Search This Blog

Monday, 3 October 2022

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने कलम 37(1) व (3) लागू

 

जिल्ह्यात कायदा  सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने कलम 37(1)  (3) लागू

चंद्रपूर, दि. 3 ऑक्टोबर :  जिल्ह्यात राजकीय पक्ष, कामगार संघटनांचे आंदोलन, जातीय सामाजिक संघटनांकडून करण्यात येणारे आंदोलन, निदर्शने, मोर्चा, अतिमहत्वाचे व्यक्तीचा दौरा तसेच सध्या देशात व राज्यातील चालू घडामोडी संबधाने तसेच जिल्ह्यात होणारी विविध राजकीय, सामाजिक, जातीय कार्यक्रम,आंदोलने व निदर्शने आदी कार्यक्रमामुळे तसेच सण व उत्सवादरम्यान कायदा  व  सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यात दि. 2 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2022 च्या रात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) लागू करण्यात येत आहे. असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.

या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. तरी, सदर कालावधीत कोणतीही व्यक्ती शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीच्या आकृत्या, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, तसेच यामुळे सभ्यता आणि नीतिमत्ता यास धोका पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे किंवा आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे, त्याचा जनतेत प्रसार करणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात येत आहे.

तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणीही सभा, मोर्चा, उत्सव व मिरवणुका काढू नये. पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. याची नोंद घ्यावी. सदर आदेश दि. 2 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2022 चे रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राकरीता लागू राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

०००००

सेवा पंधरवडा अंतर्गत कर्मचाऱ्यांची ताणतनाव व्यवस्थापन कार्यशाळा



सेवा पंधरवडा अंतर्गत कर्मचाऱ्यांची ताणतनाव व्यवस्थापन कार्यशाळा

चंद्रपूर, दि. 3 आक्टोबर: राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने कर्मचारी दिन, ताणतनाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेला समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर, समाजकल्याण निरीक्षक मनोज माकोडे, श्रीमती तन्नीरवार, श्रीमती आसेगांवकर, सहा. लेखाधिकारी राजेंद्र बुर्लावार, वरीष्ठ लिपीक श्री. कोडापे तोच कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना दैनंदिन कार्य करतांना शारीरिक तथा मानसिक ताण तणाव कसे कमी करावे ? याबाबत सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. बोरकर यांनी मार्गदर्शन केले. तर कार्यालयातील सहायक लेखाधिकारी राजेंद्र बुर्लावार यांनी सुद्धा ताण तनाव कमी करण्याबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

००००००

Saturday, 1 October 2022

भेसळ करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करा - मंत्री संजय राठोड




भेसळ करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करा - मंत्री संजय राठोड

Ø अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा

चंद्रपूर, दि. 1 ऑक्टोबर : सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या काळात काही उद्योजक तसेच विक्रेते अन्नधान्यांमध्ये भेसळ करून आपला माल विकत असतात. भेसळ करणाऱ्या व्यक्तीची माहिती होताच त्यांच्या आस्थापनांवर धाडी टाकून कडक कारवाई करा, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

शासकीय विश्रामगृह येथे अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी सहाय्यक आयुक्त (अन्न) नितीन मोहिते, सहाय्यक आयुक्त (औषधे) उमाकांत बागमारे, औषध निरीक्षक सी. के. डांगे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण उमप, प्रफुल टोपले, गिरीश सातकर आदी उपस्थित होते.

नवरात्र, दसरा, दिवाळी तसेच इतर सणांमध्ये तेल, दूध, मिठाई, भगर, रवा, आदींचा उपयोग गोड पदार्थ करण्यासाठी केला जातो, असे सांगून मंत्री श्री. राठोड म्हणाले की, दुकानांमधील तसेच उद्योजकांच्या कंपनीमध्ये खाद्यतेलाचे नमुने नियमितपणे तपासावे. भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी. यात कितीही मोठा उद्योजक असला तरी हयगय करू नये. प्रसंगी यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. पुढील महिनाभर ही मोहीम अतिशय जोमाने तसेच त्यानंतरही नियमितपणे राबवा. यासाठी विभागाने योग्य नियोजन करावे.

खाद्य तेलामध्ये भेसळीचे प्रमाण जास्त असल्यामुळे नागरिकांना एन्जोप्लास्टी, अँजिओग्राफी आदी रोगांचा सामना करावा लागतो. जिल्ह्यात भेसळीचे प्रमाण पूर्णपणे बंद झाले पाहिजे. चंद्रपूर हे औद्योगिक शहर असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी, सिमेंट कंपन्या, आदी उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये काम करणारा मजूर वर्ग हा गुटखा आणि खऱ्याच्या आहारी गेला असल्याचे निदर्शनास येते. गुटखा विकणाऱ्यांवर तसेच गुटख्याची निर्मिती होते त्या ठिकाणची माहिती घेऊन उद्योजकांवर धाडी टाका. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात खदानींमध्ये गुटखा सप्लाय करणाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई करा. येत्या 15 दिवसांत या कारवाईचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

सन 2021- 22 मध्ये अन्नधान्याचे 251 नमुने घेण्यात आले. यापैकी प्रमाणित 176 नमुने, कमी दर्जा असलेले 8 नमुने, मिथ्याछाप 7, असुरक्षित 19 नमुने, तर 41 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. 2022 - 23 मध्ये 169 नमुने घेण्यात आले असून यापैकी प्रमाणित 8, कमी दर्जा असलेली 0, मिथ्याछाप 2, असुरक्षित 0 आणि अहवाल प्रलंबित असलेल्या नमुन्यांची संख्या 159 आहे. प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठी पाठपुरावा करून त्या तात्काळ निकाली काढाव्यात, अशा सूचनाही यांनी दिल्या.

गत दोन वर्षात विभागाच्या वतीने एकूण 23 धाडी टाकण्यात आल्या. यात 32 लक्ष 88 हजार 277 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्नपदार्थ बाबत 2021 - 22 मध्ये 10 प्रकरणात आठ गुन्हे नोंद, तर 2022 - 23 मध्ये आठ प्रकरणात आठ गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

०००००००

“माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत कार्यरत महिलांची आरोग्य तपासणी




माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत कार्यरत महिलांची आरोग्य तपासणी

 चंद्रपूर, दि. 1 ऑक्टोबर: माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानांतर्गत जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार यांच्या मार्गदर्शनात मा.सा. कन्नमवार सभागृहात जिल्हा परिषद चंद्रपूर येथे विविध विभागात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, प्रियंका रायपुरे, डॉ. ढवस, डॉ. ऋतुजा मुंधडा, डॉ. दीप्ती श्रीरामे, डॉ. प्राची मेहुलकर, डॉ. माधुरी मेश्राम, डॉ. मिना मडावी, डॉ.अमित जयस्वाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या मोहिमेचा शुभारंभ शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. श्रीमती चव्हाण यांनी उपस्थित महिलांना आरोग्य शिबिरात आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. व स्वतः तपासणी करून घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे व त्यांनी स्वतःकडे दुर्लक्ष न करता आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन मार्गदर्शनातून केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या शिबिरामध्ये 105 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात उच्च रक्तदाबाचे 11, मधुमेहाचे 6, तर मधुमेह-उच्च रक्तदाबाचे 7 रुग्ण आढळून आले. सीबीसी थायरॉईड तपासणी 103 तर 15 महिलांची दंतरोग तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. पराग जीवतोडे, सुरेखा सुत्राळे, दोस्ना बागेसर, किशोर मोते, नितीन झोडे, भास्कर पाचभाई, सुरज राखडे, श्री. जुमनाके, टाटा ट्रस्ट व आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले.

०००००

आरटीओकडून विविध कलमांतर्गत जप्त केलेल्या 32 वाहनांचा जाहीर लिलाव

 आरटीओकडून विविध कलमांतर्गत जप्त केलेल्या 32 वाहनांचा जाहीर लिलाव

चंद्रपूर, दि. 1 ऑक्टोबर: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे विविध कलमांतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव दि. 11 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. या लिलावाद्वारे 32 वाहनांचा लिलाव करण्यात येत आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूरतर्फे मोटार वाहन कर कायदा 1958 मधील विविध कलमांतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा महाराष्ट्र जमीन महसूल कर संहिता 1966 नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये आहे त्या स्थितीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे हा लिलाव होणार आहे.

ई-लिलावात सहभागी होण्यासाठी लिलाव (नापरतावा) नोंदणी शुल्क  रु. 2400 (दोन हजार चारशे) व खबरदारी ठेव रक्कम (परतावा) 1,02,250 (एक लाख दोन हजार दोनशे पन्नास रुपये) कार्यालयात डी.डी.द्वारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर या नावाने जमा करावे. लिलावाची अधिक माहिती www.eauction.gov.in या संकेतस्थळावर बघता येईल. तसेच लिलावामध्ये विक्री करावयाच्या वाहनांची यादी, लिलावाचा दिनांक, ठिकाण तसेच अटी व शर्ती आदीची माहिती विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोणतेही कारण न देता जाहीर लिलाव/विक्री रद्द करावयाचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी,चंद्रपूर यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

००००००