14 ऑक्टोबर रोजी नाविण्यपूर्ण कल्पना व उद्योग सादरीकरणासाठी बुट कॅम्पचे आयोजन
Ø नवउद्योजकांनी सादरीकरण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
चंद्रपूर, दि. 4 ऑक्टोबर : जिल्हातील नागरीकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी तसेच राज्यातील उद्योजकता व नाविण्यापूर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी विभागामार्फत स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. प्रचार व प्रबोधनाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडला असून यात्रेच्या दुसऱ्या टप्यात दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर येथे एक दिवसीय सादरीकरण सत्र व जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर आयोजीत करण्यात येत आहे. स्टार्टअप यात्रेकरीता वयाची अट नसल्याने जिल्हातील जास्तीत जास्त नवउद्योजक, विद्यार्थी व नाविन्यता परिसंस्थानी सहभागी होऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे मुख्य टप्प्यामध्ये प्रास्ताविक व विभागाच्या विविध उपक्रमाची माहिती, स्थानिक स्टार्टअप / उद्योजकाची व्याख्याने, स्टार्टअप व नवउद्योजकता कार्यशाळेचे विषय, सादरीकरण सत्र व मुल्यांकन तसेच जिल्हास्तरीय विजेत्यांची घोषणा करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबिराचे प्रथम व द्वितीय असे दोन सत्र करण्यात आले असून सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत विभागाच्या विविध उपक्रमाची माहिती, स्टार्टअपचा प्रवास तसेच स्थानिक उद्योजकाची व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. तर दुस-या सत्रात दुपारी 12 वाजता नवउद्योजकांना सादरीकरणाची संधी देण्यात येईल. प्रत्येक सहभागीस 10 मिनिटे सादरीकरणाची संधी मिळेल. यामध्ये 5 मिनीट सादरीकरण व 5 मिनीट प्रश्न्नोत्तराची असेल.
जिल्हास्तरावरील विजेत्यांची निवड कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीद्वारे केली जाईल. जिल्हास्तरावर उत्कृष्ठ सादरीकरण करणाऱ्या प्रथम तीन उमेदवारांना प्रथम 25 हजार द्वितीय 15 हजार तर तृतीय 10 हजार याप्रमाणे पारितोषिके दिल्या जाईल.
अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन हॉल क्र. 5 व 6 येथे अथवा कार्यालयाच्या 07172-252295 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment