आहे. गावोगावी शिबिरे आयोजित करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात गोठे फवारणी सुद्धा करण्यात आली आहे, यासोबतच 7 तालुक्यातील 82 हजार 900 गावामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण सुद्धा  करण्यात आले आहे. मनुष्यबळाअभावी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्राकरिता चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, सिंदेवाही या तालुक्यातील 143 गावांचा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समावेश केला असून त्याबाबत मास्टर प्लान तयार करण्यासंदर्भात वनविभागाला पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी निर्देश दिलेत.

000000