Search This Blog

Wednesday, 8 March 2023

माविमच्या माध्यमातून तळागाळातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम - नरेश उगेमुगे

 




माविमच्या माध्यमातून तळागाळातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम - नरेश उगेमुगे

Ø जागतिक महिला दिन कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 08 : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) हे तळागाळातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत काम करीत आहे. ज्यांना कोणताही आधार अशा महिलांसाठी माविम हे उत्कृष्ट व्यासपीठ असून अनेक रोजगाराभिमुख उपक्रमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत, असे प्रतिपादन माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त संताजी सभागृह येथे आयोजित ‘घे भरारी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर मानव विकास विभागाचे नियोजन अधिकारी सुनील धोंगडे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, महिला व बालविकास संरक्षण अधिकारी श्यामराव मुदगीलवार उपस्थित होते.

ग्रामस्तरावर काम करणा-या माविमच्या सर्व महिलांनी एकत्रित येऊन आनंदोत्सव साजरा करावा, या उद्देशाने आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून श्री. उगेमुगे म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक विभाग माविम सोबत जुळला आहे. स्त्री शक्ती म्हणून सर्व महिलांना समोर जायचे आहे. जिल्ह्यात 1994 पासून महिला बचत गटांची सुरवात झाली असून 11 लोकसंचालित साधन केंद्र स्वबळावर उभे आहेत. वर्षाकाठी 20 – 20 लाखांचा व्यवसाय त्या करीत असतात. एवढेच नाही तर वेगवेगळ्या बँकासोबत समन्वय साधून महिला बचत गटांना कर्ज मिळवून देण्याचे कामसुध्दा नियमितपणे सुरू आहे.

माविमसोबत जिल्ह्यातील जवळपास एक लाख महिला जुळल्या आहेत. माविमने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमसुध्दा सुरू केले आहेत. यात स्त्रियांना उत्कृष्ट सहकार्य करणा-या पुरुषांसाठी ‘शोध ज्योतिबांचा’ उपक्रम, घरावर पुरुष आणि महिला या दोघांच्याही नावाची पाटी असण्यासाठी ‘घर दोघांचे’ उपक्रम, सातबारा / आठ अ मध्ये घरच्या महिलेचे नाव चढविण्यासाठी ‘लक्ष्मीमुक्ती योजना’ आदी उपक्रमांचा समावेश आहे. तसेच महिलांची आर्थिक प्रगती होण्यासाठी ‘टूल बँकेच्या’ माध्यमातून कृषी अवजारे उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे श्री. उगेमुगे यांनी सांगितले.

यावेळी मानव विकासचे श्री. धोंगडे म्हणाले, वेतननिश्चिती,  समानसंधी आणि आपले हक्क मिळावे यासाठी अमेरीकेत महिलांनी 8 मार्च 1909 मध्ये निदर्शने केली होती. यानंतरही अनेक आंदोलने होत गेली. संयुक्त राष्ट्र संघटनेने 8 मार्च 1996 पासून जागतिक महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे. महिलांच्या प्रगतीवरच समाजाची प्रगती अवलंबून आहे. मानव विकास अंतर्गत महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. महिलांना त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणा-या महिला सरपंचाचा सत्कार करण्यात आला. यात शालिनी दोहतरे (सरपंच अंबोली, ता. चिमूर), निरंजना मडावी (आंबेधानोरा, ता. पोंभुर्णा), छाया जंगम (माजरी, ता. भद्रावती), शुभांगी राऊत (नानोरी, ता. ब्रम्हपुरी) आणि अमावस्या निमसरकर यांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीला दीप प्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन विद्या रामटेके यांनी केले. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ग्रामस्तरावरील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

०००००००

Monday, 6 March 2023

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने कलम 37(1)(3) लागू

 जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने कलम 37(1)(3) लागू

चंद्रपूर, दि. 06 : जिल्ह्यात राजकीय पक्ष, कामगार संघटनांचे आंदोलन, जातीय सामाजिक संघटनांकडून करण्यात येणारे आंदोलने, निदर्शने, मोर्चा, अतिमहत्वाचे व्यक्तीचा दौरा तसेच सध्या देशात व राज्यातील चालू घडामोडी संबधाने तसेच जिल्ह्यात होणारी विविध राजकीय, सामाजिक, जातीय कार्यक्रम, आंदोलने व निदर्शने आदी कार्यक्रमामुळे तसेच 6 मार्च रोजी होळी व 7 मार्च रोजी धुलीवंदन सण व उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यात  दि. 1 ते 15 मार्च 2023 च्या रात्री 12  वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) (3) लागू करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी सी यांनी निर्गमित केले आहे.

या कालावधीत कायदा व  सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने  विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. तरी, सदर कालावधीत कोणतीही व्यक्ती शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीच्या आकृत्या, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, तसेच यामुळे सभ्यता आणि नीतिमत्ता यास धोका पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे किंवा आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे, त्याचा जनतेत प्रसार करणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात येत आहे.

तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही सभा, मोर्चा, उत्सव व मिरवणुका काढू नये. पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. याची नोंद घ्यावी. सदर आदेश दि. 1 ते 15 मार्च 2023 चे रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राकरीता लागू राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी  विनय गौडा यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

00000

होळी व धुलीवंदनच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकेबंदी, पेट्रोलिंग व पोलीस बंदोबस्त

 होळी व धुलीवंदनच्या पार्श्वभुमीवर

जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकेबंदी, पेट्रोलिंग व पोलीस बंदोबस्त

Ø मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर होणार दंडात्मक कार्यवाही

चंद्रपूर, दि. 06 : होळी व धुलीवंदन हा सण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अतिउत्साही नागरिक व तरुणमंडळी मद्यप्राशन करून दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवितात. तसेच रोडने रॅश ड्रायव्हिंग, स्टंटबाजी सारखे कृत्य करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन जिवीतहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या असल्याने किंवा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सदर प्रकारावर आळा घालण्याच्या दृष्टीने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकेबंदी, पेट्रोलिंग व पोलीस बंदोबस्त लावण्यात येत आहे.

नागरिकांनी मद्यप्राशन करून रोडने रॅश ड्रायव्हिंग, स्टंटबाजी सारखे कृत्य करताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करण्याकरीता वाहतूक नियंत्रण शाखा, चंद्रपूर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष मोहीम राबवून कडक कार्यवाही करणे सुरू आहे. या सणानिमित्तसुद्धा कारवाईची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तरी, सर्व नागरिकांनी सण साजरा करताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.

००००००

कुष्ठरोग मुक्त झालेल्या व्यक्तींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करावे - सीईओ विवेक जॉन्सन

 


कुष्ठरोग मुक्त झालेल्या व्यक्तींना व्यावसायिक प्रशिक्षण

देऊन स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करावे

-         सीईओ विवेक जॉन्सन

Ø कुष्ठरोगमुक्तांना साहित्य वाटप कार्यक्रम

चंद्रपूर,दि. 06 : कुष्ठरोग मुक्त झालेल्या व्यक्तींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले.  आनंदवन येथे जिल्हा परिषद शेषनिधी व सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने विकृती ग्रेड-1 व 2 च्या रुग्णांकरीता व्यावसायिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

 कुष्ठरुग्णांना समाजात उच्च स्थान मिळवून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकरीता जिल्हा परिषद, चंद्रपूरमार्फत व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यानंतरही दरवर्षी कुष्ठरोगमुक्तांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना समाजात मान, प्रतिष्ठा व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करण्यात येईल.

त्याअनुषंगाने, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते शिबिर व निरोप समारंभ कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, महारोगी सेवा समिती अंतर्गत व्यवस्थापक पल्लवी आमटे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम, सितारतन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय पोळ, आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यात ग्रेड-2 चे 146 रुग्ण असून सदर रुग्णांना तालुकास्तरावर असलेल्या कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्रात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नियमित भौतिकोपचारामुळे त्यांच्यात सुधारणा होत आहे. त्यातील चार रुग्ण व पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया झालेले सात रुग्ण असे एकूण 11 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कुष्ठमुक्तांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत असून त्यात वेल्डिंग, झेरॉक्स मशीन, इलेक्ट्रिक मेंटेनन्स, शिलाई मशीन आदी ट्रेडचा सदर प्रशिक्षणात समावेश आहे. या व्यावसायिक प्रशिक्षणामुळे सदर कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन होण्यास व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.संदीप गेडाम यांनी तर आभार वैद्यकीय पर्यवेक्षक राजेश त्रिपुरवार यांनी मानले.

०००००००

पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांकरीता आवश्यक सुविधा उपलब्ध ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांकरीता आवश्यक सुविधा उपलब्ध ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Ø 30 मार्चपर्यंत सुविधांचा फोटो अहवाल प्रमाणपत्रासह कार्यालयास सादर करण्याच्या सुचना

Ø अन्यथा कार्यालयाकडून देण्यात आलेले नाहरकत प्रमाणपत्र नियमानुसार रद्द करण्याची कार्यवाही

चंद्रपूर, दि. 06: जिल्ह्यात सुरू असलेल्या पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांकरीता व सामान्य नागरिकांकरीता मूळ आवश्यक सुविधा जसे, स्वच्छ पिण्याचे पाणी, वाहनाकरींता हवा भरण्याची नि:शुल्क सुविधा व स्वच्छ प्रसाधनगृहे आदी सुविधा उपलब्ध ठेवणे संदर्भीय पेट्रोलियम कंपन्यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बंधनकारक आहे. तथापि काही पेट्रोल पंप संचालक यांच्याकडून या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात नाही. ज्यामध्ये प्रामुख्याने प्रसाधनगृहाची  सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे महिलांची गैरसोय होत असते.  काही ठिकाणी अशा सुविधा पूर्णतः बंद स्थितीत आहेत तर काही ठिकाणी पूर्णतः उपलब्ध नसतात. काही ठिकाणी अशा सुविधा अंशत: उपलब्ध करून दिल्या जात असतात. मात्र, त्याची व्यवस्थित दैनंदिन देखभाल अथवा साफसफाई ठेवण्यात येत नसल्याने त्या सुविधा सुस्थितीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही गंभीर बाब असून पेट्रोलियम कंपनीच्या मार्गदर्शक सूचनेचे सर्रास उल्लंघन होत आहे.

तरी, चंद्रपूर जिल्ह्यातील संचालित असलेले पेट्रोलपंप या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांकरीता व नागरिकांकरीता पेट्रोलियम कंपनीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्वच्छ पिण्याचे पाणी, वाहनाकरींता हवा भरण्याची नि:शुल्क सुविधा व स्वच्छ प्रसाधनगृहे या किमान सुविधा आपल्या पेट्रोलपंप येथे तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्या व तसा फोटो अहवाल व यासोबत जोडलेले प्रमाणपत्रासह या कार्यालयास 30 मार्च 2023 पर्यंत सादर करावा. तसेच सदर सुविधा नेहमीकरीता सुस्थितीत राहतील, याची खबरदारी घ्यावी. अन्यथा आपणास सदर जागेवर पेट्रोलपंप उभारणीस या कार्यालयाकडून देण्यात आलेले ना हरकत प्रमाणपत्र नियमानुसार रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. याची संबंधित पेट्रोल पंप संचालकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी कळविले आहे.

00000