जिल्ह्यातील चार लाखांच्या वर शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत दिवाळी किट वाटपाचे नियोजन
Ø अंत्योदय आणि प्राधान्य गटातील कार्डधारकांना मिळणार लाभ
Ø प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेलाचा समावेश
चंद्रपूर, दि. 20 ऑक्टोबर : ऑक्टोबर 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय लाभार्थी व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिधारकांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त 100 रुपयांत शिधाजिन्नस संच (दिवाळी किट) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील 4 लक्ष 9 हजार 275 शिधापत्रिकाधारकांना सदर दिवाळी किट देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात अंत्योदय योजनेंतर्गत 1 लक्ष 38 हजार 393 शिधापत्रिकाधारक तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत 2 लक्ष 70 हजार 882 असे एकूण 4 लक्ष 9 हजार 275 शिधापत्रिकाधारक आहेत. या कुटुंबांना दिवाळीनिमित्त एक किला रवा, एक किला चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लीटर पामतेल या चार शिधाजिन्नसांचा समावेश असलेला संच जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानांत दिवाळी किट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पुरवठा विभागाच्या गोदामानुसार, बल्लारपूर येथे अंत्योदय योजना कार्ड संख्या व प्राधान्य गट योजना कार्ड संख्या अशी एकूण कार्ड संख्या 22855 आहे. भद्रावती 24686, ब्रम्हपूरी 36352, चंद्रपूर 24427, बाबुपेठ 33866, चिमूर 21765, नेरी 16021, गोंडपिपरी 18071, जिवती 13268, कोरपना 21472, मूल 25033, नागभीड 14984, तळोधी 13914, पोंभुर्णा 12676, राजूरा 24710, सावली 10082, पाथरी 14555, सिंदेवाही 24823 आणि वरोरा 32715 असे एकूण 4 लक्ष 9 हजार 275 नियोजन करण्यात आले आहे.
सर्व रास्त भाव दुकानात सदर दिवाळी किटचे पीओएस मशीनद्वारे वितरण सुरू असून सर्व शिधापत्रिकाधारकांनी याचा लाभा घ्यावा. 100 रुपयांत दिवाळी किट प्राप्त करून घेतांना रास्तभाव दुकानदारांकडून पीओएस मशीनद्वारे निघणारे बील प्राप्त करून घेऊन त्या बिलाप्रमाणेच पैसे द्यावे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटनांनी दिवाळी किटसाठी समोर यावे : गरीब आणि वंचितांची दिवाळी साजरी होण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती तसेच सामाजिक संघटनांनी स्वत:हून समोर येऊन मोफत दिवाळी किटचे वाटप करावे, असे आवाहन जिल्हा प्रशसनाच्या वतीने करण्यात आले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment