Search This Blog

Wednesday, 10 November 2021

आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज आमंत्रित

 

आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर दि.10 नोव्हेंबर: चंद्रपूर प्रकल्पांतर्गत येत असलेल्या आदिवासी मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृहात सन 2021-22 या सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी swayam.mahaonline.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. दि. 3 नोव्हेंबर 2021 पासून सदर संकेतस्थळ सुरू झाले असून नूतनीकरण तसेच रिक्त जागेवर नवीन विद्यार्थ्यांकडून दि. 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.

तसेच खास बाब करिता लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत अर्ज करावयाचे असल्यास दि. 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत शिफारशीसह संबंधित कार्यालयात अर्ज सादर करावे. असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

00000

Tuesday, 9 November 2021

मंगळवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त, 1 बाधित

 मंगळवारी जिल्ह्यात 1 कोरोनामुक्त, 1 बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 10

चंद्रपूर, दि. 9 नोव्हेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात  1 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्या रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात मंगळवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात  1 रुग्ण आढळला असून चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजूरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुगांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 820 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 268 झाली आहे. सध्या 10 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 39 हजार 975 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 49 हजार 767 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

शस्त्रक्रियेनंतर बऱ्या होणाऱ्या रुग्णांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार - पालकमंत्री वडेट्टीवार





शस्त्रक्रियेनंतर बऱ्या होणाऱ्या रुग्णांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार - पालकमंत्री वडेट्टीवार

Ø विकृती असल्यास पुढे येऊन उपचार घ्यावा

चंद्रपूर दि. 9 नोव्हेंबर : कुष्ठरोगावर  लवकर निदान व योग्य उपाययोजना करून हा रोग बरा करणे शक्य आहे. कुष्ठरोगावर बहुविध औषधोपचारामुळे कुष्ठरुग्णांची संख्या कमी होत आहे. तो दिवस दूर नाही ज्याप्रमाणे देवी रोगासारखा कुष्ठरोग हा इतिहास जमा होईल. त्यासाठी समाजातील नागरिकांनी स्वतः पुढे येऊन आरोग्याची तपासणी करावी, कुष्ठरोग असल्यास त्वरित औषधोपचार केल्यास हे साध्य करता येईल. असे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज केले.

आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कुष्ठरोग विकृती पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाप्रसंगी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, एम.एस.ऑर्थो सल्लागार आर.एल.टी आर.आय रायपूरचे डॉ.कृष्णमृर्ती कांबळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, प्रकाश देवतळे प्रामुख्याने उपस्थित होते.

स्व. बाबा आमटे यांनी आनंदवन येथे कुष्ठरोग्यांची अविरत सेवा केली, कुष्ठरोग्यांना तिमिरातून तेजाकडे नेण्याचे कार्य त्यांनी केले. असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या माध्यमातून कुष्ठरोगामुळे डोळे, हात, पाय शरीराच्या या भागावर  असलेल्या विकृतीवर मोफत शस्त्रक्रिया एम.एस.ऑर्थो सल्लागार आर.एल.टी आर.आय रायपूरचे डॉ.कृष्णमृर्ती कांबळे व त्यांची टिम करणार आहे. त्यांचे व त्यांच्या टीमचे हे कार्य अतुलनीय आहे. असेही ते म्हणाले.

पालकमंत्री पुढे म्हणाले, कुष्ठरोगाच्या विकृतीतून, शस्त्रक्रियेनंतर बऱ्या होणाऱ्या रुग्णांना स्वयंरोजगार  उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यांच्या हाताला रोजगार देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ देणार असल्याचेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित कुष्ठरोग विकृती पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून कुष्ठरुग्णांची विकृती दूर करून त्यांचे जीवन सुखकर करण्यास मदत होईल. शस्त्रक्रियेनंतर विकृतीतून बरे झालेल्या रुग्णांना त्यांच्या पुनर्वसनासाठी व स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

00000

पैनगंगा प्रकल्पातर्गंत कोलमाईन्स प्रकल्पग्रस्तांना वेकोलीने नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

 





पैनगंगा प्रकल्पातर्गंत कोलमाईन्स प्रकल्पग्रस्तांना वेकोलीने नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

 चंद्रपूर दि.9 नोव्हेंबर : पैनगंगा प्रकल्पातर्गंत कोलमाईन्स  प्रकल्पग्रस्तांना वेकोलीने नागरी सुविधा तातडीने उपलब्ध करून दयाव्यात. तसेच स्थानिक नागरिकांच्या याबाबतीत असलेल्या अडचणींवर चर्चेतून तोडगा काढावा.पुढील 15 दिवसात याबाबत पुन्हा आढावा घेण्यात येईल,असे  निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित पैनगंगा प्रकल्पातर्गंत कोलमाईन्स प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, महानगरपालीका आयुक्त राजेश मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, व्यवस्थापक वणी क्षेत्र आर.बी.सिंह, उपप्रबंधक वेकोली वणी क्षेत्र रोहित मेश्राम, अधिक्षक एम.वाय.पुरटकर यांच्यासह लाभार्थी  श्री. देवगडे, मारोती पिंपळकर, गौतम धोटे यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नुकताच पैनगंगा कोलमाईन्स येथे दोन कामगारांचा अपघाती मृत्यु झाला.औद्योगिक जिल्हयात अशा पध्दतीच्या दुर्घटना घडणे योग्य नाही. म्हणून प्रकल्पप्रमुखांनी सर्व कामगार कायदयांचे पालन करावे. तसेच या कामगारांच्या मृत्यूची चौकशी आठवडयाभरात करण्याचे निर्देश त्यांनी अपर पोलीस अधिक्षकांना दिले.

जिल्हयात मोठया प्रमाणात कोळशांच्या खाणीमध्ये कामगार कार्यरत आहेत. त्यांना कामगार कायद्याप्रमाणे वेतन व भत्ते वेळेत मिळावे.अनेक कारखान्यांमध्ये वेतनाबाबत तफावत आहे. त्यात समानता असावी तसेच करार तत्वावरील कामगारांना त्याच्या श्रमाचा योग्य तो मोबदला खाण प्रशासनाकडून देण्याचे कडक निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जमीनीच्या भुसंपादनाचा मोबदला व पुनर्वसनसंदर्भात स्थानिक शेतकऱ्यांशी वाटाघाटी व चर्चा करण्याचे त्यांनी निर्देशीत केले.

कोळसा खाणीमुळे त्या भागात मोठया प्रमाणावर धुळ होते. यासाठी पर्यावरण विभागाने वेळोवेळी पाहणी करून नियमभंग करणाऱ्यांविरूध्द कारवाई करावी. तसेच त्या धुळीवर खाण व्यवस्थापनाने पाणी टाकावे, जेणेकरून धुळीमुळे रस्त्यांवरील अपघात होणार नाही.

पैनगंगा प्रकल्पातर्गंत मौजा विरूर गाडे येथील 72 कुटुंबाचे पुनवर्सनाकरीता जलदगतीने काम करावे. पात्र उर्वरीत 38 कुटुंबापैकी 19 कुटुंबाचे पुनवर्सनस्थळी भुखंडाचा विकल्प बदलाच्या प्रस्तावांवर व अनुदानाचा विकल्पास मंजुरी देण्यात यावी. कोणत्याही प्रकल्पग्रस्तांचा न्याय हक्क न डावलता काम करावे. तसेच या 19 कुटुंबाचे पुर्नवसनाचे काम सहा महिन्यात पूर्ण करण्याची सूचना श्री.वडेट्टीवार यांनी दिले.

जिल्हयातील कोळसा खाणीमुळे शेताचे रस्ते बंद झाले, तर नदी प्रवाह बदलले असून याबाबत ड्र्रोन सर्व्हे करावा. अल्ट्राटेक सिमेंट उदयोगातील कामगार आणि पर्यावरणाबाबत आढावा घेतांना कामगारांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था कार्यस्थळी उपलब्ध करून देण्यात यावी. यावेळी कामगारांनी त्यांच्या अडचणी मांडल्या.

नगर जिल्हयातील नुकत्याच घडलेल्या दुदैर्वी घटनेपासून बोध घेउून जिल्हयातील सर्व शासकीय रूग्णालयामध्ये अग्नीशमन यंत्र उभारण्याचे त्यांनी सांगितले.

00000

Monday, 8 November 2021

30 नोव्हेंबरपर्यत शंभर टक्के लसीकरण करण्यावर यंत्रणांनी भर दयावा. -जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे



30 नोव्हेंबरपर्यत शंभर टक्के लसीकरण करण्यावर यंत्रणांनी भर दयावा.

-जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे

चंद्रपूर दि. 8 नोव्हेंबर: केंद्र शासनाच्या हर घर दस्तक कार्यक्रमानुसार लसीकरणासाठी यंत्रणांनी घरोघरी जाऊन 30 नोव्हेंबरपर्यत लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिले. जिल्ह्यातील लसीकरणाच्या उद्दिष्टपुर्तीसाठी आरोग्य विभागाच्या टिम  नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तरच लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करता येईल. यासाठी आरोग्य यंत्रणेने गावपातळीवर लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करुन 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित जिल्हा टास्क फोर्स समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, अधिष्ठाता डॉ.अशोक नितनवरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, आदी उपस्थित होते.

ज्या तालुक्यांमध्ये लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. तेथील यंत्रणांनी अधिक सजग राहून लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करावे.तसेच तालुकास्तरावर कार्यरत यंत्रणांनी उपलब्ध मनुष्यबळासोबत बचतगट,तसेच स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी असे श्री.गुल्हाने यांनी सांगितले.

00000