Search This Blog

Thursday, 20 October 2022

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

 



पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

Ø विविध कंपन्यात 64 उमेदवारांची प्राथमिक निवड

चंद्रपूर, दि. 20 ऑक्टोबर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व डॉ. आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

            या कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे, आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . राजेश दहेगांवकर प्राध्यापक सतीश पेटकर, प्रा.श्री. चिमुरकर, प्रा. किशोर महाजन, कौशल्य विकास विभागाचे शैलेश भगत आदी उपस्थित होते.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यानी स्वत:मधील कौशल्य ओळखून रोजगार संधीसाठी प्रयत्न करावे. विद्यार्थ्यानी मनामध्ये कसलाही संकोच न ठेवता मिळेल ते काम करून आपण कार्यक्षम असल्याचे सिद्ध करावे,तसेच  विद्यार्थ्याने फक्त नोकरीवर अवलंबुन न राहता स्वयंरोजगाराकडे लक्ष केंद्रित करावे, असे मोलाचे मार्गदर्शन केले.

            महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. दहेगांवकर याच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. त्यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यानी शालेय शिक्षणाबरोबरच कौशल्य विकासावर भर द्यावा आणि मिळेल तो रोजगार करून आपला शालेय खर्च स्वत: करावा, तसेच विद्यार्थ्याना कमवा आणि शिका असा कानमंत्र दिला.                      

            तसेच या कार्यालयाचे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या समन्वयक अमरिन पठाण  यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची माहिती दिली.

             सदर मेळाव्यात स्थानिक तसेच बाहेर जिल्हातील विविध नामांकित कंपन्या उपस्थित होत्या. या सर्व उद्योजकांनी आपल्या कंपन्यामध्ये असलेल्या रिक्त पदाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला मोठया प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी 108 उमेदवारांनी आपला बायोडाटा संबंधित कंपनीला दिला असून त्यापैकी 64 उमेदवारांची प्राथमिक निवड झाल्याचे उद्योजकांनी कळविले आहे. प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांना अंतिम निवडीसाठी कंपनी बोलविणार असल्याचे सांगितले.

     कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्री.चिमुरकर यांनी तर आभार प्रा.श्री.पेटकर सर यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कर्मचारी तसेच डॉ.आंबेडकर महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.   

००००००

No comments:

Post a Comment