Search This Blog

Tuesday, 11 October 2022

शेतकऱ्यांनी पणन मंडळाच्या तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा

 


शेतकऱ्यांनी पणन मंडळाच्या तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा

               चंद्रपूर, दि. 11 ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सन 1990-91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. शेतमालाला कमी भाव असतानाच्या काळात शेतमालाला गोदाम तसेच कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या योजनेत विशेषतः सुगीच्या काळात बाजारपेठेत एकाच वेळेस एकाच प्रकारचा मोठ्या प्रमाणात शेतमाल शेतकरी विक्रीस आणतात. तेव्हा शेतमालाचे भाव पडतात म्हणजेच कमी होतात. अशावेळी शेतकऱ्यांच्या मालाला तारण देणारी महत्त्वकांक्षी अशी ही योजना असून या योजनेतून तुर, मूग, उडीद, सोयाबीन,सूर्यफूल, चना, भात(धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वाघ्या घेवडा (राजमा), बेदाणा, हळद, काजू बी व सुपारी आदींना लाभ दिला जातो.

               शेतकरी कमी भावाच्या काळात ही उत्पादने बाजार समितीकडे तारण ठेवू शकतात. यासाठी बाजार समितीकडून मोफत गोदाम उपलब्ध करून दिले जाते. तसेच वार्षिक फक्त 6 टक्के इतक्या कमी व्याजदरात शेतकऱ्यास शेतमालाच्या त्यावेळी असलेल्या बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेली आधारभूत किंमत यापैकी जी कमी असेल त्यानुसार 75 टक्के रकमेइतके कर्ज लगेच उपलब्ध करून दिले जाते. त्यानंतर वाढीव भावाच्या काळात शेतकरी आपला माल विकू शकतो व कर्जाची परतफेड करून वाढीव रक्कम शेतकऱ्यांना परत मिळते. तसेच वखार पावतीवर सुद्धा तारण कर्ज दिल्या जाते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोफत गोदाम गरजेच्या वेळी कर्ज स्टोरेज कालावधीमध्ये शेतमालाचा दर्जा राखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जाते. तसेच गोदामात साठवलेल्या मालाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विमा काढल्या जातो. अशा सुविधांमुळे शेतमालाला चांगला भाव मिळण्यास मदत होत आहे. शेतमाल तारण कर्ज योजना प्रभावीपणे राबविता यावी यासाठी बाजार समितीकडे चांगल्या क्षमतेची गोदामे उपलब्ध असणे गरजेचे आहे. यासाठी बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने राष्ट्रीय कृषी योजनेतून वैज्ञानिक साठवण सुविधांच्या दृष्टिकोनातून वैज्ञानिक पद्धतीने गोदामे उभारली आहे.

               तसेच शेतकऱ्यांच्या तारण ठेवलेल्या मालाच्या बदल्यात त्यांना द्यावयाचा कर्जासाठीचा निधीही पणन मंडळामार्फत बाजार समित्यांना वार्षिक फक्त 3 टक्के इतक्या कमीत-कमी व्याजदरात उपलब्ध करून देण्यात येतो. सन 2022-23 या हंगामातील शेतमाल तारण कर्ज योजनेस 1 आक्टोबर 2022 पासून सुरुवात झाली आहे. ही योजना बाजार समिती व शेतकरी दोघांच्याही फायद्याची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल कमी भावात विक्री न करता पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment