नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी ‘स्टार्टअप’ एक चांगले व्यासपीठ
Ø रुजू होताच नुतन जिल्हाधिका-यांचे नवउद्योजकांना मार्गदर्शन
चंद्रपूर, दि. 14 ऑक्टोबर : केंद्र व राज्य सरकारने देश, राज्य, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर स्टार्टअपच्या माध्यमातून नवउद्योजकांना एक संधी उपलब्ध करून दिली आहे. आपल्यातील कौशल्याचा परिपूर्ण उपयोग करून नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी ‘स्टार्टअप’ एक चांगले व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन नुतन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभागातर्फे आयोजित महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्राचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डब्ल्यू. राजुरकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुशील भुजाडे, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे, कौशल्य विकास अधिकारी भाग्यश्री वाघमारे आदी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्हाधिकारी म्हणून आज (दि.14) सकाळी पदभार स्वीकारला आणि नवउद्योजक तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली, असे सांगून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. म्हणाले, जगातील मोठमोठ्या कंपन्यांची सुरवातसुध्दा स्टार्टअपनेच झाली. रोजगार स्वयंरोजगार याबाबत जागतिक आणि देशाच्या स्तरावर ज्या काही अडचणी निर्माण होतात. त्यावर स्टार्टअपच्या माध्यमातून उत्तर दिले जाऊ शकते. जगातील सर्वात मोठी कंपनी टेसला व इतर कंपन्यांची सुरवात स्टार्टअपनेच झाली. सुरवातीला कोणताही उद्योग किंवा कंपनी छोटीच असते. नाविन्यपूर्ण कल्पनांच्या आधारावर तिचा विस्तार आणि विकास होत असतो. त्यामुळे तुमच्यातील कौशल्याला वाव देण्याची संधी या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध झाली आहे, त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी विद्यार्थ्यांना केले.
नुतन जिल्हाधिकारी यांनी स्वीकारला पदभार : तत्कालीन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची नागपूर येथे बदली झाल्याने त्यांच्या जागेवर आलेले नुतन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी शुक्रवारी सकाळी चंद्रपूर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला.
००००००
No comments:
Post a Comment