Search This Blog

Friday, 12 November 2021

तृतीयपंथीयांचे ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी शिबिराचे आयोजन

 

तृतीयपंथीयांचे ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी शिबिराचे आयोजन

Ø सकाळी 11 ते 5 या वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.12 नोव्हेंबर : दि. 16 व 17 नोव्हेंबर 2021 रोजी  सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्याय भवन, जलनगर वार्ड, चंद्रपूर येथे तृतीयपंथीयांचे ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना केंद्र शासनाच्या नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करून द्यावयाचे असून पोर्टलवर माहिती भरावयाची आहे.  तसेच राशनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड, बँकेचे पासबुक उपलब्ध करून द्यावयाचे असल्याने या सर्व कामाकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे व पुरावे पासपोर्ट फोटोसह तृतीयपंथी व्यक्तींनी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, चंद्रपूर या कार्यालयात दि.16 व 17 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत उपस्थित राहावे. असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, अमोल यावलीकर यांनी केले आहे.

00000

Thursday, 11 November 2021

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर दि. 11 नोव्हेंबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.15 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता ग्रामीण रुग्णालय, ब्रह्मपुरी येथे ग्रामीण रुग्णालय,ब्रह्मपुरी द्वारा आयोजित आरोग्य व दंत चिकित्सा शिबीर कार्यक्रमास उपस्थिती , दुपारी 12 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण.

00000

गुरुवारी जिल्ह्यात 3 बाधित तर ॲक्टीव्ह रुग्ण 15


गुरुवारी जिल्ह्यात 3 बाधित तर ॲक्टीव्ह रुग्ण 15

चंद्रपूर, दि. 11 नोव्हेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात  3 जण नव्याने बाधित झाले आहेत. तर ॲक्टीव्ह रुग्ण 15 आहेत. जिल्ह्यात गुरुवारी एकाही बाधिताचा  मृत्यू  झाला नाही.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये बल्लारपूर 1 तर कोरपना  येथे 2 रुग्ण आढळले असून  चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजूरा, चिमूर, वरोरा, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुगांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 826 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 269 झाली आहे. सध्या 15 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 42 हजार 411 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 52 हजार 186 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

13 नोव्हेंबरला कोळसा पाईप कन्व्हेयरचे लोकार्पण



13 नोव्हेंबरला कोळसा पाईप कन्व्हेयरचे लोकार्पण

            चंद्रपूर दि.11 नोव्हेंबर : कोळसा खाणीतून थेट वीज केंद्रात पाईप कन्व्हेयरच्या सहाय्याने कोळशाची वाहतूक करणारी आधुनिक यंत्रणा उभारल्याने आता चंद्रपूर वीज केंद्राला कोळसा उपलब्धतेत मोठी सुविधा होणार आहे. महानिर्मितीने वेकोलिच्या भटाळी खुल्या कोळसा खाणीत ही यंत्रणा स्थापित केली असून त्याचा लोकार्पण समारंभ शनिवार दि. 13 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3.30 वाजता होणार आहे. राज्याचे ऊर्जामंत्री मा.ना.डॉ. नितीन राऊत यांचे शुभहस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे.

            सदर समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून  चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार, ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले, विशेष अतिथी म्हणून खासदार . सुरेश (बाळूभाऊ) धानोरकर, आमदार सर्वश्री नागोराव गाणार, डॉ. रामदास आंबटकर,  अभिजित वंजारी,  सुधीर मुनगंटीवार,  प्रतिभा धानोरकर,  किशोर जोरगेवार तर  सन्माननीय अतिथी म्हणून प्रधान सचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारे,  महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉ. मिताली सेठी आणि वेकोलिचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार  आहे.

00000

15 नोव्हेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

 

15 नोव्हेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर दि. 11 नोव्हेंबर: जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. या महिन्याचा महिला लोकशाही दिन 15 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.

या महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक आस्थापने विषयक बाबी, अशी प्रकरणे स्विहकारण्यात येणार नाहीत.  तरी ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार, निवेदन  वैयक्तिक स्वरुपाचे असतील अशा महिलांचे अर्ज प्रत्येक महिण्याच्या तिसऱ्या सोमवारच्या 15 दिवसापूर्वी विहित नमुण्यात असलेले अर्ज दोन प्रतीत जिल्हा  महिला  व बालविकास अधिकारी कार्यालय येथे स्वीकारण्यात येईल. तसेच या महिला लोकशाही दिनामध्ये जिल्हास्तरीय तक्रार अर्ज व तालुकास्तरावरील अपीलीय अर्ज स्विेकारण्यात येतील. अर्जाचा नमूना या कार्यालयामार्फत महिला लोकशाही दिनी पुरविण्यात येईल. असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

00000