Search This Blog

Thursday, 28 October 2021

गुरुवारी जिल्ह्यात 2 बाधित तर ॲक्टीव्ह रुग्ण 24


गुरुवारी जिल्ह्यात 2 बाधित तर ॲक्टीव्ह रुग्ण 24

चंद्रपूर, दि. 28 ऑक्टोंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 2 जण नव्याने बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात गुरुवारी एकाही बाधिताचा  मृत्यू  झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या  रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रात 2 रुग्ण आढळले असून चंद्रपूर तालुका, बल्लारपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा , गोंडपिपरी , राजूरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती  व इतर  ठिकाणी  बाधित रुग्णांची संख्या शुन्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 812 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 246 झाली आहे. सध्या 24 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 31 हजार 685 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 41 हजार 412 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000


दुचाकी वाहनांसाठी नविन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरु

 दुचाकी वाहनांसाठी नविन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरु

चंद्रपूर दि.28 ऑक्टोंबर: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची  MH34-CA-0001 ते 9999 पर्यंतच्या नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका लवकरच सुरू करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनाकरिता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी दि.29 ऑक्टोंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

अर्जदाराने पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत, क्रमांकानुसार विहित केलेले शासकीय शुल्क, डीडी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,चंद्रपुर यांच्या नावे विहित शुल्क रकमेचा भरणा मालिका सुरू झाल्यानंतर करून आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक प्राप्त करून घ्यावे, तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यानंतर वाहनाचे कागदपत्रे तात्काळ सादर करणे अनिवार्य राहील. मालिका सुरू असताना वाहन-4 प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर बंद करण्यात येईल.

प्राप्त होणारे अर्ज दुपारी 4 वाजेपर्यंत कार्यालयांमध्ये स्वीकारले जातील. 29 ऑक्टोंबर रोजी अर्जाची छाननी करण्यात येईल. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास, अर्जदाराने कार्यालयामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज आले किंवा कसे याबाबत चौकशी करावी. एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत 29 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वाढीव शुल्काचे धनाकर्ष स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहील. तसेच सायंकाळी 4.30 पर्यंत बंद लिफाफे उघडण्यात येतील व जास्त रकमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश परत करण्यात येतील. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

00000

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 


पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

Ø विविध विभागांचा घेणार आढावा

चंद्रपूर दि. 28 ऑक्टोंबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 29 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी  12 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व तालुक्यातील विकास कामांबाबत आढावा बैठक. दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. सायंकाळी 6 वाजता ब्रह्मपुरी येथून कमलाई निवास, रामदास पेठ, नागपूरकडे प्रयाण.

शनिवार दि. 30 ऑक्टोबर 2021 रोजी, सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील विस कलमी सभागृहात, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत संबंधित विभागाशी आढावा बैठक. सकाळी 11.45 वाजता कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लि. व बरांज कोल माईन्स प्रा. लि. येथील कामगारांच्या किमान वेतन संबंधाने व इतर तक्रारीबाबत आढावा बैठक. तसेच एम्टा व्यवस्थापन व  कामगारांमध्ये दि. 30 सप्टेंबर 2021 रोजीच्या बैठकीत झालेल्या आश्‍वासनांची पूर्तता होण्याबाबत बैठक. दुपारी 12.30 वाजता जिल्हा खनिज विकास निधी अंतर्गत प्राप्तनिधी, खर्चित निधी, अखर्चित निधी, प्रस्तावित कामे तसेच कार्पेट क्लस्टर बाबत आढावा बैठक. दुपारी 1.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त प्रस्तावावर झालेली कार्यवाही, खर्चित निधी, अखर्चित निधी याबाबत आढावा बैठक. दुपारी 2 ते 2.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव.

दुपारी 2.30 वाजता बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यात  सुरू, अपूर्ण, प्रस्तावित कामांबाबत तसेच कामनिहाय प्राप्त निधी, खर्चित निधी, अखर्चित निधी याबाबत आढावा बैठक. दुपारी 3.15 वाजता सिंचाई विभागासह मध्यम, लघू, पाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यात सुरु, पूर्ण प्रस्तावित कामांबाबत तसेच कामनिहाय प्राप्त निधी, खर्चित निधी, अखर्चित निधी याबाबत आढावा बैठक. दुपारी 3.45 वाजता मूल तालुक्यातील, ग्रामपंचायत बेंबाळ येथील पाणीपुरवठा समस्येबाबत आढावा बैठक. सायंकाळी 4.15 वाजता घुगुस शहरातील वार्ड क्र. 6 मधील सन  2014-15 मध्ये बांधकाम केलेले सभागृह जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करण्याबाबत बैठक.  सायंकाळी 4.45 वाजता आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, कोविड-19 व जिल्ह्यातील आरोग्य विषयासंदर्भात संबंधित आरोग्य विभाग व वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आढावा बैठक. सायंकाळी 5.15 वाजता चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त पुनर्वसन सायवन, आवंढा, कचराळा व गुंजाळा येथील पुनर्वसितांना भूखंडाचे वाटप करून पट्टे देण्याबाबत बैठक. सायंकाळी 5.45 वाजता पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक. सायंकाळी 6.15 वाजता परिवहन (आरटीओ) विभागातील अधिकाऱ्यांसोबत वाहतूक संदर्भात चर्चा. रात्री 8 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे आगमन व मुक्काम.

रविवार दि. 31 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9:30 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथून सिंदेवाहीकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही येथे विभागीय कृषी संशोधन केंद्राच्यावतीने आयोजित धान महोत्सव, शेतकरी मेळावा व चर्चासत्राच्या आयोजित कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 1 वाजता शिवटेकडी रत्नापुर ता. सिंदेवाही येथे आगमन व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 4 वाजता सिंदेवाही येथून कमलाई निवास,रामदास पेठ, नागपूरकडे प्रयाण.

00000

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित


 उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित

चंद्रपूर दि.28 ऑक्टोंबर: महाराष्ट्र शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत वेळोवेळी निर्गमित केलेल्या कोरोना  वर्तणूक विषयक सूचना व निर्देशाचे यथोचितरित्या काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये 50 शिकाऊ अनुज्ञप्ती व 140 पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन,  पप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

ही आहेत शिबिराची स्थळे:

दि.22 नोव्हेंबर 2021 रोजी आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 23 नोव्हेंबर रोजी एन. एच. महाविद्यालय ब्रह्मपुरी, 25 नोव्हेंबर रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर, 26 नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह, चिमूर तर 30 नोव्हेंबर रोजी  शासकीय विश्रामगृह, गोंडपिपरी या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

00000

चंद्रपूर जिल्हयात नाविन्यपूर्ण योजनांने काम समाधानकारक - राजेश क्षीरसागर



 जिल्हयांनी कायमस्वरूपी प्रकल्प उभारावेत

चंद्रपूर जिल्हयात नाविन्यपूर्ण योजनांने काम समाधानकारक

 - राजेश क्षीरसागर

            चंद्रपूर, दि.28 ऑक्टोंबर : जिल्हयातील नाविन्यपूर्ण योजनांमधून झालेले काम समाधानकारक आहे. मात्र, या योजनांमधून  कायमस्वरूपी प्रकल्प किंवा मालमत्ता उभाराव्यात, असे निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजना, उपयोजना व मानव विकास कार्यक्रमांतील योजनांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते.  

बैठकीला अतिरिक्त आयुक्त संजय धिवरे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ.मिताली सेठी, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन  वायाळ,  महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, प्रकल्प अधिकारी रोहन घुगे,  मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर उपस्थित होते.

        जिल्हयातील नाविन्यपूर्ण कामांची माहिती जिल्हाधिकारी श्री.गुल्हाने यांनी यावेळी दिली. यामध्ये मूल तालुक्यातील चिरोली गावाजवळ अंधारी नदीवर केलेल्या पूलवजा बंधाऱ्याने मासेमारी व्यवसायाकरीता सोय निर्माण झाली आहे. त्यासोबतच 800 हेक्टर क्षेत्रात शेतीसाठी सिंचनाची सोय उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी  सांगितले. तसेच सन 2018-19 मध्ये  पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध होण्यासाठी 224 अंगणवाड्यामध्ये वॉटर एटीएम लावण्यात आले. बचतगटांच्या  महिलांना कापडी पिशव्या व बॅग शिवणकामाच्या प्रशिक्षणामुळे आर्थिक मदत झाली आहे.  एकात्मिक बालविकास योजनेतर्गत चंद्रपूर व बल्लारपूर येथे आयएसओ मानांकीत अंगणवाडी केंद्र उभारण्यात आले आहे.  तर 2020-2021 मध्ये नाविन्यपूर्ण योजनांमध्ये ब्रम्हपूरी, सिंदेवाही, सावली, राजूरा व वरोरा येथील अंगणवाडी केंद्रांचे आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर करणे तसेच  तांदळाची साठवण करण्यात येणाऱ्या शासकीय गोदामांमध्ये  सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे, कृषी विभागास  विकेल ते पिकेल या संकल्पनेनुसार शहरी व ग्रामिण भागात फळे व भाजीपाला विक्रीकरीता स्टॉल उभारणी करण्यासाठी, संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नियोजनातून रूग्णालये, ऑक्सिजन प्लांट आदी कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली. रूग्णालयांच्या फायर ऑडिटचे काम पूर्णत्वास जाणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, बालकांसाठी स्वतंत्र आरोग्य सुविधा उभाराव्यात. सामुहिक विकासांच्या योजना प्राधान्याने राबवाव्यात. नाविन्यपूर्ण कामे राबविताना अधिकाधिक सार्वजनिक हित साधले जाईल याचा प्रयत्न करावा, असेही निर्देश त्यांनी दिले. निधी उपलब्ध करणे व कामांची माहिती यावेळी  देण्यात आली.

          कोविडच्या पहील्या व दुस-या लाटेतील जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या परिणामकारक उपाययोजनांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी यावेळी दिली. संभाव्य तिस-या कोविड लाटेच्या नियंत्रणासाठी तिप्पट ऑक्सिजन जिल्हयात उपलब्ध आहे. व्हेंटीलेटर, लहान बालकांसाठी सुसज्ज आरोग्य यंत्रणा याबाबतही सादरीकरण करण्यात आले. कोविडमध्ये 27 मेट्रीक टन ऑक्सिजन ही  दुसऱ्या लाटेतील अत्युच्च मागणी होती. आता आरोग्य यंत्रणा बळकट केल्याने 83 मेट्रीक टन ऑक्सिजनची उपलब्धता जिल्हयात आहे.  त्याचप्रमाणे, संभाव्य तिस-या कोविड लाटेच्या अनुषंगाने बालकांसाठी स्वतंत्र आरोग्य सुविधा उभारण्याचे निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले.

00000