Search This Blog

Tuesday, 6 September 2022

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखाच्या वर

 

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखाच्या वर

चंद्रपूर, दि. 6 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दि. 23 मार्च 2020 पासून कोविड रुग्ण शोध मोहिमेला सुरुवात झाली होती. जिल्ह्यात पहिला रुग्ण 2 मे 2020 रोजी आढळून आला. तेंव्हापासून 4 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखाच्या वर गेली आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोनाची पहिली लाट दि. 15 डिसेंबर 2020 पर्यंत होती. पहिल्या लाटेमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 31200, कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 30774 तर कोविड-19 मुळे मृत्यूंची संख्या 426 होती. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट दि. 8 मार्च 2021 ते 15 जून 2021 या कालावधीपर्यंत होती. या लाटेमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 57657, कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 56540 तर कोविड-19 मुळे 1117 जणांचे मृत्यू झाले.

जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट दि. 1 जानेवारी 2022 ते 15 फेब्रुवारी 2022 या कालावधीपर्यंत होती. या लाटेमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10096, कोरोनामुक्त रुग्ण 10072 तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 24 होती. सद्यस्थितीत कोरोना हळूहळू वाढत असून 1 जून 2022 पासून पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 1080, कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 974 तर 4 मृत्यू झाले आहेत.

जिल्ह्यात सुरवातीपासून तर 4 सप्टेंबर 2022 पर्यंत कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्या वर गेली आहे. यामध्ये आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण 1 लक्ष 64, कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 98379 तर 1571 कोरोना बाधितांचा  मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात झालेले लसीकरण : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 16 जानेवारी 2021 पासून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली आणि त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या लाटेमध्ये रुग्णांचे संस्थेत भरती होण्याचे प्रमाण कमी झाले तसेच मृत्यूंची संख्यासुद्धा कमी झाली आहे. जिल्ह्यात कोविड लसीकरणास पात्र लाभार्थ्यांची एकूण संख्या 18 लक्ष 22 हजार 764 आहे. यापैकी 17 लक्ष 27 हजार 149 (94.75 टक्के) नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोज, 14 लक्ष 67 हजार 702 नागरिकांना (80.52 टक्के) दुसरा डोज तर 1 लक्ष 71 हजार 134 पात्र लाभार्थ्यांना कोविड लसीकरणाचा प्रिकॉशन डोज देण्यात आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

०००००

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत डिफेन्स कौन्सिल कार्यालय सुरू होणार

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत डिफेन्स कौन्सिल कार्यालय सुरू होणार

Ø विधी सहाय्यसाठी 8591903934 व 07172-271679 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 6 सप्टेंबर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे कार्यकारी अधिकारी व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय लळित यांनी दि. 21 ऑगस्ट रोजी कायदेशीर सहाय्य संरक्षण समुदेशक उपक्रमाचे उद्घाटन केले. त्यानुसार एकूण 22 राज्यांमध्ये 365 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत लोक अभिरक्षक अर्थात डिफेन्स कौन्सिल कार्यालय सुरू केले जाणार आहे. यात चंद्रपूर जिल्हाचाही समावेश असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी यांनी दिली.

तसेच चंद्रपूर जिल्ह्यासाठी एक मुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण समुदेशक, एक उपमुख्य  व  3 सहाय्यक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुदेशक या पदांसाठी भरती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्यामार्फत जाहिरात प्रसिद्ध केली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख दि. 7 सप्टेंबर 2022 आहे. या उपक्रमानुसार फौजदारी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून संपूर्ण प्रकरण निकाली होऊन अपील दाखल होईपर्यंत विधी सहाय्य पुरविले जाणार आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत महिला, 18 वर्षापर्यंतची मुले, अनुसूचित जाती व जमाती मधील व्यक्ती, विविध प्रकारची आपत्ती, जातीय हिंसा, पूर, भूकंप व पीडित व्यक्ती, तुरुंगात असलेल्या व्यक्ती, औद्योगिक कामगार, मानसिक दृष्ट्या दुर्बल किंवा दिव्यांग व्यक्ती व वार्षिक उत्पन्न रु. 3 लाखापर्यंत आलेल्या व्यक्तींना मोफत विधी सहाय्य दिले जाते.

तसेच प्राधिकरणामार्फत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेतले जातात. याचाच भाग म्हणून राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी, राजुरा, सिंदेवाही, मुल, पोंभूर्णा व भद्रावती येथे महिला सक्षमीकरणासाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ज्यांना विधीसहाय्य हवे आहे, त्यांनी अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत 8591903934 व 07172-271679 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी यांनी केले आहे.

००००००

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने कलम 37(1) व (3) लागू

 जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने कलम 37(1) व (3) लागू

चंद्रपूर, दि. 6 सप्टेंबर :  जिल्ह्यात राजकीय पक्ष, कामगार संघटनांचे आंदोलन, जातीय सामाजिक संघटनांकडून करण्यात येणारे आंदोलन, निदर्शने, मोर्चा, अतिमहत्वाचे व्यक्तीचा दौरा तसेच सध्या देशात व राज्यातील चालू घडामोडी संबधाने तसेच जिल्ह्यात होणारी विविध राजकीय, सामाजिक, जातीय कार्यक्रम,आंदोलने व निदर्शने आदी कार्यक्रमामुळे तसेच आगामी गणेश चतुर्थी  सण व उत्सवादरम्यान कायदा  व  सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यात दि. 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2022 च्या रात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) लागू करण्यात येत आहे. असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.

या कालावधीत कायदा  व  सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने  विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. तरी, सदर कालावधीत कोणतीही व्यक्ती शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीच्या आकृत्या, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, तसेच यामुळे सभ्यता आणि नीतिमत्ता यास धोका पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे किंवा आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे, त्याचा जनतेत प्रसार करणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात येत आहे.

तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणीही सभा, मोर्चा, उत्सव व मिरवणुका काढू नये. पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. याची नोंद घ्यावी. सदर आदेश दि. 2 सप्टेंबर 2022  ते 15 सप्टेंबर  2022 चे रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राकरीता लागू राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

००००००

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल



 गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

Ø पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 6 सप्टेंबर :  मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33 (1)(ब )नुसार सार्वजनिक ठिकाणाची रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाच्या नियमानासाठी चंद्रपूर शहरामध्ये दि. 9 सप्टेंबर 2022 रोजी सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनाच्या कार्यक्रमांमध्ये रहदारीला अडथळा होऊन जनतेला त्रास होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून चंद्रपूर शहरातील मुख्य मिरवणुकीचा मार्ग दि. 9 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि. 10 सप्टेंबर रोजीचे पहाटे 6 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी सर्व प्रकारच्या वाहनांची रहदारी वळविण्यात येत आहे. असे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी कळविले आहे.

गणेश विसर्जन मुख्य मिरवणूक सोहळा पार पडेपर्यंत प्रियदर्शनी चौक ते जटपुरा गेट-कस्तुरबा चौक मार्गे गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गे, रामनगर रोड मार्गे संत केवलराम चौक-इरई नदी (दाताळा पूल) हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद करण्यात येत आहे. नागपूर रोडने येऊन बल्लारशा किंवा मुलकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही प्रियदर्शनी चौककडे जाण्यास बंदी करून सर्व प्रकारची वाहने ही वरोरा नाका उड्डाणपूल-सावरकर चौक ते बंगाली कॅम्प, मूल किंवा बल्लारशाकडे जातील.

मूल किंवा बल्लारशाकडून नागपूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही बंगाली कॅम्प-सावरकर चौक वरोरा नाका नवीन उड्डाणपूल मार्गे नागपूरकडे जाण्याचे निर्देश देण्यात येत आहे.  नागपूरकडून शहरांमध्ये जाणारी सर्व वाहने (जड वाहने वगळून) छोटा नागपूर मार्गे दाताळा चौक-देवाळा गांव-चोराळा टी पॉइंटवरून बिनबा गेट किंवा पठाणपुरा गेटमधून शहरात प्रवेश करतील. चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील रहीवाशांनी नागपूर, वणी, घुगुस व गडचांदूरकडे जाण्याकरीता रहमत नगर, नगीनाबाग व इतर परिसरातून जाण्यासाठी बिनबा गेट-चोराळा-दाताळा इत्यादी मार्गाचा अवलंब करावा. बल्लारशा व मूल कडून येणाऱ्या सर्व वाहनांना (जड वाहने वगळून) शहरांमध्ये जावयाचे असल्यास बसस्टॅन्ड-एलआयसी ऑफिस-बगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौकातून शहरामध्ये किंवा प्रसन्ना पेट्रोल पंपकडून बाबूपेठ मार्गे शहरात फक्त अंचलेश्वर गेटपर्यंत प्रवेश करता येईल.

या ठिकाणी असेल नो पार्किंग व नो हॉकर्स झोन:

गणेश विसर्जन मुख्य मिरवणूक सोहळ्या दरम्यान नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन करण्यात आले आहे. जटपुरा गेट ते कस्तुरबा चौकपर्यंत, जटपुरा गेट ते रामनगर रोड मार्गे दाताळा पुलापर्यंत, जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौकापर्यंत, कस्तुरबा चौक ते गांधी चौक ते जटपुरा गेट, कस्तुरबा चौक ते अंचलेश्वर गेटपर्यंत, गांधी चौक ते मिलन चौक ते जोड देऊळपर्यंत, कस्तुरबा चौक ते जेलरोड चौक, दस्तगीर चौक ते मिलन चौक, मिलन चौक ते बजाज पॉलीटेक्निक कॉलेज, हिंदी सिटी हायस्कूल ते रघुवंशी कॉम्प्लेक्स पर्यंत, मौलाना आझाद चौक ते जयंत टॉकीज, छोटा बाजार चौक ते पाताळेश्वर मंदिर या मार्गांवर नो पार्किंग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित केल्याने मिरवणूक व वाहतूक मार्गावर नागरिकांनी, व्यावसायिकांनी तसेच गणेश विसर्जन भक्तांनी कोणत्याही प्रकारची वाहने पार्किंग किंवा उभी करू नये.

मुख्य मिरवणूक मार्गावर राहणाऱ्या रहिवाशांना स्वतःच्या पार्किंगकरीता जागा नसल्यास त्यांनी आपली वाहने जुबली हायस्कूलचे पटांगण, महानगरपालिकेच्या बाजूला असलेली पार्किंग या ठिकाणी उभी करता येईल परंतु, मिरवणूक संपल्यानंतरच ती वाहने तेथून काढता येतील. त्याचप्रमाणे, चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा गणपती विसर्जन सोहळा पाहण्यासाठी शहरातील व इतर ग्रामीण भागातून नागरीक येत असतात. दरम्यान शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नागरिकांना पार्किंग झोन उपलब्ध करून देण्यात येत आहे.

शहरातील व इतर ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध पार्किंग झोन:

चांदा क्लब ग्राउंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वरोरा नाका, सेंट मायकल हायस्कूल नगीनाबाग, सिंधी पंचायत भवन, संत केवलराम चौकाजवळ रामनगर, व्यायाम शाळा ग्राउंड पठाणपुरा चौक, डी.एड. कॉलेज ग्राउंड बाबूपेठ, महाकाली मंदिर ग्राउंड ही ठिकाणे दि. 9 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता पासून दि. 10 सप्टेंबर 2022 रोजीचे सकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांसाठी पार्किंग स्थळे म्हणून घोषित करण्यात येत आहे. नागरीकांनी आपली वाहने शहरात न आणता या पार्किंग स्थळी पार्क करावीत. जनतेने विसर्जनादरम्यान वरील वाहतूक व्यवस्थेचे पालन करून शांतता व सुव्यवस्था अबाधित राखावी व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी केले आहे.

०००००

अग्निवीर निवड प्रक्रिया 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत

 अग्निवीर निवड प्रक्रिया 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत

चंद्रपूर, दि. 6 सप्टेंबर : भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच नोंदणी झालेल्या पुरुष उमेदवारांसाठी 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत जिल्हानिहाय निवड प्रक्रिया नागपूर येथील मानकापूर क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे.

      'अग्निवीर ' अर्थात सैन्य भरती नोंदणी करण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये विदर्भातील दहा जिल्ह्यांमधून 59 हजार 911 उमेदवारांची नोंदणी झाली आहे. नोंदणी झालेल्या उमेदवारांचीच निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या शारीरिक स्पर्धा व अन्य बाबींसाठी नागपूर शहरातील मानकापूर क्रीडा संकुल हे योग्य स्थळ असून याच ठिकाणी ही प्रक्रिया पार पडली जाईल, असे कळविण्यात आले आहे.

००००००