Search This Blog

Wednesday 19 October 2022

गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वराज्य मिळवले, आता सुराज्याकडे वाटचाल करूया -सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार





 

गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वराज्य मिळवले, आता सुराज्याकडे वाटचाल करूया -सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार वितरित

मुंबई / चंद्रपूर, दि. 19 : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी स्वराज्य मिळवले, आता त्याच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या साथीने सुराज्याकडे वाटचाल करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा यंदा प्रथमच राज्य शासनाने घेतली होती. त्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. राज्यस्तरीय तीन आणि प्रत्येक जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या एक सार्वजनिक गणेशोत्स मंडळाला मुंबई येथे पुरस्कार देण्यात आले.  समाजात चांगल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या मंडळाचा गौरव करणे हाच उद्देश ठेवून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांची साथ असणे आवश्यक आहे, असे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा सुरू केली. यामागचा उद्देश हा समाजातील एकात्मता टिकून राहावी असाच होता. आजच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिक प्रश्न मांडण्याबरोबर समाजाला दिशा आणि विचार देण्याचे काम करीत आहेत. देशभक्ती, राष्ट्रउन्नती आणि राज्याची प्रगती दाखविण्याचे उत्तम माध्यम म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत साकारण्यात येणारे देखावे. यावर्षी प्रथमच उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले आणि या स्पर्धेत राज्यातील ३५६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी सहभाग घेतला.

आज राज्यभरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यावर भर देत आहेत. आज उत्सवाचे स्वरूप जरी बदलले असले तरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी साकारण्यात येणाऱ्या देखाव्यातून समाजातील समस्या मांडण्याबरोबर सामाजिक प्रबोधन करण्याचे काम अविरत करत असतात. यावर्षी सुद्धा नदी संवर्धन, शिक्षण, पर्यावरण यासारखे विषय मांडून समाजाला दिशा दिली.  

अकोला जिल्ह्यातील पातूर येथील श्री. खडकेश्वर म. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला प्रथम, अहमदनगर जिल्हयातील पाथर्डीतील सुवर्णयुग तरुण मंडळ शेवाळे गल्लीला द्वितीय आणि मुंबई उपनगरच्या अंधेरी येथील स्वप्नाक्षय मित्रमंडळाला तृतीय पुरस्कार देण्यात आला.

याशिवाय जिल्हास्तरीय विजेते घोषित करण्यात आले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे

एकविरा गणेशोत्सव मंडळ (अमरावती), कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ (औरंगाबाद), जय किसान गणेश मित्र मंडळ (बीड), आदर्श गणेश मंडळ (भंडारा), सहकार्य गणेश मंडळ (तालुका चिखली, बुलढाणा),  न्यु इंडिया युवक गणेश मंडळ (भानापेठ वार्ड, चंद्रपूर), श्री. संत सावता गणेश मित्र मंडळ, (सोनगीर,धुळे), लोकमान्य गणेश मंडळ,(आरमोरी,गडचिरोली), नवयुवक किसान गणेश मंडळ (देवरी,गोंदिया), श्री. सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळ (एनटीसी, हिंगोली), जागृती मित्र मंडळ (भडगांव,जळगाव), संत सावता गणेश मंडळ (परतूर, जालना), श्री. गणेश तरुण मंडळ (ढेंगेवाडी, कोल्हापुर),  बाप्पा गणेश मंडळ (लातूर) पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (ना.म.जोशी.मार्ग, मुंबई शहर), विजय बाल गणेशोत्सव मंडळ (किराडपुरा,नागपुर), अपरंपार गणेश मंडळ (नांदेड), क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ (नंदुरबार), अमरज्योत मित्र मंडळ (सातपूर, नाशिक), बाल हनुमान गणेश मंडळ (उस्मानाबाद), साईनाथ मित्र मंडळ (नालासोपारा, पालघर) स्वराज्य गणेश मंडळ (देवनांदरा, परभणी), जय जवान मित्र मंडळ (नानापेठ, पुणे), संत रोहीदास तरुण विकास मंडळ (महाड, रायगड), पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (मंडणगड, रत्नागिरी), तिरंगा गणेशोत्सव मंडळ (विटा, सांगली), सार्वजनिक क्रिडा गणेशोत्सव मंडळ (सावली, सातारा), सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (सालईवडा, सिंधुदुर्ग), श्रीमंत मनाचा कसबा गणपती (सोलापूर)धामणकर नाका मित्र मंडळ (भिवंडी, ठाणे), बाल गणेश उत्सव मंडळ (समुद्रपूर, वर्धा), मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ (वाशिम), नवयुग गणेश मंडळ (यवतमाळ) गणेशोत्सव काळात उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमार्फत जिल्हयातून एका उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात आली आहे. राज्यस्तर समितीमार्फत प्रत्येकी एक याप्रमाणे प्राप्त झालेल्या एकूण 36 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख रूपये आणि प्रमाणपत्र तसेच 33 जिल्हयातील अन्य प्रथम क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसाठी 25 हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विद्या वाघमारे, पु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडेआदी उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment