Search This Blog

Thursday, 13 October 2022

वरोरा तालुक्यातील अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे शेतपिकांच्या नुकसान भरपाईचे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात होणार जमा

 

वरोरा तालुक्यातील अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे शेतपिकांच्या नुकसान भरपाईचे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात होणार जमा

Ø बँक खाते क्रमांक व आधारकार्ड संबधित तलाठीकडे तात्काळ जमा करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 13 ऑक्टोबर : अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे वरोरा तालुक्यामध्ये शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जमिनीसुद्धा खरडून गेल्या आहे. त्याअनुषंगाने सर्वेक्षण होऊन शासनाकडून पिकांची नुकसान भरपाईकरीता वरोरा तालुक्यास 79.23 कोटी रु. प्राप्त झाले आहे. सदर अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तात्काळ जमा करावयाचे आहे.

याकरीता सर्व शेतकरी यांचे बँक खाता क्रमांक आवश्यक आहे. यासाठी तलाठी,कोतवाल यांच्याकडे बँक खाता क्रमांक जमा करावयाचा असून याकरीता सर्व गावांमध्ये जाहीर प्रसिद्धी देऊनही मोठ्या प्रमाणात बँक खाते क्रमांक अप्राप्त आहे. तरी, ज्या शेतकऱ्यांनी अजूनही बँक खाते क्रमांक जमा केले नाही त्यांनी तात्काळ आपले बँक खाते पासबुक तसेच आधारकार्डची झेरॉक्स प्रत संबंधित गावाचे तलाठी, ग्रामपंचायत कार्यालय, कोतवाल, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकाकडे जमा करावे.

ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते बंद झाले आहे तसेच ई-केवायसी केलेले नाही त्यांनी तात्काळ आपल्या बँकेशी संपर्क साधून आपले बँक खाते अद्ययावत करून घ्यावे. जेणेकरून, त्वरित पीक नुकसानीची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होईल. त्याचप्रमाणे अद्यापपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी, ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी केली नसेल त्यांनी आजच आपली ई-पिक पाहणी करून घ्यावी. जे शेतकरी ई-पिक पाहणी करणार नाही त्यांच्या सातबारावर पडीत पिक पाहणी दिसेल परिणामी, त्यांना शासकीय अनुदान, पीक कर्ज आदींबाबत अडचणी निर्माण होतील. दि. 15 ऑक्टोबर 2022 ही पिक पहाणीची अंतिम मुदत असल्याने मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी तात्काळ करून घ्यावी.

तरी, वरोरा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपले अद्यावत बँक खाते क्रमांक, संमतीपत्र यथाशिघ्र तलाठीकडे जमा करावे. जेणेकरून विहीत मुदतीत अनुदान आपल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास तालुका प्रशासनास सोयीचे होईल, असे आवाहन तहसीलदार वरोरा यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment