Search This Blog

Monday, 8 November 2021

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, 1 कोरोनामुक्त


जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, 1 कोरोनामुक्त

 Ø ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 10

चंद्रपूर, दि. 8 नोव्हेंबर :  जिल्ह्यात सोमवारी (दि.8) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. गत 24 तासात जिल्ह्यात एकाने कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर सोमवारी मृत्यू संख्या शुन्यावर आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 819 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 267 झाली आहे. सध्या 10 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 38 हजार 589  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 48 हजार 381 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

खरीप पणन हंगाम 2021-22 अंतर्गत धान खरेदीला सुरुवात


खरीप पणन हंगाम 2021-22 अंतर्गत धान खरेदीला सुरुवात

चंद्रपूर दि.8 नोव्हेंबर: खरीप पणन हंगाम 2021-22 मध्ये शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 33 धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंजुरी दिली आहे. शासन निर्णयानुसार धान खरेदीचा कालावधी  दि. 1 ऑक्टोबर 2021 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत असणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ऑनलाइन नोंदणीकृत शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या धानाची विक्री करावी.

शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आपले आधार कार्ड, वोटिंग कार्ड, शेतीचा सातबारा, बँक खाते पासबुक आदी संपूर्ण माहितीसह खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या धानाची नियोजित वेळेत विक्री करावी. असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगीरवार यांनी कळविले आहे.

00000

स्वैच्छिक रक्तदान शिबिर संयोजक व रक्तदात्यांचा राज्यस्तरीय सत्कार


स्वैच्छिक रक्तदान शिबिर संयोजक व रक्तदात्यांचा राज्यस्तरीय सत्कार

Ø स्वैच्छिक रक्तदाते व संस्थाना माहिती पाठविण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 8 नोव्हेंबर: रक्तदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य समजून नियमित रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा   शासनातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. रक्तदाते हे रक्त केंद्राचे आधारस्तंभ आहेत, त्यामुळे त्यांचा सत्कार करून त्यांना रक्तदानास प्रोत्साहित करण्याचा राज्य रक्त संक्रमण परिषदेचा मानस आहे. या अनुषंगाने चंद्रपूर येथील शासकीय रक्तकेंद्र, स्वैच्छिक रक्तदान शिबिर संयोजक, संस्था (एकूण रक्त संकलन 500 रक्तदात्यांपेक्षा जास्त) व ज्या स्वैच्छिक रक्तदात्यांनी 50 ते 100 वेळा स्वैच्छिक रक्तदान केले आहे, अशा रक्तदात्यांचा सत्कार होणार आहे. या सत्कार समारंभासाठी अशा संस्थेची व स्वैच्छिक रक्तदात्यांची सविस्तर माहिती  30 नोव्हेंबर 2021 पर्यंत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

या माहितीमध्ये प्रामुख्याने स्वैच्छिक रक्तदाते व संस्थेचे नाव, रक्तगट, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल क्रमांक तसेच 30 सप्टेंबर 2021 पर्यंत केलेल्या रक्तदानाची तारीख, रक्तपेढी निहाय माहिती विहित नमुन्यात पाठविणे अपेक्षित आहे.

याकरिता सत्कार पात्र सर्व 50 पेक्षा जास्त रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांनी शासकीय रक्त केंद्र, सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे त्वरित संपर्क साधून आपली माहिती रक्त केंद्रात सादर करावी. जेणेकरून शासनास अपेक्षित सत्कारमूर्ती रक्तदात्यांचा यथोचित सत्कार करता येईल असे आवाहन रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे यांनी केले आहे.

00000

आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कारागृहामध्ये जनजागृती शिबिराचे आयोजन

 

आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कारागृहामध्ये जनजागृती शिबिराचे आयोजन

चंद्रपूर दि. 8 नोव्हेंबर: चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा कारागृह, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. आजादी का अमृतमहोत्सव हा केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा व्यापक असा कार्यक्रम आहे. त्यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हा एक घटक आहे. त्यामुळे या महोत्सवाच्या निमित्ताने सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री.जाधव यांनी केले.

त्यासोबतच दिव्यांग व्यक्तीसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना व त्यांची माहिती सर्व नागरिकांपर्यंत तसेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची नितांत गरज असल्याचे श्री. जाधव म्हणाले.

या उपक्रमामध्ये व्यक्तींना उपलब्ध विधी सेवा सुविधांबाबत माहिती, तसेच कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या खबरदारी विषयक माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा कारागृहाचे प्रभारी अधीक्षक  रवींद्र जगताप यांनी उपस्थितांना सर्वोच्च न्यायालयाने “सोनधर विरुद्ध छत्तीसगड शासन” या प्रकरणामधील दिलेल्या निर्देशांची सविस्तर माहिती दिली व ती जास्तीत जास्त लाभार्थी तसेच नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. त्यासोबतच महाराष्ट्र  प्रिझन रेमिशन रुल्स बाबत सविस्तर मार्गदर्शन करत त्यातील तरतुदींची मुद्देसूद माहिती दिली. याप्रसंगी जिल्हा कारागृहाचे अधिकारी,कर्मचारी व कारागृह बंदी उपस्थित होते.

00000

Sunday, 7 November 2021

रविवारी जिल्ह्यात 2 कोरोनामुक्त, 1 बाधित


रविवारी जिल्ह्यात 2 कोरोनामुक्त, 1 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 11

चंद्रपूर, दि. 7 नोव्हेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात  2 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात र‌विवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये कोरपना येथे 1 रुग्ण आढळला असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजूरा, चिमूर, वरोरा, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 819 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 266 झाली आहे. सध्या 11 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 38 हजार 452 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 48 हजार 305 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000