Search This Blog

Saturday, 1 October 2022

“माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत कार्यरत महिलांची आरोग्य तपासणी




माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत कार्यरत महिलांची आरोग्य तपासणी

 चंद्रपूर, दि. 1 ऑक्टोबर: माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानांतर्गत जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार यांच्या मार्गदर्शनात मा.सा. कन्नमवार सभागृहात जिल्हा परिषद चंद्रपूर येथे विविध विभागात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, प्रियंका रायपुरे, डॉ. ढवस, डॉ. ऋतुजा मुंधडा, डॉ. दीप्ती श्रीरामे, डॉ. प्राची मेहुलकर, डॉ. माधुरी मेश्राम, डॉ. मिना मडावी, डॉ.अमित जयस्वाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या मोहिमेचा शुभारंभ शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. श्रीमती चव्हाण यांनी उपस्थित महिलांना आरोग्य शिबिरात आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. व स्वतः तपासणी करून घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे व त्यांनी स्वतःकडे दुर्लक्ष न करता आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन मार्गदर्शनातून केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या शिबिरामध्ये 105 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात उच्च रक्तदाबाचे 11, मधुमेहाचे 6, तर मधुमेह-उच्च रक्तदाबाचे 7 रुग्ण आढळून आले. सीबीसी थायरॉईड तपासणी 103 तर 15 महिलांची दंतरोग तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. पराग जीवतोडे, सुरेखा सुत्राळे, दोस्ना बागेसर, किशोर मोते, नितीन झोडे, भास्कर पाचभाई, सुरज राखडे, श्री. जुमनाके, टाटा ट्रस्ट व आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले.

०००००

No comments:

Post a Comment