Search This Blog

Saturday, 3 April 2021

विकास कामातून सिंदेवाहीचा लवकरच कायापालट - पालकमंत्री विजय वडेट्टीवार



 

विकास कामातून सिंदेवाहीचा लवकरच कायापालट

- पालकमंत्री विजय वडेट्टीवार

 

            चंद्रपूर दि. ३ एप्रिल : सिंदेवाही विभागात मोठ्या प्रमाणात विकास कामांना मंजुरी देण्यात आली असून ही कामे पूर्ण झाल्यावर लवकरच या भागाचा कायापालट होईल असे आश्वासन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिले.

नगरपंचायत सिंदेवाहीच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या बाजार ओट्याचे बांधकाम, स्मशानभूमीचे बांधकाम व खुले भुखंड सौंदर्यीकरण कामांचे भूमिपूजन आज पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सिंदेवाहीच्या नगराध्यक्षा आशा गंडाटे, उपाध्यक्ष स्वप्नील कावळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, मुख्याधिकारी सुप्रिया राठोड, सरपंच रूपाली रत्नावार, नगरसेवक भुपेश लाडे इ. प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की आता ज्या कामांना मंजुरी दिली आहे ती कामे पुढील दोन-तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येतील. उन्हाळ्यात नागरिकांना थंड व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पाण्याचे 19 एटीएम बसविण्यात येणार असून यासाठी 1 कोटी 65 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. रस्ते बांधकामासाठी 33 कोटी, ई-लायब्ररी, तहसील इमारतीचे सौंदर्यीकरण, पोलिस स्टेशन इमारतीचे बांधकाम, पोलिसांचे निवासस्थान, पंचायत समिती इमारत, ग्रामीण रुग्णालयाचे 100 बेडमध्ये अद्यावतीकरण, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेला कुम्पण, पर्यटन सफारी, अग्निशमनची गाडी, वन उपजावर आधारित प्रकल्प इ. कामे सिंदेवाही मध्ये मंजूर करण्यात आली आहेत. तसेच 2023 पर्यंत गोसेखुर्द कालव्याचे काम पूर्ण होऊन सिंदेवाहीतील 65 टक्के जमीन सिंचन सिंचनाखाली येईल व मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होऊन शेतीसाठी वरदान ठरेल. सिंदेवाही शहर झपाट्याने विकासाच्या दिशेने पुढे जाईल असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्षा आशा गंडाटे यांनी केले. नगरपरिषदेच्या कामासाठी चार कोटी रुपये तातडीने उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला सिंदेवाही नगरपंचायतीचे नगरसेवक तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.

0 0 0

पर्यटनाच्या माध्यमातून नावलौकिक व रोजगार

 



पर्यटनाच्या माध्यमातून नावलौकिक व रोजगार

सिंदबोडी कच्चेपार जंगल सफारीचे उद्घाटन प्रसंगी

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन

            चंद्रपूर दि. ३ एप्रिल : चंद्रपूर जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. देश विदेशातील सेलिब्रिटीं येथे भेट देत असतात.  कच्चेपार जंगल सफारीच्या माध्यमातून या भागाचे नावलौकिकात भर तर पडेलच सोबतच रोजगारात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील सिंदबोडी कच्चेपार जंगल सफारीचे उद्घाटन आज पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रवीण,  उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सिंदेवाहीच्या नगराध्यक्षा आशा गंडाटे . जिल्हा परिषद सदस्य रूपा सुरपाम,  सहायक वनसंरक्षक रामेश्वरी भोंगाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की या भागातील मोहाडी नलेश्वर येथे महिंद्रा क्लबचे वतीने 100 एकर जागेवर पर्यटकांकरिता हाॅटेल व्यवसाय सुरू करण्यात येणार आहे, यातून येथील सुमारे 400 नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. एका नामवंत अगरबत्ती कंपनीचा प्रकल्प येत असून त्याद्वारे 600 महिलांना रोजगार प्राप्त होईल. तसेच गौण वनउपजावर आधारित 42 कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करण्यात येणार असून या सर्व कामातून जवळपास दिड हजार नागरिकांना या भागात रोजगार उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रवीण यांनी सांगितले की ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्र हे वनसंपदा व वन्यजीवांच्या बाबतीत ताडोबापेक्षा कमी नाही, येथील नागरिकांनी पर्यटनाचा रोजगारासाठी फायदा करुन घ्यावा.

यावेळी पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते शामा प्रसाद जनवन योजनेंतर्गत मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी गावाला सौर कुंपण, सौर दिवे, गावालगत साफसफाई इ. कामांसाठी 19 गावातील संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सचिव यांना सुमारे पाच कोटींचे धनादेश वाटप करण्यात आले. या निधीचा उपयोग गावाच्या विकासासाठी तसेच पिकांच्या संरक्षणासाठी होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सुरवातीला सहाय्यक वनसंरक्षक रामेश्वरी भोंगाडे यांनी प्रास्ताविक केले. कच्चेपार जंगल सफारी साठी 38 किलोमीटर ट्रॅक तयार असून या भागात वाघ, बिबट, अस्वल इ. वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. पक्षीप्रेमींसाठी हे जंगल नंदनवन असुन  विविध प्रकारचे पक्षी येथे मोठ्या प्रमाणात आहेत. जंगलात दोन तलाव व तीन पाणवठे आहेत. सफारी साठी 7 वाहने मंजूर करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

0 0 0

Friday, 2 April 2021

30 एप्रिल पर्यंत पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग बंद

 30 एप्रिल पर्यंत पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग बंद

Ø  ऑनलाइन वर्ग सुरू

Ø  इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग पूर्वीप्रमाणे सुरू

 

चंद्रपूर दि. 2 एप्रिल : कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या मोठया' प्रमाणात वाढत असल्याने  आपात्कालीन परिस्थीती उद्भवू नये यादृष्टीने पुर्व तयारी म्हणून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते नववी व इयत्ता अकरावीचे वर्ग तात्पुरते स्वरुपात दि. 5 एप्रिल ते  30 एप्रिल 2021 या कालावधीकरीता बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शाळा बंद असली तरी जिल्हयातील इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावी चे वर्ग ऑनलाईन सुरु राहतील. तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचे वर्ग कोव्हीड-19 च्या सर्व सुरक्षा विषयक नियमांचे पालन करुन  पुर्वीप्रमाणेच सुरु राहतील. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी नियमितपणे व  आवश्यकतेनुसार शाळेत उपस्थित राहतील. शिक्षक शाळेत येऊन ऑनलाईन वर्ग घेतील तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या बोर्ड परोक्षेकरीता शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार काम करतील.

सर्व शाळांना कोव्हीड-19 च्या अनुषंगाने राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने  वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक राहील. सदर आदेशाची कोणतेही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी अंमलबाजवणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीताविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता तसेच साथरोग कायदा अन्वये  कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

0000000

गत 24 तासात 179 कोरोनामुक्त


 गत 24 तासात 179 कोरोनामुक्त  

297 पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

Ø  आतापर्यंत 25,569 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 2407

चंद्रपूर, दि. 02 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 179 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 297 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 28 हजार 407 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 25 हजार 569 झाली आहे. सध्या 2407 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 78 हजार 323 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 45 हजार 965 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

            आज मृत झालेल्यामध्ये पळसगाव माजरी येथील 85 वर्षीय पुरूष व खारखाडा ब्रम्हपुरी येथील 45वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 431 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 391, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 297 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 113, चंद्रपूर तालुका 23,  बल्लारपूर पाच, भद्रावती 40, ब्रम्हपुरी 11, नागभीड दोन, सिंदेवाही पाच, मूल चार, सावली एक, पोंभूर्णा तीन, गोंडपिपरी दोन, राजूरा दोन, चिमूर 21, वरोरा 47, कोरपना 12, जीवती एक व इतर ठिकाणच्या पाच रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0 0 0

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दौरा


 पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दौरा

            चंद्रपूर, दि. 02 एप्रिल : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे दिनांक 3 एप्रिल पासून चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 3 एप्रिल 2021 रोजी स. 11.30 वा. कच्चेपार ता. सिंदेवाही  येथे नागपूरहुन आगमन व वनविभाग ब्रम्हपुरी द्वारा आयोजित वनसफारी  उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दु. 12.15 वा. कच्चेपार येथुन सिंदेवाहीकडे प्रयाण. दु. 12.30 वा. विश्रामगृह सिंदेवाही येथे आगमन व राखीव. दु. 12.50 वा. सिंदेवाही तालुक्यातील विकास कामासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची पंचायत समिती सभागृह येथे आढावा बैठक.  दु.2.30 वा. नगरपंचायत सिंदेवाहीच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या बाजार ओट्याचे बांधकाम, स्मशानभूमीचे बांधकाम व खुल्या जागेचे सौंदर्यीकरण या कामाचे भूमिपूजन कार्यक्रमाला टेकडी रोड, आठवडी बाजाराची जागा येथे उपस्थित. दु. 3.15 वा. देवराव ठाकरे प्रभाग क्रमांक 14 यांचेकडे भेट. सायं. 4 वा. सिंदेवाही येथून ब्रम्हपुरीकडे प्रयाण. सायं. 5 वा ब्रम्हपुरी विश्रामगृह येथे आगमन व राखीव. 5.40 वा. स्थानिक पदाधिकारी समवेत चर्चा. रात्री विश्रामगृह ब्रम्हपुरी येथे मुक्काम.

रविवार दि. 4 एप्रिल रोजी सकाळी 10 वा. नगरपरिषद ब्रम्हपुरीच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या ई-लायब्ररीचे भूमिपूजन कार्यक्रमास तहसील कार्यालयाजवळ उपस्थिती. स. 11 वा. ब्रह्मपुरी तालुक्यातील विकास कामासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची विश्रामगृह येथे बैठक. दु. 12.30 वा. आवळगावकडे प्रयाण. दु.12.40 वा. आवळगाव येथे आगमन व श्री. खोकले व श्री. निखुरे यांचेकडे सांत्वनापर भेट. दु. 1 वा. हळदा येथे आगमन व श्री. आवारी यांचेकडे सांत्वनापर भेट. दु. 1.20 वा. वांद्रा येथे आगमन व वांद्रा पोचमार्ग व समाज मंदिर बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित. दु.2.30 वा. शासकीय विश्रामगृह ब्रम्हपुरी येथे आगमन व राखीव. सायं. 5 वा. ब्रम्हपुरी येथून गडचिरोलीकडे प्रयाण.

सोमवार दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वा. चंद्रपूर येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात कोवीड-19 संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक. स. 11.30 वा. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या व सुरू करण्यात येणाऱ्या विकास कामासंदर्भात वीस कलमी सभागृहात आढावा बैठक. दु. 1.30 ते 2 राखीव. दु.2 वा. नियोजन भवन येथे  वनविभागाची आढावा बैठक. दु.2.45 वा. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, पारेषण व निर्मिती या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक. दु.3.30 वा. रामाळा तलावाची पाहणी. सायं 4 वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतींच्या बांधकामाची पाहणी व आढावा बैठकीस नवीन प्रशासकीय इमारत, विजय नगर बायपास रोड, चंद्रपूर येथे उपस्थित. सायं. 5 वा. स्त्री रूग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर येथील कोवीड-19 सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5.30 वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर येथे पत्रकार परिषद. सायं. 6.30 वा. अॅड. जयंत साळवे यांचेकडे सांत्वनापर भेट. सायं. 7 वा. हिराई विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.

मंगळवार दि. 6 एप्रिल रोजी सकाळी 10 वा. चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते प्रदुषण लक्षात घेता पर्यावरण विभागासह संबंधित विभागाची नियोजन भवन येथे आढावा बैठक. स. 11 वा. चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योग संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची नियोजन भवन येथे आढावा बैठक. स. 11.30 वा. चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी विभागाची आढावा बैठक. दु. 12 वा. केपीसीएल बरांज मोकासा येथील प्रकल्प ग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची नियोजन भवन येथे आढावा बैठक. दु. 12.30 वा. चंद्रपूर शहरातील वाढत्या वाहतूक समस्येबाबत संबंधित अधिकाऱ्यांची नियोजन भवन येथे आढावा बैठक. दु. 1 वा. मानव विकास योजनेसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची नियोजन भवन येथे आढावा बैठक. दु. 1.30 ते 2.30 राखीव. दु. 2.30 वा. पदाधिकारी समवेत चर्चा. दु. 3.30 वा. चंद्रपूरहुन नागपूर कडे प्रयाण.

0 0 0