Search This Blog

Tuesday, 2 February 2021

उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय@गडचिरोली

 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय@गडचिरोली

4 फेब्रुवारी रोजी गोंडवाना विद्यापीठात आयोजन

 

             चंद्रपूर, दि. 2 फेब्रुवारी :  2, महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय@गडचिरोली हा उपक्रम 4 फेब्रुवारी रोजी गोंडवाना विद्यापीठात दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे.  या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे उच्च व तंत्र शिक्षण विभागातील मंत्रालय व संचालक स्तरावरील अधिकाऱ्यांसमवेत गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठाचे कर्मचारी, शैक्षणिक संस्था, आदि ‍विविध घटकांच्या अडी-अडचणी ऐकूण घेऊन त्या सोडविणार आहेत.

            गोंडवाना विद्यापीठाने सर्व संबंधित घटकांच्या सोयीसाठी विद्यापीठाच्या www.unigug.ac.in या वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय गडचिरोली हे विशेष पोर्टल निर्माण केलेले आहे. येथे नागरिकांना इंग्रजी अथवा युनिकोड मराठीतून आपले प्रश्न मांडता येणार आहे. निवेदनाची सॉप्ट कॉपी जोडण्याची व्यवस्थाही येथे आहे. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांना आपली निवेदने ऑन लाईन सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ज्यांना ऑनलाईन निवेदन सादर करणे  शक्य होणार नाही, त्यांनाही उपस्थित राहून मंत्री महोदयांना आपले निवेदन सादर करता येईल.

चंद्रपूर जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना त्यांच्या अडी-अडचणी विदयापीठाच्या www.unigug.ac.in वेबसाईटच्या मुख पृष्ठावरील उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय गडचिरोली या पोर्टल वर मांडता येणार असल्याचे नागपूर येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक मिनाक्षी कांबळे यांनी कळविले आहे.   

*****

सन 2021 मधील स्थानिक सुट्टया जाहीर

 सन 2021 मधील स्थानिक सुट्टया जाहीर

तान्हा पोळा, पितृमोक्ष अमावस्या व धनत्रोयदशी सणाला सुटी

चंद्रपूर, दि. 2 फेब्रुवारी :  चंद्रपूर जिल्ह्यात सन 2021 या वर्षाकरिता स्थानिक सुट्टया जाहिर करण्याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेश निर्गमित केला आहे.

            यानुसार  तान्हा पोळा (पोळ्याचा दुसरा दिवस) मंगळवार दि. 7 सप्टेंबर 2021 रोजी, पितृमोक्ष अमावस्या बुधवार दि. 6 ऑक्टोबर 2021 रोजी व धनत्रयोदशी मंगळवार दि. 2 नोव्हेंबर 2021 रोजी संपूर्ण चंद्रपूर जिल्हा करिता सुटी घोषित करण्यात आली आहे. तथापी हा आदेश चंद्रपूर जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि बँका यांना लागू होणार नाही असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.


*****

नाफेडतर्फे तुर खरेदी सुरू

 नाफेडतर्फे तुर खरेदी सुरू

चंद्रपूर, दि. 2 फेब्रुवारी :  हंगाम 2020-21 मध्ये शासनाने तुर खरेदीसाठी प्रति क्विंटल रुपये सहा हजार दर मंजूर केला आहे. तुर खरेदीसाठी केंद्र शासनाने नाफेडची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली असून नाफेडच्या वतीने राज्यामध्ये पणन महासंघामार्फत तुर खरेदी सुरू आहे. तुर खरेदीचा नोंदणी कालावधी 28 डिसेंबर 2020 पासून सुर झाला आहे. तुर खरेदी 20 जानेवारी ते 19 एप्रिल 2021 या कालावधीत करण्यात येणार आहे.

            ज्या तालुक्यात खरेदी केंद्र सुरू नाही त्या तालुक्यांना खालीलप्रमाणे दिलेल्या खरेदी केंद्रावर तालुकानिहाय जोडण्यात आले आहे.

चंद्रपूरसाठी भद्रावती, पोंभुर्णा, सावली व मुल, वरोरा खरेदी केंद्रासाठी वरोरा तालुका, चिमुर खरेदी केंद्राला ब्रम्हपुरी सिंदेवाही व नागभिड, गडचांदुर खरेदी केंद्राला कोरपना व जिवती, राजुरा खरेदी केंद्राला गोंडपिपरी व बल्लारपूर तालुके जोडण्यात आले आहेत.

            तरी वरीलप्रमाणे दिलेल्या खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करणेसाठी आपले आधार कार्ड व्होटींग कार्ड, शेतीचा सातबारा, बँक खाते पासबुक इ. संपुर्ण माहितीसह खरेदी केंद्रावर जावून नोंदणी करावी व दिलेल्या मुदतीत तूर विक्रीकरीता खरेदी केंद्रावर जावे असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी ए.आर.गोगीरवार यांनी कळविले आहे.

0000

प्रशिक्षणातून कौशल्य विकसित करून रोजगार प्राप्त करा

 


प्रशिक्षणातून कौशल्य विकसित करून रोजगार प्राप्त करा

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 चे उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 2 फेब्रुवारी :  कौशल्य विकास कार्यक्रमाची सुरवात सन 2015 पासून करण्यात आलेली आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी परिपूर्ण प्रशिक्षणातून आपले कौशल्य विकसित करून घ्यावे व त्यातून रोजगार किंवा स्वंयरोजगार प्राप्त करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

 कौशल्य विकास कार्यक्रमाची अंमलबलावणी करणे करीता प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरु करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, यांचे हस्ते क्वेस कॉप लि. पिएमकेके, चंद्रपूर या संस्थेमध्ये नुकतेच प्रशिक्षण बॅचचे उद्घाटन करण्यात आले.

कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता र्मागदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्यासाहेब येरमे यांनी उमेदवारांना चालुन आलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या संधीचा लाभ  घ्यावा व जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी  व्हावे असे आवाहन केले.

            यावेळी संस्थेचे संचालक अनुराग सिंग यांनी संस्थेतर्फे प्रशिक्षणार्थ्यांना सिसिटीव्ही इन्टॉलेशन, कम्प्युटिंग ॲण्ड पेरीफेरल टेक्नीशीअन या जॉब रोलमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती दिली. या मध्ये विविध कंपनीशी टाय अप असून उमेदवारांना रोजगार/ स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले.

            उपस्थित 85 प्रशिक्षणार्थ्यां जिल्हाधिकारी गुल्हाने व सहायक आयुक्त भैय्यासाहेब येरमे यांचे हस्ते प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची किट वाटप करण्यात आली.

            या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

000

बांधकाम कामगारांना सुरक्षासंच वाटप

 बांधकाम कामगारांना सुरक्षासंच वाटप

सहाय्यक कामगार आयुक्तांतर्फे लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 2 फेब्रुवारी :  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुबंई यांच्या मार्फत जिवित व नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वाटपाचे नियोजन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करण्यात आले असुन, नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त नितीन पाटणकर यांनी केले आहे.

संचवाटपाचा कार्यक्रम सोमवार ते शनिवार (सणाचे दिवस सोडुन) शनि मंदिर समोर, मोरवा, चंद्रपूर येथे सकाळी 09 ते संध्या 06 वाजे पर्यंत सुरू आहे. लाभार्थ्यांनी किवा संघटनेच्या प्रतिनिधी यांना संच घेणे करीता टोकन नंबर घेणे बंधनकारक आहे. सदर संच घेणे पुर्वी 09307059020 या क्रमाकावर संपर्क साधुन आपला दिवस व वेळ निश्चित करुन संच वाटप ठिकाणी हजर राहावे, अन्यथा टोकन नसलेल्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच कोविड -19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता संच वाटप ठिकाणी लाभार्थ्यांनी मास्क, सानिटायजर व सुरक्षित अंतर राखणे बंधनकारक असेल.

 

सदर सुरक्षा संच व अत्यावश्यक वाटप हे नि:शुल्क असून कामगारांनी कोणत्याही एजंट /दलाल/ मध्यस्थी यांच्या प्रलोभनाला बळी पडु नये तसेच सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाकरीता कोणासही रक्कम देण्यात येऊ नये. बोगस कामगार निदर्शनास आल्यास योग्य ती कारवाही केली जाईल, असे सहाय्यक कामगार आयुक्त नितीन पाटणकर यांनी कळविले आहे.

0000