Search This Blog

Thursday, 9 March 2023

अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आवाहन

अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव तातडीने

सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 09 : सत्र 2022-23 मध्ये इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेशित असणारे विद्यार्थी आणि सत्र 2023-24 च्या शैक्षणिक सत्रात सीईटी देवुन व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणारे, तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला प्रवेशित तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.

एमएचटीसीईटी, नीट, जेईई, एम.बी.ए, बी.एड, पी.एचडी, बी.एससी. ॲग्री, बी.फार्म, बी.एससी नर्सींग आदी व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे थेट द्वितीय वर्षाला प्रवेशोत्सुक तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना मागासवर्ग आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणीची ऑनलाईन प्रक्रिया सुरळीत झाली असून अर्जदार जात प्रमाणपत्र पडताळणीचा ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो. त्यामुळे संबंधित अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचा ऑनलाईन भरलेला अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर येथे लवकरात लवकर सादर करावा. जेणेकरून, प्रवेश प्रक्रियेत जातवैधता प्रमाणपत्राअभावी कुठल्याच मागासवर्गीयांना वंचित राहण्याची वेळ येणार नाही, असे समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी कळविले आहे. 

००००० 

20 मार्च रोजी महिला लोकशाही दिन

 


20 मार्च रोजी महिला लोकशाही दिन

चंद्रपूर, दि. 09 : जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी  महिला  लोकशाही दिन  तर चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय  महिला  लोकशाही  दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे, मार्च महिन्याचा लोकशाही  दिन 20 मार्च 2023 रोजी  सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात येत आहे.

या महिला लोकशाही दिनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक आस्थापने विषयक बाबी आणि विहीत अर्जात नसलेली प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. तरी, ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार, निवेदन  वैयक्तिक स्वरुपाचे असतील अशा महिलांचे अर्ज प्रत्येक महिण्याच्या तिसऱ्या सोमवारच्या 15 दिवसापूर्वी विहित नमुण्यात असलेले अर्ज दोन प्रतीत जिल्हा  महिला  व बालविकास अधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात येईल. जेणेकरुन, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनास तक्रार अर्जाचा निपटारा करण्यासाठी संबधित विभागाला सदर तक्रार अर्ज पाठविण्यात येईल. विहित अर्जाचा नमूना मिळविण्यासाठी कार्यालयास भेट द्यावी, असे जिल्हा  महिला  व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

भद्रावती येथील मौजा पिपरबोडी व डिफेन्स परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट जेरबंद

 


भद्रावती येथील मौजा पिपरबोडी व डिफेन्स परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट जेरबंद

चंद्रपूर, दि. 09 : चंद्रपूर वनविभागातील भद्रावती परिक्षेत्रांतर्गत नियतक्षेत्र भद्रावती येथील मौजा पिपरबोडी व आयुध निर्माणी चांदा परिसरात धुमाकूळ घालत असलेल्या व मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

2 मार्च रोजी सकाळी 6.45 वाजता सदर बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती भद्रावतीचे वनरक्षक श्री. गेडाम यांनी दिली. वनविभागाच्या टिमने घटनास्थळी जाऊन बिबट्याला ताब्यात घेत ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

मागील एक महिन्यापासून मौजा पिपरबोडी व आयुध निर्माणी चांदा परिसरात सदर बिबट धुमाकूळ घालून मानवावर हल्ले करीत होता. यावर आळा घालण्याकरीता वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. बिबट्याला जेरबंद करण्याकरीता 4 पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. सदर मोहीम मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, यांच्या नेतृत्वात सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. शेंडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. रोडे, क्षेत्रिय कर्मचारी अंकुश येवले, वनक्षेत्रपाल श्री. शिंदे, वनरक्षक श्री. गेडाम आदींनी कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली.

००००००

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात जागतिक महिला दिन


कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात जागतिक महिला दिन

चंद्रपूर, दि. 09 : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र तिस-या बॅच मधील प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांसोबत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आकाशवाणी, चंद्रपूरच्या निवेदिका संगिता लोखंडे उपस्थित होत्या. सर्वात प्रथम स्त्रियांनीच स्त्रियांचा सन्मान करणे आवश्यक आहे. तरच इतरांच्या मनात स्त्रियांप्रती सन्मान करण्याची भावना आपोआप जागृत झाल्याशिवाय राहणार नाही, असे श्रीमती लोखंडे यांनी सांगितले.

तसेच यावेळी श्रीमती डोंगरे यांनी, स्वतः चा दृष्टीकोन बदला म्हणजे सर्व बदलेल व बदल हवा असेल तर प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. कार्यालयाच्या प्रमुख भाग्यश्री वाघमारे यांनी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण घेत असलेला उमेदवारांना सातत्य, प्रयत्न आणि परिश्रम, या जोडीला नियोजित धेय्य असेल तर यश प्राप्त होईल, असे विचार मांडून सर्वांचे मनोबल वाढविले.

कार्यक्रमाचे संचालन दिव्या कुळमेथे यांनी तर आभार कांचन येरमे यांनी मानले. यावेळी केंद्रातील शिक्षक श्री गौरकार, सचिन भगत उपस्थित होते.

००००००

Wednesday, 8 March 2023

जि.प. शाळेच्या विद्यार्थीनींनी सांभाळला ‘मिनी मंत्रालयाचा’ कारभार





जि.प. शाळेच्या विद्यार्थीनींनी सांभाळला ‘मिनी मंत्रालयाचा’ कारभार

Ø सीईओंच्या संकल्पनेतून अभिनव महिला दिन

चंद्रपूर, दि. 08 : जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेमध्ये अभिनव पध्दतीने महिला दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणा-या निवडक 18 विद्यार्थीनींना अधिका-यांनी स्वत:च्या खुर्चीवर बसवून कामकाज सांभाळण्यास सांगितले. विशेष म्हणजे या विद्यार्थीनींनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत एक दिवसाकरीता अधिकारी बनून मिनी मंत्रालयाचा कारभार सांभाळला.

जिल्हा परिषदेचे शासन स्तरावरील कामकाम कसे चालते, या बाबींची ओळख करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणा-या मुलींना आज अधिका-यांचा मान देण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या खुर्चीसह सर्व विभाग प्रमुखांच्या खुर्चीवर बसून विद्यार्थीनींनी कामकाज सांभाळले.

यात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वंशिका वेट्टी (जि.प.उ. प्रा. शाळा, खुटाळा, चंद्रपूर), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुचिका सातरे (जि.प.उ. प्रा. शाळा, देवाडा खुर्द, पोंभुर्णा), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी म्हणून जागृती कुडे  (जि.प.उ. प्रा. शाळा, मारडा, चंद्रपूर), मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी म्हणून दिव्या केंद्रे (जि.प.उ. प्रा. शाळा, पालडोह, जिवती), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) तक्षशीला घागरगुंडे (जि.प.उ. प्रा. शाळा, दाताळा, चंद्रपूर), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.) श्रृती भालेराव (जि.प.उ. प्रा. शाळा, कुंभेझरी, जिवती), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.व बा.) तन्वी काकडे (जि.प.उ. प्रा. शाळा, नांदगाव पोडे, बल्लारपूर), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) श्रध्दा कस्तुरे (जि.प.उ. प्रा. शाळा, दाबगाव, मुल), जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून राधिका आत्राम (जि.प.उ. प्रा. शाळा, यशवंत नगर, चंद्रपूर), कार्यकारी अभियंता (बांधकाम) अक्षरा गायकवाड (जि.प.उ. प्रा. शाळा, चिंचाळा, चंद्रपूर), कार्यकारी अभियंता (जलसंधारण) विशाखा देवकाते (जि.प.उ. प्रा. शाळा, पालडोह, जिवती),  कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु) प्रिती जवाले (जि.प.उ. प्रा. शाळा, कुंभेझरी, जिवती), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी वेदिका गेडाम (जि.प.उ. प्रा. शाळा, दाताळा, चंद्रपूर), उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक (मनरेगा) तन्वी काकडे (जि.प.उ. प्रा. शाळा, नांदगाव पोडे, बल्लारपूर), जिल्हा समाजकल्याण अधिकारी कशीश कासवटे (जि.प.उ. प्रा. शाळा, यशवंत नगर, चंद्रपूर), कृषी विकास अधिकारी  इच्छा वाळके (जि.प.उ. प्रा. शाळा, खुटाळा चंद्रपूर), शिक्षणाधिकारी (प्राथ.) आर्या बुरांडे  (जि.प.उ. प्रा. शाळा, दाबगाव, मूल) आणि शिक्षणाधिकारी (माध्य.) म्हणून कृतिका बुरांडे (जि.प.उ. प्रा. शाळा, देवाडा खुर्द, पोंभुर्णा) या विद्यार्थीनींनी जिल्हा परिषदेचा कार्यभार सांभाळला.

०००००००