Search This Blog

Friday 14 October 2022

आपली नोकरी लोकांच्या सेवेसाठीच – तत्कालीन जिल्हाधिकारी गुल्हाने




 

आपली नोकरी लोकांच्या सेवेसाठीच – तत्कालीन जिल्हाधिकारी गुल्हाने

Ø प्रशासनातर्फे तत्कालीन जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिका-यांना निरोप                              

चंद्रपूर, दि. 14 ऑक्टोबर शासकीय कार्यालयात काम घेऊन येणारा व्यक्ती हा आपला वेळ खायला आला आहे, किंवा तो आपला शत्रृ आहे, अशी मानसिकता अधिकारी आणि कर्मचा-यांनी अजिबात ठेवू नये. त्यामुळे आपल्यामध्ये ताणतणाव वाढतो. बदलत्या काळानुसार शासकीय सेवेत असणा-यांनी गतिमान काम करण्यासोबतच प्रत्यक्ष फिल्डवर जाणे, लोकांना भेटणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणेसुध्दा महत्वाचे आहे. आपली नोकरी ही लोकांच्या सेवेसाठीच आहे, हे लक्षात ठेवून काम करा, असे आवाहन तत्कालीन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.

नियोजन सभागृहात जिल्हा प्रशासनाच्या वतीने नुतन जिल्हाधिका-यांचे स्वागत व तत्कालीन जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. अजय गुल्हाने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे  नुतन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. तर मंचावर दोन्ही सत्कारमुर्ती श्री. गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी संपत खलाटे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम उपस्थित होते.

दोन वर्षातील माझ्या कार्यकाळात 75 टक्के काम हे फक्त कोरोनाच्या संकटासोबत लढण्यात गेले, असे सांगून श्री. गुल्हाने म्हणाले, जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी या काळात अहोरात्र काम करून जनतेला सेवा दिली. या काळात इंडीयन मेडीकल असोसिएशन, खाजगी डॉक्टर्स आदींना सोबत घेऊन काम केले. कोरोनाच्या दुस-या लाटेत बेडची उपलब्धता, ऑक्सीजनचा पुरवठा, ऑक्सीजन टँकची निर्मिती व इतर सोयीसुविधा निर्माण केल्या. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले ‘बेड मॅनेजमेंट सिस्टीम’ मुळे स्थानिक तालुका स्तरावरच नागरिकांना बेड उपलब्ध होऊ लागले. त्याचा फायदा नागरिकांना झाला.

तसेच सर्व विभागाच्या आणि लोकसहभागातून जिल्ह्यात 3500 वनराई बंधा-याची निर्मिती करू शकलो. त्यामुळे 16 हजार हेक्टरवर संरक्षित सिंचनाची सोय झाली. एक चांगली टीम या जिल्ह्यात तयार झाली आहे. नुतन जिल्हाधिका-यांनासुध्दा या टीमचा फायदा होईल. बदलत्या काळात लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांनी कटिबध्द राहावे. आपले उत्कृष्ट योगदान देऊन लोकांची सेवा करा. 11 ऑगस्ट 2020 रोजी या जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून मी रुजू झालो. या दोन वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामाने मी नक्कीच समाधानी आहे, असे अजय गुल्हाने यांनी सांगितले.

चंद्रपूरच्या विकासासाठी टीम म्हणून काम करू : जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

जिल्ह्यातून बदली झालेले तत्कालीन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर या दोन्ही अधिका-यांनी अतिशय चांगले काम केल्याचे अनेकांनी मनोगतातून व्यक्त केले. श्री. गुल्हाने यांनी सर्वांना सोबत घेऊन कोरोनाच्या संकटाशी लढा दिला तर श्रीमती वरखेडकर ह्या उपमुख्यमंत्री कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्त होणा-या पहिल्या महिला ठरल्या. त्यांनीसुध्दा जिल्ह्यात अतिशय चांगले काम केले आहे. भविष्यातही सर्व मिळून जिल्ह्याच्या विकासासाठी चांगले काम करू, असे नुतन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. म्हणाले. 

            यावेळी श्रीमती वरखेडकर म्हणाल्या, चंद्रपूरला रुजू होण्यापूर्वी मी पुणे येथे कार्यरत होती. कधीकाळी माझ्या आजोबांनी चंद्रपूरात काम केल्यामुळे मी चंद्रपूर मागून घेतले. हा जिल्हा अतिशय मोठा असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात किमान तीन वेळा भेटी दिल्या. वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनात चांगले काम केल्याचे समाधान आहे. बदली झाली असली तरी आपल्या पुढील पुस्तकाचे प्रकाशन चंद्रपूरात करील, अशी ग्वाही त्यांनी दिली. विशेष म्हणजे मी एकटी राहात असल्याने माझे वाहन चालकमामा, शिपाई मामा, घरकाम करणा-या दोन मावश्या यांनी कुटुंबाप्रमाणे माझी काळजी घेतली, असा उल्लेख त्यांनी आवर्जुन केला.

            यावेळी उपविभागीय अधिकारी दिप्ती सुर्यवंशी, सुभाष शिंदे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे, उपजिल्हाधिकारी पल्लवी घाटगे, तहसीलदार गणेश जगदळे, नायब तहसीलदार श्री. धांडे आणि महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शैलेश धात्रक यांनी बदली होऊन गेलेल्या दोन्ही अधिका-यांबाबत व नुतन जिल्हाधिका-यांच्या आगमनाबद्दल मनोगत व्यक्त केले.

 कार्यक्रमाचे संचालन अधिक्षिका प्रिती डूडूलकर यांनी तर आभार तहसीलदार कांचन जगताप यांनी मानले. कार्यक्रमाला अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, संध्या चिवंडे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषदेचे अधिकारी व इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment