Search This Blog

Friday 14 October 2022

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना


महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत

प्रोत्साहनपर लाभ योजना

Ø शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 14 ऑक्टोबर : शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेबाबत दि. 29 जुलै 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. सन 2017-18, सन 2018-19 व सन 2019-20 या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या योजनेत जास्तीत जास्त रु. 50 हजारपर्यंत पात्र लाभार्थींना लाभ मिळणार आहे. या तीन वर्षांपैकी शेवटच्या वर्षात जे कर्ज घेतलेले आहे, त्या वर्षाच्या कर्जाची मुद्दल रक्कम विचारात घेतली जाणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांनी या योजनेत पात्र असलेल्या खातेदारांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरलेली आहे. या योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह पहिली यादी दि. 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर उर्वरित पात्र शेतकऱ्यांची दुसऱ्या टप्प्यातील यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. विशिष्ट क्रमांकासह यादी संबंधित बँका, जिल्हा उपनिबंधक व तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयात तसेच गाव चावडी, ग्रामपंचायत, विकास संस्था या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विशिष्ट क्रमांकासह यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत किंवा सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे.

आधार प्रमाणीकरणानंतर पात्र लाभार्थ्यांची प्रोत्साहनपर लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी गेल्यानंतर आधार क्रमांक किंवा कर्जाची रक्कम चुकली असेल तर त्याबाबत शेतकऱ्यांनी तशी तक्रार संबंधित पोर्टलवर नोंदवायची आहे. प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी तर तालुकास्तरावर संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

दिवाळीपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचे राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आदेश असल्याने ज्या पात्र शेतकऱ्यांची नावे यादीत आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. यासाठी तालुक्यातील आपले सरकार, सी.एस.सी, संग्राम केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे.

००००००


 

No comments:

Post a Comment