Search This Blog

Friday, 2 September 2022

जिल्हा कारागृहात आरोग्य तपासणी शिबिर

 



जिल्हा कारागृहात आरोग्य तपासणी शिबिर

Ø कारागृहातील 279 बंद्यांना मोफत समुपदेशन,आरोग्य तपासणी व औषधोपचार

चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर : जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर तर्फे जिल्हा कारागृह येथील बंद्यांकरीता सर्वसमावेशक तपासणी व औषध वितरण आरोग्य शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले.

या आरोग्य शिबिरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञ, नाक, कान व घसा तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, दंत शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ञ, आयुष वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी) नेत्र चिकित्सा अधिकारी, चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ विभाग, एनसीडी विभाग व टाटा चमु, जिल्हा कार्यक्रम समन्वयक (एनसीडी), समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता व अधिपरिचारिका यांच्याद्वारे जिल्हा कारागृहातील 253 पुरुष, 25 महिला व एक बालक अशा एकूण 279 व्यक्तींना समुपदेशन, आरोग्य तपासणी व औषधोपचार करून आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचे नियोजन व व्यवस्थापन जिल्हा कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे व कारागृह वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित डांगेवार यांनी केले.

०००००

नागपूर क्रीडा प्रबोधिनीत नवीन प्रवेशाकरीता क्रीडा नैपुण्य व कौशल्य चाचणीचे आयोजन

 

नागपूर क्रीडा प्रबोधिनीत नवीन प्रवेशाकरीता क्रीडा नैपुण्य व कौशल्य चाचणीचे आयोजन

Ø खेळाडुंना 15 सप्टेंबरपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर : जिल्हयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना क्रीडा मार्गदर्शकांद्वारे शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व आवश्यक क्रीडा सुविधा पुरविणे तसेच क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या हेतूने शासनाची क्रीडा प्रबोधिनी योजना विभागात कार्यान्वित आहे. त्याअनुषंगाने क्रीडा प्रबोधिनी, नागपूरमध्ये नवीन प्रवेशाकरीता क्रीडा नैपुण्य चाचण्या व कौशल्य चाचणीचे आयोजन करण्यात येत आहे.

8 ते 14 वयोगटातील मुला-मुलींकरीता 30 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, शटलरन, उभे राहून लांब उडी व उंच उडी, मेडीसीन बॉल थ्रो, उंची, वजन, बँड अँड रिच या क्रीडा नैपुण्य चाचण्यांचा समावेश असून कौशल्य चाचणीकरीता ॲथलेटिक्स खेळाचे राज्यस्तरावर प्रथम सहामध्ये असणारे खेळाडूच निवड चाचणीसाठी पात्र असतील.

क्रीडा नैपुण्य चाचणी दि. 17 सप्टेंबर व कौशल्य चाचणी दि. 18 सप्टेंबर 2022 रोजी विभागीय क्रीडा संकुल, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर येथे सकाळी 11 वाजेपासून घेण्यात येणार आहे. त्यासाठी खेळाडूंचे अर्ज दि. 15 सप्टेंबर 2022 पूर्वी मागविण्यात येत आहे. यामध्ये तज्ञ समितीमार्फत गुणांकन करून गुणानुक्रमे योग्य खेळाडूंची शिफारस राज्यस्तर चाचणीकरीता करण्यात येणार आहे.

दोन्ही चाचण्यास येणाऱ्या खेळाडूंनी जन्म तारखेची नोंद असलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरची छायांकित प्रत, जन्मदाखला सोबत आणावा तसेच कौशल्य चाचणीस येताना खेळाडूंनी राज्यस्तरावर प्रथम सहामध्ये असल्याबाबतचा पुरावा व शैक्षणिक कागदपत्रांची छायांकित प्रत सोबत आणावयाची आहे. याची सर्व खेळाडूनी नोंद घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात येत आहे.

०००००

Thursday, 1 September 2022

नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ‘स्टार्टअप’ यात्रेचा लाभ घ्या - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने



 

नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ‘स्टार्टअप’ यात्रेचा लाभ घ्या जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

Ø आयटीआय, शासकीय अभियांत्रिकी, आंबेडकर कॉलेज आदी ठिकाणी भेटी

चंद्रपूर, दि. 1 सप्टेंबर : राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व नाविण्यता विभागातर्फे 26 ऑगस्ट 2022 पासून जिल्हामध्ये स्टार्टअप व नाविण्यता यात्रेला सुरवात झाली आहे. आज (दि.1) स्टार्टअप योजनेचा जनजागृती करणारा एलईडी चित्ररथ चंद्रपूरमध्ये दाखल झाला. प्रत्येक तालुक्यात या योजनेविषयी जनजागृती करण्यात येत असून आपल्यातील नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यार्थी आणि नवउद्योजकांनी स्टार्टअप यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांना स्टार्टअप योजनेबाबत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे, शैलेश भगत आदी उपस्थित होते.

कौशल्य विकास विभागामार्फत स्टार्टअप यात्रेला सुरवात झाल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणणे, उद्योग उभारणे आदींबाबत यात मार्गदर्शन करण्यात येत आहे. कोणत्याही उद्योगाचे सुरवातीला स्टार्टअपच असते. नंतर तो उद्योग विस्तारला जातो. उद्योगात समस्यांवर मात करून त्याची सोडवणूक करणे गरजेचे आहे. त्यासाठी अभिनव कल्पना राबविल्या तर शासनाचे पाठबळसुध्दा मिळते. त्यामुळे या योजनेची सर्वांनी माहिती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

स्टार्टअप यात्रेने गुरवारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, आंबेडकर कॉलेज, एस.पी. कॉलेज आदी ठिकाणी भेटी दिल्या. 26 ऑगस्ट रोजी चिमुर तालुक्यातून सुरू झालेली यात्रा 03 सप्टेंबर 2022 रोजी राजुरा तालुक्यामध्ये समाप्त होत आहे. यात्रेचा कॅम्प  दि. 5 व 6 सप्टेंबर 2022 रोजी चंद्रपूर येथे आयोजीत करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील नवसंकल्पना घेवून उद्योग सुरू करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी नोंदणी करून सादरीकरण करावे.

उत्कृष्ट, प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या सादरीकरणात अनुक्रमे  रु.25 हजार, 15 हजार व 10 हजार रु.पारितोषिक देण्यात येणार असून या माध्यमातून विभागीय तसेच राज्यस्तरावर सादरीकरण सादर करण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे.  सदर यात्रेमध्ये सहभागी होण्याकरीता http://bit.ly/EntrepreneurSpeaker  या लिंकचा  वापर करावा.

०००००००

5 सप्टेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 

5 सप्टेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 1 सप्टेंबर : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

सोमवार दि. 5 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज सादर करावा. तदनंतरच तक्रार अर्ज स्व‍िकारण्यात येईल, तसेच निवेदन स्व‍िकारण्याची वेळ दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत राहील. या लोकशाही दिनात नागरिकांनी मास्क घालणे व सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य राहील. असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

००००००

मतदार यादी आधार क्रमांक जोडणी सर्व मतदान केंद्रावर 4 व 11 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन


मतदार यादी आधार क्रमांक जोडणी सर्व मतदान केंद्रावर 4 व 11 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

चंद्रपूर, दि. 1 सप्टेंबर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार यादी आधार क्रमांकाची जोडणी करण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील 70 – राजुरा, 71 – चंद्रपूर, 72 – बल्लारपूर, 73 – ब्रम्हपूरी, 74 – चिमूर आणि 75 – वरोरा विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर पहिले विशेष शिबिर रविवार दि. 4 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तर दुसरे विशेष शिबिर रविवार दि. 11 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

सदर शिबिरात नमुना 6 ब अर्ज मतदान केंद्रावर उपलब्ध असेल. सदर शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांना आवश्यक ते सहकार्य करावे. मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांकाची जोडणी करण्याकरीता मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

०००००