रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी कार्यपध्दत निश्चित -सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश
मुंबई / चंद्रपूर दि.19 : रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी कार्यपध्दत निश्चित करण्यात यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. यानुसार मंडळावर नियुक्त करण्याबाबत कार्यपद्धत निश्चित करण्यात आली आहे.
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर अध्यक्ष व अशासकीय सदस्य या पदावर नियुक्तीसाठी रंगभूमीशी संबंधित नाटय लेखन, नाटय व्यवस्थापन, नाटय निर्मिती, नाटय कलाकार, कोणत्याही विद्यापीठातील मराठी नाटयशास्त्र विषयाशी संबंधित प्राध्यापक, नाटय परिक्षक, साहित्यिक, तसेच प्रतिष्ठीत नाटय आणि एकांकिका स्पर्धामध्ये तसेच रंगभूमीशी संबंधित महोत्सवामध्ये अविष्कार सिध्द केलेल्या व्यक्ती (कलाकार/ तंत्रज्ञ) इत्यादी क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे.अध्यक्ष पदासाठी किमान 20 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच सदस्य पदासाठी किमान 15 वर्षाचा अनुभव आणि कायदा क्षेत्रातील अनुभव असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल.
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर कार्यरत राहण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष व अशासकीय सदस्य यांची नियुक्ती तीन वर्षासाठी करण्यात येईल. मंडळावर अध्यक्ष व अशासकीय सदस्य म्हणून 3 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आलेले आणि 3 वर्षाचा कालावधी पूर्ण केलेले सदस्य पुनर्नियुक्तीस पुढील किमान 3 वर्षासाठी पात्र होणार नाहीत. तथापि मंडळावर सदस्य म्हणून पद भुषविलेल्या व्यक्तीचा अध्यक्ष पदासाठी विचार करताना सदर अट लागू होणार नाही. राज्यातील प्रत्येक जिल्हयातील 1 सदस्य तसेच मुंबई व पुणे या जिल्हयातील प्रत्येकी कमाल 5 सदस्य, अशाप्रकारे सदस्य संख्या कमाल 45 इतकी असेल.
शासनाच्या मान्यतेने कार्यरत रंगभूमी मंडळाची मुदत संपण्यापूर्वी 4 महिने अगोदर रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ कार्यालयाच्या, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दी करुन व प्रत्येक जिल्हयात प्रसिध्द होणा-या मराठी भाषेतील वृत्तपत्रात जाहिरातीव्दारे अर्ज मागविण्यात येतील. काही कारणास्तव 3 वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळातील अशासकीय अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती, 15 दिवसाची मुदत देऊन वरील प्रक्रीयेव्दारे अर्ज मागविण्यात येतील.
प्राप्त झालेल्या अर्जाची विहित नियम व अटीनुसार रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडून छाननी करुन अर्हता प्राप्त व्यक्तीची यादी तयार करण्यात येईल. प्राप्त झालेल्या अर्जाची विहित नियम व अटीनुसार रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडून छाननी करुन अर्हता प्राप्त व्यक्तीची यादी तयार करण्यात येईल.
सदर यादीतून अध्यक्ष व अशासकीय सदस्य यांची सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे शिफारस करण्यासाठी पुढीलप्रमाणे समिती राहील. 1.अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे अध्यक्ष, अशासकीय सदस्य, 2.नाटय व कला क्षेत्रातील तज्ञ व जेष्ठ रंगकर्मी आणि अशासकीय सदस्य, 3. नाटय व कलाक्षेत्रातील तज्ञ व जेष्ठ रंगकर्मी आणि अशासकीय सदस्य 4.सचिव, रंगभूमी प्रयोग परिनिरिक्षण मंडळ आणि सदस्य सचिव यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही समिती रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडून प्राप्त यादीतून 100 व्यक्तीच्या मर्यादेत नावांची शिफारस करेल.
सदर शिफारशीत नावांमधून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या स्तरावरुन कमाल 45 व्यक्तींची अध्यक्ष व सदस्य पदासाठी निवड करण्यात येईल. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावरील अध्यक्ष व अशासकीय सदस्यांना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दि. 27.11.2013 च्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेले मासिक मानधन, बैठक भत्ता, प्रवास भत्ता, व दैनिक भत्ता तसेच अन्य अटी यामध्ये शासनाकडून सुधारणा केल्यास त्यानुसार लागू राहतील.
00000
No comments:
Post a Comment