नियोजनबद्ध तयारी व ध्येय ही संरक्षण क्षेत्रात जाण्याची गुरुकिल्ली
Ø सजग भारत कार्यक्रमात निवृत्त एअर व्हाईस मार्शल वानखेडे यांचे प्रतिपादन
चंद्रपूर, दि. 10 ऑक्टोबर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना आजच्या युवापिढीला तसेच पालकांना संरक्षण क्षेत्रात असलेल्या नोकरीच्या अनेक संधीबाबत योग्य माहिती असणे गरजेचे आहे. संरक्षण क्षेत्रात आपल्या पाल्यांना पाठविण्याबाबत आजही पालक उत्साही दिसत नाही. विदर्भ व महाराष्ट्रातील युवक-युवतीची संरक्षण दलात अतिशय कमी टक्केवारी आहे. जागरूक विद्यार्थी नक्कीच नियोजनबद्ध तयारीद्वारे संरक्षण व अर्धसैनिक दलामध्ये जाऊ शकतात, असे प्रतिपादन (निवृत्त) एअर व्हाईस मार्शल विजय वानखडे यांनी केले.
नियोजन भवन येथे आयोजित सजग भारत या कार्यक्रमाप्रंसगी ते बोलत होते. यावेळी, (निवृत्त) ब्रिगेडियर सुनील गावपांडे, (निवृत्त) कर्नल राजू पाटील, माजी प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, रक्षणम डिफेंस प्रिपरेटरी ॲकेडमीचे सचिव प्रा. अनिल वानखडे तसेच लाइफ स्किल्स फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. राजेश्वरी वानखडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
(निवृत्त) ब्रिगेडियर सुनील गावपांडे यांनी उपस्थित विद्यार्थाना देशसेवेकरीता तसेच मानाने जगण्याकरीता संरक्षण क्षेत्रात करियर करण्याचे आवाहन केले. तसेच (निवृत्त) कर्नल राजू पाटील यांनी संरक्षण क्षेत्रामध्ये नोकरीदरम्यान मिळत असलेल्या विविध सवलती, पुढील शिक्षणाच्या संधी तसेच संरक्षण क्षेत्रात नोकरी केल्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे राहणीमान कसे उंचावते यावर मार्गदर्शन केले.
लाइफ स्किल्स फाउंडेशन व आदिवासी विकास विभागद्वारा आयोजित या कार्यक्रमामधे चिमूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे माजी प्रकल्प अधिकारी केशव बावनकर यांनी जिल्हयातील 10 वी, 12 वी, डिप्लोमा, आय.टी.आय, पदवी, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण युवक व युवतींना संरक्षण क्षेत्रात नोकरीच्या विविध संधी आहेत. तसेच ध्येय साधण्याकरीता योग्य मार्गदर्शन, अभ्यासक्रम तसेच सरावाची तयारी आवश्यक असून डिफेन्स क्षेत्रातील तज्ञ मंडळी याकरीता रक्षणम डिफेंस प्रिपरेटरी ॲकेडमी फेटरी, नागपूरच्या माध्यमातून विद्यार्थाना घडवित असतात. असे रक्षणम डिफेंस प्रिपरेटरी ॲकेडमीचे सचिव प्रा. अनिल वानखडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन लाइफ स्किल्स फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. राजेश्वरी वानखडे यांनी केले. यावेळी, आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थीनी, माजी सैनिक, आदिवासी विकास वसतिगृहाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००००
No comments:
Post a Comment